संपलेली संवेदनशीलता !
बॉलीवूड अभिनेत्री आणि ‘मॉडेल’ म्हणून ओळखल्या जाणार्या पूनम पांडे हिचे गर्भाशयातील कर्करोगामुळे निधन झाल्याची माहिती तिच्या समूहाकडून देण्यात आली होती. तिच्या व्यवस्थापकाने या संदर्भात सविस्तर लिखाण ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केले होते. दुसर्या दिवशी पूनम पांडे हिने स्वतः ‘मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही’, असे लिखाण इन्स्टाग्रामवर प्रसारित केले. ‘तरुण मुलींनी या आजारावरची लस घ्यावी अन् त्याविषयी लोकांमध्ये चर्चा व्हावी’, यासाठी पूनमने स्वतःच्या मृत्यूचे हे नाटक रचल्याचे तिने मान्य केले; परंतु हे अत्यंत गंभीर आहे. कर्करोगावर जागृती करण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचे नाटक रचणे हे अजिबातच तर्कशुद्ध आणि योग्य नाही. जीवन एवढे स्वस्त झाले आहे का ? ‘महत्प्रयासाने मानवाचा जन्म मिळतो आणि त्यामुळे तो सत्कारणी लावावा लागतो’, हे आपल्या धर्माचे मूळ या अभिनेत्रींना कोण सांगणार ?
पूनमच्या बेताल वक्तव्यांमुळे ती बर्याचदा चर्चेत आली आहे. वर्ष २०११ च्या क्रिकेट ‘वर्ल्ड कप’च्या काळात ‘भारताने वर्ल्ड कपचा अंतिम सामना जिंकला, तर मी स्ट्रिपिंग (निर्वस्त्र होणे) करीन’, असे तिने घोषित केले होते. यानंतर वर्ष २०१२ मध्ये ‘अभिनेते शाहरुख खानचा संघ ‘के.आर्.के.’ जर या वर्षी आय.पी.एल्. चषक जिंकला, तर मी प्रेक्षकांसमोर न्यूड (नग्न) होईन’, असे वक्तव्य तिने केले होते; पण पूनमने नंतर तिचा शब्द फिरवला. त्यानंतरही तिची अशी वक्तव्ये चालूच होती. देशभरात टाळेबंदी असतांना पूनम पांडेने टाळेबंदीचे नियम तोडल्याने तिच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता, तसेच पूनमवर गोव्यात अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे अश्लीलतेला प्रोत्साहन देणार्या, प्रसिद्धीसाठी काहीही करण्यास सिद्ध असणार्या अशा अभिनेत्रीच्या वक्तव्यांवर कितपत विश्वास ठेवायचा ? हे लोकांनीच ठरवायला हवे. लसीविषयीच्या जागृतीपेक्षा ‘केवळ चर्चेत रहाणे आणि प्रसिद्धी यांसाठी पूनम पांडे हिने निधनाचे नाटक केले’, असेच यावरून लक्षात येते.
इतक्या खालच्या थराला जाऊन केवळ प्रसिद्धीसाठी स्वतःच्या मृत्यूचे नाटक करणे, म्हणजे तिच्यामध्ये ‘जीवन, मृत्यू यांविषयी काही संवेदनशीलताच नाही’, असेच म्हणावे लागेल. तसेच गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता असे दायित्वशून्य वागणे, हेही गंभीर आहे. पूनम पांडेला जनतेने याविषयी जाब विचारायला हवा. हे जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. पत्रकार, प्रसिद्धीमाध्यमे यांनीही अशा गोष्टींना प्रसिद्धी देतांना पूनम पांडे हिचा प्रसिद्धीचा हव्यास आणि आतापर्यंत केलेली अर्थहीन अन् अश्लील वक्तव्ये लक्षात घेता यापुढे तिच्या वक्तव्यांमध्ये सत्यता कितपत आहे, हे पडताळून पहायला हवे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे