श्रीरामनिकेतन येथे १३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत कीर्तन शताब्दी महोत्सव ! – ह.भ.प. दीपक केळकर महाराज
सांगली, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – श्रीरामनिकेतन येथे वर्ष १९२४ पासून गेल्या ४ पिढ्या नित्य अखंड हरिकीर्तन चालू आहे. माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच २५ फेब्रुवारी या दिवशी या नित्य कीर्तनास १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गावभाग येथील श्रीरामनिकेतन (श्री केळकर महाराज मठ) या ठिकाणी कीर्तन शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, प.पू. जनार्दन महाराज यरगट्टीकर, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, श्री. मंदारबुवा रामदासी, ह.भ.प. शरदबुवा घाग यांसह विविध मान्यवरांची प्रवचने, कीर्तने आयोजित केली आहेत, अशी माहिती ह.भ.प. दीपक केळकर महाराज यांनी १० फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सौ. प्रज्ञा दीपक केळकर उपस्थित होत्या.
१. १३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० ते ११ या वेळेत ग्रंथ प्रकाशन सोहळा होणार आहे. यात कीर्तन तरंगिणी, ‘आम्ही वैकुंठीचे वासी’ भाग १ आणि २, अधिकस्य अधिकम् (१३१ अभंग), पूर्णकळा, समर्थ मानस या ग्रंथांचा समावेश आहे. या प्रसंगी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, पावस येथील श्री स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. जयंत देसाई यांसह अन्य मान्यवर उपस्थित असणार आहेत.
२. प्रतिदिन सकाळी ६.३० ते ८.३० नित्य उपक्रम आणि चरित्र वाचन, सकाळी ९.३० ते ११ कीर्तन/प्रवचन आणि सायंकाळी ६.३० ते ७ कीर्तन/प्रवचन, रात्री ८ ते ८.३० नित्यपंचपदी होणार आहे.
३. या निमित्ताने २५ फेब्रुवारी या दिवशी भव्य शोभायात्रा आयोजित केली आहे. ही शोभयात्रा सकाळी ९.३० वाजता श्रीरामनिकेतन येथून प्रारंभ होईल. ती गावभाग पोलीस चौकी, मारुति चौक, बालाजी चौक, गणपति मंदिर, टिळक चौक, विसावा चौक, विष्णु घाटमार्गे परत श्रीरामनिकेतन येथे त्याची समाप्ती होईल. यात हत्ती, घोडे, उंट, वाजंत्री, भजनीमंडळे यांचा समावेश असणार आहे. सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत कीर्तनशताब्दी वर्ष सांगता सोहळा होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. दीपक केळकर महाराज यांनी केले आहे.
वर्ष १९२४ पासून आजपर्यंत श्रीरामनिकेतन येथे कितीही अडचणी आल्या, तरी अखंडितपणे कीर्तन परंपरा चालू आहे. सांगलीला वर्ष २००५, २०१९ मध्ये आलेले महापूर, कोरोना संसर्ग काळ या काळातही ही परंपरा चालू होती. गेली १०० वर्षे कीर्तन होणारा कदाचित् हा भारतातील एकमेव मठ असेल.