प्रथम पूजेचा श्री गणेशाचा मान !
आज ‘श्री गणेश जयंती’ आणि विनायक चतुर्थी (अंगारक योग) आहे. त्या निमित्ताने…
राष्ट्रपुरुष गणपति !
भृगु ऋषि सोमकांत राजाला गणेश पुराण सांगतांना म्हणाले, ‘महर्षि व्यास प्रत्यक्ष नारायणाचा अंशावतार ! त्यांची प्रज्ञा तेजस्वी होती. त्यांनी संपूर्ण वेदराशीचे ऋक्, यजुः, साम आणि अथर्वण’, असे ४ भाग केले. वेदांचा अर्थ लावला. तेवढ्यात महर्षि व्यास यांना प्रज्ञेविषयी अहंकार उत्पन्न झाला. नंतर त्यांनी पुराणे रचण्यास आरंभ केला; पण ते काम निर्विघ्नपणे पार पडावे; म्हणून प्रारंभी स्मरण केले नाही. त्याचा परिणाम त्यांना एकही ओळ सुचेना; कारण बुद्धी भ्रांतीने वेढली. शेवटी ते ब्रह्मदेवांकडे सत्यलोकात गेले आणि ‘पुराणे रचतांना बुद्धी कुंठित का व्हावी ?’, असे त्यांना विचारले.
१. ब्रह्मदेवांनी महर्षि व्यासांना सृष्टीनिर्माता श्री गणेशाचे पूजन करण्यामागील कारण सांगणे
हे ऐकतांना विस्मयाने पहाणार्या ब्रह्मदेवांनी डोळे मिटले आणि महर्षि व्यास यांना ते म्हणाले, ‘मत्सर, गर्व वगैरे दुर्गुण कार्यनाशास कारणीभूत होतात. याउलट विनयाने प्रारंभलेले काम निश्चितपणे सिद्धीस जाते. हनुमंताला गर्वामुळे दुसर्याचे वाहन व्हावे लागले. क्षत्रियांना परशुरामाच्या परशूमुळे नष्ट व्हावे लागले. अहो, जो या सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता, सर्वसमर्थ, सकल विघ्ननाशक गणपति, त्याचे स्मरण तुम्ही पुराणे रचण्याच्या प्रारंभी गर्वामुळे केले नाही; म्हणून तुमची अशी गती झाली आहे. मी, विष्णु, महादेव आणि इंद्रादि सर्व देवही गणपतीच्याच संकेताप्रमाणे वागतात, हे लक्षात ठेवून श्री गणेशाचे स्मरण करून प्रथम त्याची पूजा करून पुराणे रचायला प्रारंभ करा.’
२. महर्षि व्यास यांनी गणपतीची श्रद्धेने पूजा केल्यावर पुराणे रचली जाणे
त्यावर महर्षि व्यास यांनी श्री गणेशाचे स्मरण कसे करावे, ते सुचत नसल्याने त्यांनी ब्रह्मदेवांना विचारले. ब्रह्मदेवांनी थोडक्यात सांगितले, ‘गणेशाचा मंत्रजप करावा. षडाक्षरी आणि एकाक्षरी मंत्र सर्वश्रेष्ठ आहेत. ज्या ठिकाणी अनुष्ठानामध्ये व्यत्यय येणार नाही, अशा ठिकाणी निष्ठापूर्वक अनुष्ठान करावे. गजानन ॐकार स्वरूपी आहे.’ याप्रमाणे महर्षि व्यास यांनी गणपतीची श्रद्धेने पूजा केली. गजाननाने महर्षि व्यासांवर अनुग्रह केल्यावरच त्यांनी पुराणे रचली.
३. भगवान शिवाने राक्षसांच्या संहारासाठी श्रीविष्णूला गणेशपूजन करण्याविषयी सांगणे
भृगूंनी सोमकांतला श्रीविष्णु आणि मधु अन् कैभट राक्षसांशी झालेल्या युद्धाची कथा सांगितली. श्रीविष्णूंनी आपला महाशंख अत्यंत वेगाने वाजवला. तो ऐकताक्षणीच ते राक्षस विष्णूला म्हणाले, ‘तुला ४ हात आहेत; म्हणून तू मोठा योद्धा नाहीस. खरा योद्धा असशील, तर शस्त्र खाली ठेवून आमच्याशी बाहुयुद्ध कर. हे ऐकताच श्रीविष्णूने शस्त्रे खाली ठेवली आणि बाहुयुद्धास सिद्ध झाले. नानाप्रकारे महायुद्ध झाले. डाव-प्रतिडाव, मुष्टीप्रहार, धडाका यांनी आसमंत गजबजून गेला; पण तिघेही पहिल्या क्षणी होते तसेच अजय राहिले. थोडा वेळ युद्ध थांबवून श्रीविष्णु शंकरांना कैलासामध्ये भेटले आणि मधु-कैभटाशी झालेल्या युद्धाची कथा त्यांना सांगितली.
महादेव म्हणाले, ‘युद्धास प्रारंभ करण्यापूर्वी गणपतिपूजन न केल्यामुळे हा अयोग्य प्रसंग ओढवला.’ नंतर सिद्धीक्षेत्री श्रीविष्णूने गणपतीची तपश्चर्या केली. विधीपूर्वक षडाक्षरी मंत्र जपला. गणपति प्रसन्न झाला. श्री गणेशाने श्रीविष्णूला ‘ते दैत्य तू मारशील, तसेच अन्य कुणी पृथ्वीवर उत्पात केला, तर त्यांनाही तू मारशील’, असा वर दिला. नंतर युद्धात त्या राक्षसांना श्रीविष्णूने ठार मारले.
४. ब्रह्मदेवांनी प्रथम श्री गणेशपूजन करण्यामागील सांगितलेले अनन्य साधारण महत्त्व
ब्रह्मदेव म्हणाले, ‘ज्या वेळी सृष्टीचा लय होतो, त्या वेळी एकटा गजाननच अणूरूपाने अज्ञातस्थळी वास्तव्य करतो. बराच काळ लोटल्यावर ॐ काररूपी श्री गणेश मायेचे साहाय्य घेऊन पुन्हा सर्व सृष्टी निर्माण करतो. सर्व देवादिक, अगदी ब्रह्मदेव, विष्णु आणि शंकर यांनाही गजाननानेच निर्माण केले आहे. तेसुद्धा गजाननाच्या संकेतांनी वागतात. तो गजानन, म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहे. श्री गणेश ही आद्यदेवता म्हणून सर्वप्रथम गणेशपूजेला अग्रस्थान आहे. गणपतीने (ॐकाराने) कुठल्याही देवतेची पूजा केलेली नाही. कोणत्याही देवतेकडे संकटाच्या वेळीसुद्धा साहाय्याची याचना केलेली नाही. स्वतःवरची संकटे युक्तीने स्वतःच नाहीशी केली. देवांनासुद्धा मार्ग दाखवून स्वतः लढाई करून त्यांची संकटे नष्ट केली. विद्यारंभी, विवाहप्रसंगी, युद्धप्रसंगी, गृहप्रवेशाच्या वेळी, प्रवासास निघतांना किंवा संकटकाळी जो गणपतीचे स्मरण मरील, त्यास विघ्नबाधा होणार नाही.’
