बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन !
१ अ. गोपाळकृष्ण आपल्या हातात सदा मुरली बाळगतो. त्याचे कारण काय ? : ‘ज्ञानी पुरुषांच्या वागण्यात बोधच भरलेला असतो. त्यामुळे श्रीकृष्णाने हातांत मुरली धरण्याचा विद्वान लोकांनी असा अर्थ काढला आहे की, मानव देह मुरलीप्रमाणे आहे. मुरलीप्रमाणे देहालाही २ डोळे, २ नाकपुड्या, २ कान आणि तोंड, अशी ७ रंध्रे आहेत. मुरली जशी आपल्या गुणाने सहवासात आलेल्या माणसांना गुंग करून टाकते, तद्वत् मनुष्यही आपल्या सद्गुणांच्या योगे जगाला गुंग करू शकतो; परंतु मुरली जशी पोटातील कपट टाकून देऊन निर्मळ बनली आहे, तद्वत् मनुष्यानेही कपटाचा त्याग करून पवित्र बनले पाहिजे. कृष्ण म्हणतो, ‘ही मुरली निष्कपट असल्यामुळे माझी अत्यंत आवडती झाली आहे. तुम्हीही तिच्याप्रमाणे झालात, तर मला फार फार आवडाल.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘गुरु-शिष्य संवाद’, प्रश्न क्र. ४५)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
‘आपण भगवान श्रीकृष्णाची अनेक चित्रे बघत असतो. त्यांमध्ये आपल्याला श्रीकृष्णाच्या हातांत ‘बासरी’ हे वाद्य पहावयास मिळते. बर्याच जणांना प्रश्न पडतो, ‘ही बासरी कृष्णाच्या हातात आलीच कशी ?’ प.पू. कलावतीआईंना मात्र हा प्रश्न पडत नाही. त्या म्हणतात, ‘‘प्रत्येक ज्ञानी पुरुषाची प्रत्येक कृती ही बोधप्रद आणि ज्ञान देणारी असते.’’
२ अ. श्रीकृष्णाने बासरी वाजवून तिच्या सुरांनी सर्वांना आकर्षित करून घेतले होते ! : ‘बासरी’ हे फार पुरातन वाद्य आहे. बांबूपासून बनवलेले हे वाद्य पूर्ण जगाला मोहिनी घालत आले आहे. आजही आपल्या भारतामध्ये अनेक नामवंत बासरीवादक आहेत. त्यांचे कार्यक्रम जगभर होत असतात. कृष्णाच्या जीवनात बासरी हे वाद्य फार महत्त्वाचे आहे. कृष्णाने अगदी लहानपणी बासरी वाजवून गोप-गोपिकांना, तसेच चरायला नेलेल्या गुरांनाही बासरीच्या सुरांनी आकर्षित करून घेतले. हे बासरीचे सूर जो कुणी ऐकतो, तो क्षणभर सर्व जग विसरून जातो आणि त्यात तल्लीन होतो.
२ आ. बासरीच्या ७ रंध्रांप्रमाणे देवाने माणसालाही व्यक्त होण्याची ७ इंद्रिये दिलेली असल्याने त्याने त्यांचा योग्य उपयोग करावा ! : प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘‘माणूस हासुद्धा बासरीप्रमाणेच आहे. बासरीला जशी ७ रंध्रे असतात, त्यांतून सप्तसूर प्रगट होतात आणि आपल्या ज्ञानेंद्रियांना अन् हृदयाला रिझवतात, तसेच माणसाने वागले पाहिजे.’’
ज्याप्रमाणे बासरीला ७ रंध्रे किंवा छिद्रे असतात, त्याप्रमाणे माणसालाही २ डोळे, २ कान, २ नाकपुड्या, तोंड, अशी ७ व्यक्त होण्याची इंद्रिये दिलेली असतात. ‘माणूस २ कानांनी काय ऐकतो ? २ डोळ्यांनी काय पहातो ? काय खातो ? श्वास कसा घेतो ?’, यांवर माणसाचे आणि त्याच्या आजूबाजूच्या समाजाचे सुख-दुःख अवलंबून असते.
‘माणसाने नेहमी चांगले बोलावे. ‘कुणाचे मन दुखावेल’, असे बोलू नये; कारण शब्द हे बाणासारखे असतात. आपले शब्द जर दुसर्या माणसाच्या जिव्हारी लागले, तर तो कायमचा दुखावला जातो. त्याचप्रमाणे आपण २ कानांनी चांगलेच ऐकले पाहिजे आणि २ डोळ्यांनी चांगल्या गोष्टीच बघितल्या पाहिजेत’, असे प.पू. कलावतीआई सांगतात.
२ इ. प्रतिकूल परिस्थितीत माणसाने आपले तोंड, कान आणि डोळे बंद करून ठेवल्यास त्याच्या मनावर परिस्थितीचा विपरीत परिणाम होणार नाही ! : या वेळी मला गांधीजींच्या ३ माकडांची गोष्ट आठवते. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका’, हे वाक्य प्रथम १७ व्या शतकात जपानमध्ये उदयास आले अन् नंतर गांधींच्या ३ माकडांच्या दृश्य रूपकांमुळे शांतता आणि सहिष्णुता यांचा संदेश म्हणून जगभरात स्वीकारले गेले. त्या ३ माकडांपैकी एकाने डोळे बंद केले आहेत, दुसर्याने कान बंद केले आहेत आणि तिसर्याने तोंड बंद केले आहे, म्हणजेच जर परिस्थिती प्रतिकूल असेल, तर आपण आपले तोंड, कान अन् डोळे बंद करून ठेवले पाहिजेत. त्यामुळे आपल्या मनावर कुठल्याही घटना किंवा परिस्थिती हिचा विपरीत परिणाम होणार नाही.
२ ई. बासरीच्या सुरांप्रमाणे माणसाने स्वत:च्या वागण्यात माधुर्य आणले पाहिजे ! : ‘जर माणसे माणसाशी माणुसकी ठेवून वागली, तर या जगात सुख आणि शांती नांदेल’, यात काहीच शंका नाही. ज्याप्रमाणे बासरीतून सप्तसुरांच्या माध्यमातून वातावरणात आनंदाची निर्मिती होते, त्याचप्रमाणे असा सात्त्विक माणूस जेव्हा इतरांच्या सहवासात येतो, तेव्हा तो इतरांच्या जीवनात आनंद आणि सुख निर्माण करतो.
एका हिंदी गाण्यात म्हटले आहे,
नज़र वो जो दुश्मन पे भी मेहरबान हो ।
जुबां वो जो इक प्यार की दास्तां हो ।
किसी ने कहा है मेरे दोस्तों ।
बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत कहो ।।
जमाने में सब जिंदगी यूं गुजारें ।
गुलिस्तां में रहती हैं जैसे बहारें ।
ये कहानी यही है जिंदगानी यही है ।
जियो आप औरों को भी जीने दो ।।
प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात माधुर्य आणले पाहिजे. आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि ऐकण्यात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता नसावी. जर आपण आपले वर्तन सुधारले, तर आपल्या सहवासात येणार्या माणसांना त्याचा लाभ होत जातो आणि ती माणसेही आपल्याप्रमाणे मधुर होत जातात.
२ उ. आतून पोकळ असलेल्या बासरीप्रमाणे मनुष्याने हृदयातील वाईट विचार काढून सेवाभाव अंगी आणल्यास तो ईश्वराचा आवडता होईल ! : माणसाच्या मनात कपट, द्वेष, असूया इत्यादी विषारी भाव असता कामा नयेत. हे सर्व भाव विषासारखे दाहक आणि मारक असतात. अशी माणसे वरून पुष्कळ गोड बोलतात; परंतु त्यांच्या हृदयात जहर भरलेले असते. ज्याप्रमाणे बासरी आतून पोकळ असते आणि आपल्यामधील सर्व वाईट शक्ती काढून टाकते, त्याप्रमाणे माणसाने आपल्या हृदयातील या वाईट शक्ती अन् हिंसक भाव काढून टाकले पाहिजेत. ‘सर्वांचे भले कसे होईल ?’, याचा विचार सतत केला पाहिजे. असा विचार मनात आल्यावर माणूस इतरांची सेवा करण्यात धन्यता मानतो. सेवाभावामुळे माणसाचा अहंभाव हळूहळू ओहोटीस लागतो. अहंभाव कमी झालेला असा जीव ईश्वराला आवडू लागतो. ‘माणसाने बासरीप्रमाणे झाले पाहिजे’, असे प.पू. कलावतीआई सांगतात.
२ ऊ. ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाच्या मनाला शांती मिळण्यासाठी सद्गुरुकृपेची अत्यंत आवश्यकता आहे ! : माणसाने आपल्या प्रसन्न आणि सकारात्मक वर्तनाने सर्व जगाला सुख अन् शांती प्रदान केली पाहिजे. सानेगुरुजी म्हणतात, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ।’ जगात प्रेम, शांती आणि आनंद या अत्यंत अप्राप्य अन् दुर्मिळ, अशा गोष्टी आहेत. ‘जगात फार थोड्या लोकांमध्ये स्वार्थरहित प्रेम आणि आपुलकी पहावयास मिळते’, हे आजच्या युगाचे दुर्दैवच म्हणता येईल.
भगवद्गीतेत श्रीकृष्णाने ‘निष्काम कर्मयोग’ सांगितला आहे; परंतु ‘तो निष्काम कर्मयोग किती माणसे आचरतात ?’, हा मोठा प्रश्नच आहे. ‘आपल्याला काहीतरी मिळावे, आपल्या संपत्तीत आणि सत्तेत वाढ व्हावी’, या विचारांनी आज माणूस वेडापिसा झाला आहे. आज ऐहिक सुखाचे महत्त्व पुष्कळच वाढले आहे. त्यामुळे माणूस शांती हरवून बसला आहे.
हे सर्व जर थांबवायचे असेल, तर सद्गुरुकृपेची अत्यंत निकड आहे. ‘जर प.पू. कलावतीआईं यांच्यासारख्या सद्गुरु लाभल्या, तर माणसाचे भाग्य उजळून निघते आणि माणूस मोक्षाच्या वाटेवरून मार्गक्रमण करू लागतो’, असे मला वाटते.’
– (पू.) किरण फाटक (शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१.१०.२०२३)