महर्षींनी सांगितल्यानुसार रामनाथी, गोवा येथील सनातनतच्या आश्रमात श्री सिद्धिविनायक गणेशमूर्तीची स्थापना होत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
‘महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्री सिद्धिविनायक गणेशमूर्तीची स्थापना झाली. त्या दोन्ही दिवशी मंत्रपठण करतांना साधिकेला आश्रमाच्या समोरच्या शेतात दिसलेल्या दृश्याविषयी येथे दिले आहे.
१. स्थापनेच्या दिवशी
सकाळी १० वाजता मंत्रपठण करत असतांना मला दिसले, ‘शेतात कमळ उमलले आहे. त्यानंतर त्याचे अष्टदल असलेल्या फुलात रूपांतर झाले. कमळाच्या प्रथम ५ पाकळ्या आणि नंतर ८ पाकळ्या झाल्या. फुलाच्या मध्यभागी असलेल्या पाकळीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गणपतीचा हात धरला आहे. त्याच्या खाली उंदीर, ऐरावत (हत्ती), मोर, अशी देवतांची वाहने आहेत. अन्य पाकळ्यांमध्ये अन्य देवता त्यांच्या वाहनासहित होत्या. मोठ्या सिंहासनावर मोठा गणपति बसला आहे. गणपतीच्या उजव्या बाजूला मोठे सुदर्शनचक्र फिरत आहे. गणपतीच्या मूर्तीला ढोल, ताशे, वाजंत्री घेऊन थाटात मिरवणुकीने आणले जात आहे.’ मला हे दृश्य पूर्ण दिवस दिसत होते.
२. दुसर्या दिवशी
अ. मला दिसले, ‘फुलाच्या मध्यभागी उजव्या सोंडेचा गणपति आहे. त्याखाली उंदीर, हत्ती आणि गणपतीच्या दोन्ही बाजूंना हत्तींची (ऐरावताची) रांग होती. समोरच्या ऐरावताच्या सोंडेत फुलाची दांडी आहे. त्याखाली पूर्ण पिसारा फुलवलेला मोर आहे.
आ. माझी दृष्टी जिकडे जाईल, तिकडे स्वस्तिक आणि चक्र दिसत होते. मला ही शुभ चिन्हे अजूनही दिसत आहेत.
इ. मला मंत्रपठणाचा ध्वनी समोरील ‘रेलिंग’च्या पिवळ्या रंगाच्या लाेखंडी नळीतून ऐकू येत होता. मला हा ध्वनी कधी वरील छतातून ऐकू येतो.
मला ही दृश्ये अजूनही दिसतात. मला ही दृश्ये बघून पुष्कळ आनंद होतो. मला दिवसभर उत्साह वाटतो. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– आपली कृपाभिलाषी,
श्रीमती वसुधा कालिदास देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |