‘राजगडा’वरील ‘राजसदर’च्या दुरुस्तीचे काम निधीअभावी बंद
काम बंद होणे, हे पुरातत्व विभागाला लज्जास्पद !
पुणे – राज्य सरकार गडकोटांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये संमत केल्याचे घोषित करते; मात्र प्रत्यक्षामध्ये तो निधी समयमर्यादेत विकासकामांना मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील ‘राजगडा’वरील ‘पद्मावती माची’वरील ‘राजसदरे’च्या डागडुजीच्या कामांकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे. ‘राजसदर’च्या दुरुस्तीसाठी पुणे महापालिकेने ५० लाख रुपये दिले होते. हा निधी अल्प पडत असल्याने पुरातत्व विभागाने यासाठी काही निधी व्यय केला; परंतु वर्ष २०१६ पासून निधीअभावी ‘राजसदर’च्या दुरुस्तीचे काम अर्धवट पडून आहे. यामुळे शिवभक्त आणि शिवप्रेमी यांमध्ये अप्रसन्नता आहे.
‘राजसदर’च्या बाहेरील भागांमध्ये शिवकालीन बांधकाम शैलीतील दगडी फरशी बसवण्यात आली आहे.‘राजसदर’मधील सभागृहांमध्ये सध्या मुरुम आणि मातीचे थर घातले आहेत. त्यावर दगडी फरशी बसवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. वर्ष १९९७ मध्ये ‘राजसदर’ची डागडुजी करतांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाखाली तळघर सापडले होते. स्वराज्याच्या मोहिमांच्या मसलती, गुप्त बैठका या तळघरांमध्ये होत असत. तळघराचे बांधकाम दर्जेदार असून ते आजही सुस्थितीमध्ये आहे.
‘राजसदर’कडे दुर्लक्ष
पद्मावती माचीप्रमाणे राजगडाच्या बालेकिल्ल्यावरही छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘राजसदर’ होती. या गडांवर राजवाडा, राजमाता जिजाऊ यांचा ‘राणीमहल’ आदी वास्तू, तसेच ‘राजसदर’ भग्नावस्थेत अवशेष आहेत. या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक आणि शिवप्रेमी यांची आहे.