२१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघर येथे भव्य अश्वमेध महायज्ञ !

गायत्री परिवाराच्या वतीने आयोजन !

मुंबई – खारघर सेक्टर २८ मधील सेंट्रल पार्क जवळील कॉर्पोरेट पार्क मैदानात २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ‘भव्य अश्वमेध महायज्ञ’ आयोजित केला जाणार आहे. या भव्य यज्ञासाठी ८० हून अधिक देशांतून भाविक येणार असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या १ कोटीहून अधिक लोकांचा यामध्ये सहभाग असणार आहे.

मंगल कलश यात्रा, १००८ कुंडीय महायज्ञ, दीपयज्ञ, आध्यात्मिक पुस्तकांचे भव्य प्रदर्शन, विविध मान्यवरांचे उद्बोधन, प्रतिदिन सत्संग, रक्तदान, व्यसनमुक्ती शिबिर, भव्य वृक्षारोपण, महाप्रसाद यांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महायज्ञात होणार आहेत. मैदानस्थळी भाविकांना रहाण्यासाठी नरसिंह मेहतानगर, मुक्ताबाई नगर, रामकृष्णनगर, संभाजी महाराज नगर, संत कबीर नगर आदींची निर्मिती करण्यात आली आहे. येथे हिमालयाची भव्यदिव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

खारघर रेल्वे स्थानकाजवळील बेलपाडा या मेट्रो स्थानकाहून यज्ञस्थळाच्या मैदानाजवळ पोचण्यासाठी पेठपाडा मेट्रो स्थानकावर उतरावे लागेल.

‘गायत्री परिवाराच्या युग निर्माण योजने’च्या विचार क्रांती अभियानांतर्गत ‘एक जग, एक विचार, एक कुटुंब आणि एक धर्म – मानव’ या मोहिमेत कुटुंब उभारणी, समाज बांधणी आणि राष्ट्र निर्माण या मार्गावर चालण्याची मोहीम आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग यांच्या उत्तम सरावाने ‘आपण बदलू – युग बदलेल’, हा याचा मूळ उद्देश आहे.