आपण जर धर्मपालन केले, तर धर्म आपले रक्षण करतो ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, करवीर पीठ

‘श्रीरामनिकेतन’ येथे भावपूर्ण वातावरणात कीर्तन शताब्दी महोत्सवास प्रारंभ !

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, करवीर पीठ

सांगली – अध्यात्मात आपण जी कृती करतो, त्या माध्यमातून आपण ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी आपला अष्टसात्त्विक भाव जागृत होणे आवश्यक आहे. कीर्तनाच्या माध्यमातून उत्पन्न होणारी भक्ती, ही मनुष्याचा अहंकार दूर करते. धर्म हा सुखाच्या प्राप्तीसाठी आणि अधर्माच्या निवृत्तीसाठी सांगितलेला आहे. सर्व संतांनी ‘धर्माचे पालन कसे करावे ?’, हेच शिकवले आहे. आपण जर धर्मपालन केले, तर धर्म आपले रक्षण करणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण आपला धर्म सोडता कामा नये, असे मार्गदर्शन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी केले. गावभाग येथील ‘श्रीरामनिकेतन’ येथे १३ फेब्रुवारी या दिवशी ‘कीर्तन शताब्दी महोत्सवा’स प्रारंभ झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी प.पू. सद्गुरु जनार्दन महाराज यरगट्टीकर, पावस येथील ‘श्री स्वरूपानंद सेवा मंडळा’चे कार्याध्यक्ष श्री. जयंतराव देसाई, प.पू. सद्गुरु गुरुनाथ कोटणीस महाराज, प.पू. सद्गुरु सदाशिव महाराज नीलवाणी, श्री. अनिल प्रभु केळकर, ह.भ.प. दीपक केळकर यांसह विविध मान्यवर, भाविक-भक्तगण उपस्थित होते. अत्यंत भावपूर्ण आणि भक्तीच्या रसात डुंबण्यास भाग पाडणार्‍या संतांच्या मार्गदर्शनामुळे भाविक-भक्त आनंद अन् चैतन्याच्या रसात ओथंबून गेले. प्रा. नारायणराव आपटे यांनी केलेले सूत्रसंचालन हे सोहळ्याला वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर घेऊन गेले.

प्रारंभी सौ. प्रज्ञा दीपक केळकर यांनी अत्यंत आर्त आणि भावपूर्ण वाणीने केलेल्या ईश्वस्तवनाने, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचा प्रारंभ झाला. ह.भ.प. दीपक केळकर यांनी ज्या विविध ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले, त्यामागची मनोभूमिका अत्यंत मधाळ वाणीत सर्वांसमोर मांडली. या प्रसंगी अनेक वेळा भाव जागृत झाल्याने ह.भ.प. दीपक महाराज यांना भावाश्रू अनावर झाले. प.पू. केळकर महाराज यांच्या परिवारातील एक असलेले ‘कॅनडा’ येथील श्री. अनिकेत केळकर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात ‘कीर्तन तरंगिणी’, ‘आम्ही वैकुंठीचे वासी’ भाग १ आणि २, ‘अधिकस्य अधिकम्’ (१३१ अभंग), ‘पूर्णकळा’, ‘समर्थ मानस’ या ग्रंथांचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

श्री. जयंतराव देसाई (डावीकडे) यांना मानपत्र देतांना ह.भ.प. दीपक महाराज केळकर

प.पू. सद्गुरु जनार्दन महाराज यरगट्टीकर म्हणाले, ‘‘१०० वर्षांची कीर्तन परंपरा चालवण्यासाठी सद्गुरूंची कृपाच असावी लागते. आज प्रकाशित झालेल्या ग्रंथांचे  चिंतन-मनन भाविकांनी करावे. त्यातून त्यांना निश्चितच मार्गदर्शन लाभेल.’’ या प्रसंगी प.पू. सद्गुरु गुरुनाथ कोटणीस महाराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. या प्रसंगी १० भजनी मंडळांच्या माध्यमातून कीर्तनाचा प्रसार करणार्‍या सौ. आशाताई सहस्रबुद्धे यांचा सत्कार करण्यात आला.

२. पावस येथील श्री स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. जयंत देसाई यांना श्रीरामनिकेतनच्या वतीने ह.भ.प. दीपक केळकर यांच्या हस्ते एक विशेष मानपत्र प्रदान करण्यात आले.

३. ग्रंथ प्रकाशनाच्या सेवेत प्रकाशन, लेखन, मुद्रितशोधन, मुद्रण, संगणकीय सेवा यांसह विविध सेवा करण्यात ज्यांनी हातभार लावला अशांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

४. भाविक-भक्तांकडून मधूनमधून ‘राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय’, असा जयघोष करण्यात येत होता.

शताब्दी महोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणी होय ! – जयंत देसाई

श्री. जयंतराव देसाई (डावीकडे) यांना मानपत्र देतांना ह.भ.प. दीपक महाराज केळकर

या प्रसंगी श्री. जयंत देसाई म्हणाले, ‘‘कीर्तन हे समाजमन जागृत करणारे अध्यात्मातील एक अंग आहे. कीर्तनात नाट्य, काव्य, अभिनय, गाणे, नृत्य यांसह विविध प्रकारांचा समावेश असल्याने ते गुण कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यात येतात. आज होणारा शताब्दी महोत्सव म्हणजे प.पू. तात्यासाहेब कोटणीस महाराज यांनी दिलेला आशीर्वाद फलद्रुप होत आहे, असेच म्हणावे लागेल. प.पू. अण्णा महाराज केळकर यांचे बोलणे म्हणजे ओघवता झराच होता, तर ह.भ.प. दीपक केळकर यांच्या वाणीत एक भक्तीचा ओलावा आहे. प.पू. केळकर महाराज यांच्याकडे होत असलेला शताब्दी महोत्सव हा भाविकांसाठीच एक पर्वणीच आहे.’’