सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांतील लिखाणाचे प्रकार
‘मी संकलित केलेल्या ग्रंथांमध्ये लिखाण पुढील ३ प्रकारचे आहे.
१. सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान
साधनेला प्रारंभ केल्यावर ‘ध्यानातून उत्तरे मिळू शकतात’, हे लक्षात आल्यावर मी माझ्या बहुतांश शंकांची उत्तरे ध्यानातून मिळवत असे. त्यामुळे ते सूक्ष्म स्तरावरील ज्ञान पृथ्वीवर कोणत्याही ग्रंथांमध्ये नाही. आता ईश्वराच्या कृपेमुळे सनातनच्या काही साधकांनाही असे ज्ञान मिळू लागले आहे. या अलौकीक ज्ञानाचा सनातनच्या ग्रंथांमध्ये अधिक प्रमाणात समावेश आहे.
२. अन्य ग्रंथांतून मिळालेले ज्ञान
वरील ज्ञान हे सर्वसामान्यांना कळण्यास कठीण असते. त्यांना अध्यात्म मानसिक स्तरावर शिकवणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन मी इतर लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचून त्यातील चांगल्या लिखाणाचा संग्रह करू लागलो.
३. मनात येणारे विचार
साधनेमध्ये ‘काळानुसार साधना’ हा पैलू महत्त्वाचा असतो. त्यामुळे काळानुसार समष्टीची (समाजाची) साधना होण्यासाठी विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याकडून येणारे विचार मी वेळोवेळी लिहून ठेवू लागलो. ते त्या त्या काळात सनातनच्या नियतकालिकांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचत होते. हे विचार साधना करणार्यांसाठी कायमच मार्गदर्शक असल्यामुळे त्यांचाही त्या त्या विषयांच्या ग्रंथांमध्ये अंतर्भाव केला आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
|