संपूर्ण जीवन हिदु धर्म, संस्कृती, समाज आणि राष्ट्र यांना समर्पित करणारे ‘गीता परिवारा’चे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज !
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा आज मुंबईत सन्मान !
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे ४ ते ११ फेब्रुवारीपर्यंत गीता परिवाराचे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवी जन्मोत्सवानिमित्त श्रीमद्भागवत कथा, प्रवचन, कीर्तन, संत आणि मान्यवर यांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण अन् उत्साही वातावरणात पार पडला. भारतातील पुण्यभूमीत संत, ऋषिमुनी आणि तपस्वी यांनी भक्ती, साधना तथा लोककल्याणाच्या तपाने बहरलेला आहे. अनादी काळापासून ही संतपरंपरा चालू आहे. वेळोवेळी हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षणही संतांनी केले आहे. त्यानुसार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजही या दिव्य परंपरेचे वाहक आहेत. स्वामीजींचे संपूर्ण जीवन धर्म, संस्कृती आणि समाज तथा राष्ट्राला समर्पित होत आहे. या अनुषंगाने प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या जन्मोत्सव प्रतिवर्षी ‘गीताभक्ती दिवस’च्या रूपात साजरा केला जातो. यंदा त्यांच्या जन्मोत्सवाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आळंदी येथे ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ साजरा झाला. त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.
संकलक – श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, पुणे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे अभिजित मुहूर्तावर नियोजित वेळेनुसार रामलल्लाचा (श्रीरामाचे बालक रूप) अभिषेक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे संचालन करणारे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज होते. त्यांनी त्यांच्या अभिषेकाच्या २० दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘या अभिषेकासाठी स्वतःला कसे सिद्ध करावे ?’ यासाठी एक पुस्तिका लिहून पाठवली होती. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या सदस्यांपैकी एक आहेत. ते या न्यासाचे कोषाध्यक्ष म्हणून प्रभु श्रीरामाची सेवा करत आहेत. – श्री. सचिन कौलकर (१२.२.२०२४) |
१. १७ वर्षांचे असतांना श्रीमद्भागवत कथेचा शुभारंभ !
श्रीमद्भागवत, गीता, रामायण, महाभारत आणि आध्यात्मिक विज्ञानाच्या इतर प्राचीन, पवित्र ग्रंथांवरील भावपूर्ण प्रवचनांमुळे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे खरे, तर भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचे मूळ नाव किशोर मदनगोपाल व्यास आहे. त्यांचा जन्म १९४९ मध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर या छोट्याशा गावात स्थायिक झालेल्या एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात झाला. प्राचीन आध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास, भक्ती आणि कटीबद्ध धार्मिकतेचा वारसा त्यांना दीर्घ कौटुंबिक परंपरेतून त्यांच्या पालकांकडून मिळाला. आपल्या मूळ गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘स्वाध्याय परिवारा’चे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या तत्त्वज्ञान विद्यापिठात प्रवेश घेतला. वाराणसी येथे शिकत असतांना प्रसिद्ध वैदिक विद्वान वेदमूर्ती विश्वनाथजी देव यांचे मार्गदर्शन घेण्याचे भाग्य त्यांना लाभले. १२० वर्षांच्या कौटुंबिक परंपरेला पुढे नेत त्यांनी त्यांच्या मूळ गावी गीतेवर प्रथम प्रवचन केले. त्यानंतर १७ वर्षांचे असतांना त्यांनी श्रीमद्भागवत कथेचा शुभारंभ केला. त्यांच्या कार्यक्रमात मिळालेल्या देणग्या त्यांनी चालू केलेले विविध उपक्रम आणि संस्था यांच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी व्यय केल्या आहेत.
२. अनुग्रह आणि संन्यास दीक्षा
प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेमळ आशीर्वादाने तरुण वयात महाराजांनी तत्त्वज्ञान विद्यापिठात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काशी येथील वाराणसी संस्कृत विश्वविद्यालयातून ‘आचार्य’ ही उपाधी प्राप्त केली. आचार्य श्री किशोरजी व्यास यांच्या रूपातून त्यांचे अतुलनीय ज्ञान आणि ओजस्वी वाणीने विश्वात कीर्ती पसरू लागली. कालांतराने कांची कामकोटी शंकराचार्य ब्रह्मलीन प.पू. स्वामी जयेंद्र सरस्वती महाराजांकडून अनुग्रह दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी ब्रह्मलीन महामंडलेश्वर प.पू. स्वामी श्री सत्यमित्रानंद गिरि महाराज यांच्याकडून ‘संन्यास दीक्षा’ प्राप्त केली. वेदांचे संरक्षण, शिक्षण, राष्ट्रनिर्माण, साहित्य प्रकाशन आदी कार्यांसाठी त्यांनी आपल्या अनेक संस्थांची स्थापना केली.
३. देवाची भक्ती आणि मानवजातीवरील प्रेम हा त्यांच्या कर्मयोगासाठी ऊर्जेचा स्रोत !
