रायगड येथील युवा साधिका कु. पूजा प्रदीप पाटील यांना एका शिबिरासाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येतांना आणि आल्यावर आलेल्या विविध अनुभूती
‘रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शिबिराला जाण्याआधी मी २५ दिवस ठाणे येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी गेले होते. मला शिबिराचा निरोप मिळाल्यापासूनच मला विविध अनुभूती आल्या.
१. ठाणे सेवाकेंद्रात असतांना शिबिराला येण्याचा निरोप मिळाल्यावर आलेल्या अनुभूती
अ. मला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या खोलीच्या समोर असलेल्या खोलीच्या खिडकीतून २ गरुड दिसले.
आ. मला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या कपड्यांना इस्त्री करायची सेवा मिळाली होती. इस्त्री करतांना मला त्यांचा पूर्ण पायजमा आणि ओढणी यांवर सूक्ष्म चित्रात असतात, तसे पिवळसर गोळे समांतर अंतरावर दिसत होते.
२. रामनाथी आश्रमात येतांना आलेल्या अनुभूती
अ. रामनाथी, गोवा येथे येण्यासाठी रेल्वेमधून प्रवास करतांना मला ‘हनुमंत माझ्या समवेत आहे’, असे वाटत होते.
आ. रामनाथी आश्रम जवळ येत होता, तसा मला पुष्कळ आनंद होत होता. माझी आश्रमावरील कळस पहाण्याची तीव्र इच्छा होती. मला आश्रमावरील कळसांचे दर्शन झाल्यावर आनंद झाला.
इ. रामनाथी आश्रमाच्या जवळ गेल्यावर ‘माझ्या शरिरावरील आवरण गळून पडत आहे’, असे मला जाणवले.
३. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती
३ अ. रामनाथी आश्रमात आल्यावर सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची पुष्कळ आठवण येणे आणि सायंकाळी त्यांचा भ्रमणभाष येणे : रामनाथी आश्रमात आल्यावर मला सद्गुरु अनुताईंची (सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची) पुष्कळ आठवण आली. मला त्यांच्याशी बोलण्याची पुष्कळ इच्छा झाली. तेव्हा सायंकाळी मला त्यांचा भ्रमणभाष आला. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. त्यांनी मला सांगितले, ‘‘प्रार्थना वाढव. म्हणजे तुला शिबिराचा पुष्कळ लाभ होईल.’’ त्याप्रमाणे माझ्याकडून सतत प्रार्थना होत होत्या.
३ आ. रामनाथी आश्रम पहातांना आलेल्या अनुभूती
१. चित्रीकरण कक्षाकडे जाणारी लादी गुळगुळीत वाटत होती.
२. चित्रीकरण कक्षामध्ये डोळे बंद करून उभी असतांना ‘ॐ’कार ध्वनी ऐकू येत होता.
३. संग्रहालयातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांवर झालेली आक्रमणे बघून चक्कर आल्यासारखे झाले. तिथे दुर्गंध येत होता अन् त्याच्या बाजूलाच दैवी पालट झालेल्या वस्तूंच्या जवळ सुगंध येत होता.
४. शिबिरातील पहिल्या दिवशी आलेल्या अनुभूती
४ अ. श्रीकृष्णाच्या चित्राला वाहिलेले फूल शिबिरार्थींकडे वळणे : ८.११.२०२१ या दिवशी शिबिर चालू होण्यापूर्वी मला ‘उदबत्तीने वास्तुशुद्धी करणे आणि श्रीकृष्णाच्या चित्राला फुले वहाणे’, या सेवा मिळाल्या होत्या. शिबिर चालू झाल्यावर एका बाजूचे शिबिरार्थी बोलत असतांना श्रीकृष्णाच्या चित्राला वाहिलेले फूल बोलणार्यांच्या दिशेने वळले. नंतर दुसर्या बाजूचे शिबिरार्थी बोलत असतांना ते फूल त्यांच्याकडे वळून खाली पडले. तेव्हा श्रीकृष्ण ‘शिबिरार्थींकडे वळून त्यांचे बोलणे ऐकत आहे’, असे मला वाटले. तेव्हा मी ‘श्रीकृष्णाच्या चरणांशी बसून हे शिबिर अनुभवत आहे’, असा भाव ठेवला होता.
४ आ. शिबिराच्या दुसर्या सत्राच्या वेळी ‘सभागृहात परात्पर गुरु डॉ. आठवले आले असून ‘प्रकाश पुष्कळ वाढला आहे’, असे जाणवणे, तेव्हा ‘ही तेजतत्त्वाची अनुभूती आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगणे : शिबिराच्या पहिल्या दिवशी एक साधिका भाववृद्धीचा प्रयोग घेत होती. मी डोळे बंद केले होते. तेव्हा मला वाटले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सभागृहात आले आणि वळून परत मागे गेले.’ मी डोळे उघडल्यावर ‘सभागृहातील प्रकाशाचे प्रमाण वाढले आहे’, असे मला जाणवले. तेव्हा समोर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आल्या होत्या. या अनुभूतीविषयी त्या मला म्हणाल्या, ‘‘ही तेजतत्त्वाची अनुभूती आहे.’’
४ इ. सुगंध येणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना मध्येच अष्टगंधाचा सुगंध आला. भावसत्संगाच्या सत्रामध्ये आर्ततेने प्रार्थना करण्याविषयी सांगितले होते. तेव्हा मला मोगर्याच्या अत्तराचा सुगंध आला.
५. शिबिराच्या दुसर्या दिवशी एका सत्संगात देवतांच्या चित्रांचे सूक्ष्म परीक्षण करतांना आणि सत्संग झाल्यावर आलेल्या अनुभूती
५ अ. सनातनच्या सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांच्या खोलीतील देवतांच्या चित्रांचा सूक्ष्म प्रयोग करतांना आलेल्या अनुभूती
१. भगवान शिवाच्या चित्रामध्ये मागे ‘कापराचे मोठे डोंगर आहेत’, असे मला जाणवले.
२. कृष्णाच्या चित्रातून मारक तत्त्व प्रक्षेपित होत असून त्याच्या ‘सुदर्शनचक्रातून पुष्कळ तेज बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले.
५ आ. संतांच्या सत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. संतांच्या सत्संगाच्या वेळी मला पुष्कळ आनंद होत होता. भेट चालू असतांना भेटीसाठी आलेल्या सर्व साधकांची नखे गुलाबी झाली होती.
२. माझ्या उजव्या हाताचा अंगठा आणि तळहात यांवर पिवळसर रंग आला होता.
६. ध्यानमंदिराविषयी आलेल्या अनुभूती !
अ. ९.११.२०२१ या दिवशी ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर मला हलकेपणा जाणवला.
आ. प्राणशक्ती वहन पद्धतीप्रमाणे नामजप शोधून तो करतांना मला वायुदेवतेचा नामजप आला. तेव्हा मला हनुमानाच्या मूर्तीजवळ तीव्र सुगंध येत होता.
७. अन्य अनुभूती
अ. आश्रमात मी कलेच्या संदर्भात सेवा करणार्या साधकांच्या कक्षात बसले असतांना माझ्या डोळ्यांसमोर दैवी कण चमकू लागला.
आ. मी आश्रमात कांदा चिरण्याची सेवा करत होते. घरी कांदा चिरतांना मला ‘नाक गळणे आणि डोळ्यांतून पाणी येणे’, असा पुष्कळ त्रास होतो; पण आश्रमात कांदा चिरतांना माझा अडीच घंटे श्रीकृष्णाचा नामजप झाला आणि डोळ्यांतून एक थेंबही पाणी आले नाही.
८. घरी परत जातांना परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र समवेत असल्यामुळे प्रवासात एकटेपणा न जाणवणे
२०.११.२०२१ या दिवशी घरी परत जातांना मी एकटीच प्रवास करत होते. या आधी मी कधी इतक्या दूरचा प्रवास एकटीने केला नसल्याने मला थोडी भीती वाटत होती. तेव्हा माझ्या समवेत रामनाथी आश्रमातून देवद (पनवेल) येथील आश्रमात देण्यासाठी थोडे साहित्य दिले होते. ‘त्या साहित्यामध्ये गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) छायाचित्र आहे’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. ‘ते छायाचित्र हृदयाजवळ ठेवावे’, असे मला वाटत होते. मी आश्रमापासून रेल्वेस्थानकापर्यंत जातांना ते छायाचित्र हातात घेऊन होते. पुढच्या संपूर्ण प्रवासामध्ये मला एकटेपणा जाणवला नाही.
९. ‘पावसामुळे गुरुदेवांचे छायाचित्र भिजू नये’, यांसाठी श्रीकृष्णाला आळवल्यावर ‘शेषनाग समवेत आहे’, असे जाणवून छायाचित्र न भिजणे
रेल्वेमध्ये चढतांना पुष्कळ जोराचा पाऊस येत होता; म्हणून मी श्रीकृष्णाला पुष्कळ आळवले. ‘गुरुदेवांचे छायाचित्र म्हणजे बाळकृष्ण असून ‘तो पावसात भिजू नये’; म्हणून शेषनाग माझ्या समवेत आहे’, असे मला वाटले आणि छायाचित्र भिजले नाही. तेव्हा माझा हात पूर्ण पिवळसर झाला होता.’
– कु. पूजा प्रदीप पाटील (वय २० वर्षे), जिल्हा रायगड.(२८.११.२०२१)
|