गेली ३० वर्षे श्रीमद्भागवत, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग वसिष्ठ आणि भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्या आध्यात्मिक साहित्याच्या इतर मौल्यवान अन् प्राचीन ग्रंथांवर प्रवचन देत आहेत. त्यांची भाषणे केवळ भारतातच नव्हे, तर नेपाळ, कॅनडा, अमेरिका, ग्रेट ब्रिटन इत्यादींसह अनेक देशांत होत असतात. कांची कामकोटी पीठाचे परमाचार्य (मुख्य-पुजारी) यांनी त्यांना आशीर्वाद दिला, ‘ते प.पू. स्व. डोंगरे महाराजांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी असतील.’ देवाची भक्ती, तसेच मानवावरील प्रेम हा त्यांच्या अथकपणे केलेल्या कर्मयोगासाठी (कर्तव्यपूर्ण कर्मे) ऊर्जेचा स्रोत आहे. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि हे कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांचे सर्वांत जवळचे दीक्षा घेतलेले शिष्य आहेत.
४. गीता परिवार
वर्ष १९८६ मध्ये प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी स्थापन केलेल्या ‘गीता परिवार संस्थे’द्वारे शेकडो शिबिरे तथा सहस्रो ‘संस्कार केंद्रां’चे संचालन केले जाते. त्यांनी संस्कार साहित्यांचे प्रकाशन केले. सहस्रो बालकांना योग शिक्षा, विद्यालयांत नैतिक शिक्षा, भारतीय पौराणिक महानाट्यांचे मंथन, गीता महोत्सव, योग महोत्सव यांसारख्या विशाल कार्यक्रमांचे आयोजन केले. ‘७५ कोटी सूर्यनमस्कार’, अशा भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले. ‘लर्न गीता’च्या (‘गीता शिका’च्या) माध्यमातून १८१ देशांतील १३ भाषांमध्ये, त्याचप्रमाणे ८ सहस्र सेवाभावी प्रशिक्षकांद्वारे ८ लाख गीताप्रेमींना निःशुल्क ‘ऑनलाईन’ गीता प्रशिक्षण दिले.
५. महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान
वर्ष १९९० मध्ये प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी स्थापित केलेल्या या संस्थेद्वारे ३७ वेदविद्यालयांची स्थापना त्याचप्रमाणे संचालन केले. वर्तमानात ८० अध्यापकांद्वारे १ सहस्र ९२९ विद्यार्थी निःशुल्क वेदांची शिक्षा प्राप्त करत आहेत. प्रतिवर्षी महर्षि वेदव्यास पुरस्कार, अग्निहोत्रींचा सन्मान, वृद्ध पुरोहितांना निवृत्तीवेतन देणे इत्यादी बहुविध कार्य केले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने भारतातील १४ राज्यांमधील ५० वैदिक शाळांना अनुदान दिले जाते आणि २ सहस्र ५०० हून अधिक वैदिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ‘ट्रस्ट’शी संलग्न १२ वैदिक शाळांमध्ये ३५० हून अधिक विद्यार्थी वैदिक शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत प्रतिष्ठानद्वारे देशातील विविध राज्यांमध्ये ९ वैदिक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. वैदिक विद्वानांनी वेदांचे संवर्धन करणे, हा या कार्याचा पाया आहे.
६. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह रुग्णसेवा तथा धर्मकार्य
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी स्थापित केलेल्या ‘श्रीकृष्ण सेवा निधी’च्या अंतर्गत श्रेष्ठ संत साहित्य प्रकाशन केले, अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह रुग्णसेवा तथा अन्य धर्मकार्य केले. ‘संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुला’च्या माध्यमातून त्यांनी प्रतिवर्षी ऋषिकेश येथे ‘गीतासाधना’ शिबिरांचे आयोजन केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वास्तव्यधाम श्री क्षेत्र देहू स्थित गाथा-मंदिर प्रांगणात समर्थ रामदासस्वामी साधक निवास भवनाची निर्मिती केली. येथे पारंपरिक गुरुकुल पद्धतीने वारकरी विद्यार्थी संतसाहित्याचे अध्ययन करत आहेत. बीड येथील गणेश समन्वय आश्रमात सर्व जातींच्या अनाथ बालकांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नवीन आदर्श निर्माण केला.
७. भगवद्गीतेचा प्रसार करणारा ‘गीता परिवार’ !
गीता परिवारने कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये आशु गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने कार्य केले. ‘घर बसल्या भगवद्गीता शिका’, याचे आयोजन करण्यात आले. स्वामींजींच्या द्वारे स्थापन झालेल्या गीता परिवाराच्या माध्यमातून भगवद्गीतेच्या प्रसाराचे कार्य ३८ वर्षे चालू आहे. हा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ चालू झाल्यानंतर त्यात वाढ झाली आहे. अमेरिका, दुबई, ओमान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसह एकूण १० देशांमधील लोक भगवद्गीता शिकत आहेत. यामध्ये हिंदी, इंग्रजी, मल्याळम्, तमिळ, ओडिया, बंगाली, कन्नड, तेलुगू, आसामी यांसह १३ वेगवेगळ्या भाषांमध्ये गीता शिकवली जात आहे. त्या माध्यमातून गीतेचा प्रचार-प्रसार चालू झाला आहे. यामध्ये ८ सहस्रांहून अधिक कार्यकर्ते आहे. गीता संस्कृतमध्ये शिकण्यासाठी पूर्वी कोणतेही माध्यम उपलब्ध नव्हते; पण सध्या ही यंत्रणा विनामूल्य उपलब्ध आहे. परीक्षा दिल्यानंतर प्रमाणपत्रही घरी विनामूल्य पोचते. या गीतेचा प्रचार-प्रसार संत ज्ञानेश्वरमाऊलींच्या कृपेने चालू आहे.