(साभार : मासिक ‘धार्मिक’, सप्टेंबर २०१७)
राष्ट्रपुरुष गणपति !‘गण म्हणजे मोजलेले जनसमूह ! सुतार, सोनार, लोहार, किसान, व्यापारी, लढवय्ये, कारभारी अशी भिन्न भिन्न कामे करणार्यांचे संघ म्हणजेच गण ! या गणांना एकत्रितपणे काम करण्यास प्रवृत्त करून समस्तांचे म्हणजेच राष्ट्राचे कल्याण साधणारा तो गणांचा ईश होय. गणेश पुराणात राष्ट्राचा कारभार कसा करावा ? याचा आदर्श पाठ घालून दिला आहे. पूर्वी सर्व गण आणि त्यांतील व्यक्ती यांच्या कामांची जंत्री ठेवली जाई. कुणी बेकार रहाणार नाही, हे श्री गणेश पाही, तसेच कामचुकारांकडेही त्याचे लक्ष असे. जो अपंग, व्यथित, शिणलेला असेल, त्याचा ठीक परामर्श घेतला जाईल, अशी व्यवस्था त्यात अद्यारूढ होती. कुणीही व्यक्ती या गणांच्या आणि गण समुहाच्या बाहेर असणार नाही, असे एकूण राष्ट्रीय एकतेचे स्वरूप मानलेले होते. (साभार : मासिक ‘धार्मिक’, सप्टेंबर २०१७) |
श्री गणेशाचे निर्माल्य माहात्म्य !पूर्वी महर्षि पराशरांच्या घरी गजाननांनी अवतार घेतला. त्या ठिकाणी पराशरांनी गजाननाची मूर्ती स्थापून ते तिची नित्य पूजा करू लागले. ब्रह्मा, विष्णु आणि महेश हेसुद्धा गजासुराच्या वधानंतर प्रत्येक रात्री तेथे येऊन हार घालून भक्ती करत. एकदा वीरभद्र राजा तेथे शिकारीसाठी आला. त्याच्या समवेत प्रधान आणि सैन्यही होते. त्याने गणपतीची पूजा तेथेच केली; कारण तो गणपती भक्त होता. तो तेथेच रात्री राहिला. उषःकाली गणेशाची पूजा केली. तेथे स्वर्गीय फुले पाहून तो विस्मित झाला. त्याने सेनेसह रात्र तेथेच जागवली. त्या वेळी त्याला देवदर्शनाची इच्छा झाली. त्या रात्री देवेंद्रासह मुख्य देव आले आणि गजाननाची पूजा करू लागले. राजा लपून पहात होता. तो चकितच झाला. प्रतिदिन रात्री दिव्य फुले येत आणि गुप्तरूपे पूजा होई; परंतु देव त्याला पहायला मिळत नसत; म्हणून तो आपल्या गुरूंना भेटला आणि यामागील रहस्य त्यांना विचारले. गुरु म्हणाले, ‘राजा, निर्माल्याची फुले मंदिरात इतस्ततः आच्छादून त्या ठिकाणी तू रहा. यायोगे तुला देवाचे दर्शन घडेल.’ वीरभद्र राजाने त्याप्रमाणे केले. रात्री इंद्रादी देव आले. नकळत त्यांचा पाय निर्माल्यावर पडला. त्यायोगे ते पुण्यहीन झाले आणि पूजा करून निघून जाऊ लागले; पण त्यांचा वेग अतिशय मंद झाला. कुणालाच याचे कारण समजेना. शेवटी ‘निर्माल्यावर पाय पडला; म्हणून असे घडले’, याची जाणीव त्यांना झाली. त्या वेळी राजाने सर्व देवांना पाहिले. निर्माल्य डोक्यावर घेऊन पाण्यात टाकले. राजाने सर्व देवांचे दर्शन घेऊन त्यांची यथासांग पूजा केली. भगवान शंकरासह इतर देव राजाला म्हणाले, ‘तू स्वार्थाने हे कर्म केले आहेस; पण त्याचे दुःख आम्हाला झाले. आता देवांना पूर्ववत् गती प्राप्त व्हावी; म्हणून श्री गणपतीची आराधना कर.’ राजाने गजाननाचे ध्यान केले आणि देवांना गती लाभावी; म्हणून आपले पुण्य देऊन प्रार्थना केली. मग गणेशाच्या कृपेने देवांना पुन्हा गती प्राप्त झाली. विष्णूसह अन्य देवतांनी राजाला वर मागायला सांगितला. राजा म्हणाला, ‘आपल्या कृपेने माझी गणपतीवर दृढ भक्ती जडो. सर्व देवांनी ‘तथास्तु’ म्हटले आणि देव स्वर्गात निघून गेले. राजा तेथेच राहिला. त्याने आपल्या मुलाला राज्यकारभार करावयास सांगून तो गणेशभक्ती करू लागला. शेवटी त्याला ‘स्वानंदावास’ झाला. (साभार : मासिक ‘धार्मिक’, सप्टेंबर २०१७) |
‘विजयचिन्ह’ असणार्या शेंदूराचा इतिहास !स्वतः गणरायाच्या पराक्रमाचा परामर्श घेता ‘चिंतामणिविजय’ या ग्रंथाचे स्मरण होते. गणपतीने अनेक दैत्यांचा संहार करून पराक्रमाचा आदर्श निर्माण केला आहे. त्याचे पारंपरिक स्वरूपातील लोभस स्वरूप आणि त्याचे मूषक वाहन हे रूपकात्मक आहे. त्यावरून त्या रूपाची टवाळी करणे चूक आहे. ‘गणपति मल्लविद्यानिपुण होता’, हे समजून घ्यायला त्याने सिंदुरासुरासमवेत केलेले मल्लयुद्ध लक्षात घेतले, तरी पुरे ! त्या कुस्तीत गणपतीच्या अंगभर सिंदूर लागला होता. तेव्हापासून शेंदूर हे ‘विजयचिन्ह’ मानले जाऊ लागले. गणराज सर्व विद्यांमध्ये निपुण म्हणून वंदनीय आणि अनुसरणीय मानला पाहिजे. (साभार : मासिक ‘धार्मिक’, सप्टेंबर २०१७) |
गणेशाला ‘गजानन’ नाव कसे पडले ?याविषयी एक कथा आहे. आपल्याला पुत्रप्राप्ती झाली नाही; म्हणून पार्वतीने दुःखी होऊन शंकरास सांगितले, ‘नाथ, पोटी पुत्रसंतान नसल्याने मला सर्व सुखे विषतुल्य वाटत आहेत. मला पुत्रप्राप्तीसाठी काही उपाय सांगा.’ यावर शंकरांनी उत्तर दिले, ‘तू मुळीच चिंता करू नकोस. मी तुला एक व्रत सांगतो, त्याचे तू एक वर्ष पालन कर, म्हणजे प्रत्यक्ष विष्णूसारखा पुत्र होईल.’ शंकरांनी पार्वतीस विष्णूचे व्रत यथासांग सांगितले. त्याप्रमाणे पार्वतीने व्रताचरण केले आणि प्रत्यक्ष विष्णूने प्रकट होऊन ‘तुला माझ्यासारखा तेजस्वी पुत्र होईल’, असा तिला उत्तम वर दिला. नंतर एकदा शंकर-पार्वती कैलासावर बसली असता वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन विष्णु तेथे आला. त्याने मोठ्याने भिक्षा मागितली. शंकर-पार्वती दोघेही बाहेर आले. त्यांनी अतिथीचा यथायोग्य सत्कार केला. त्याला भोजन आणि दक्षिणा देऊन संतुष्ट केले. ‘तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता अगदी समीप आली आहे’, असे सांगून तो ब्राह्मण तेथून गुप्त झाला. नंतर पार्वती आपल्या शयनगृहात आली. तिला शय्येवर एक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी बालक दिसले. त्याला पहाताच पार्वतीने शंकराला अतिथीचा शोध घेण्यास सांगितले. तोच आकाशवाणी झाली, ‘पार्वती ! तो अतिथी प्रत्यक्ष नारायण होता आणि पुत्र म्हणजे ज्याचे सर्वांच्या आधी पूजन होईल, असा सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे !’ हे ऐकून शंकर-पार्वतीला अपार आनंद झाला. त्यांनी पुत्रजन्माचा महोत्सव केला. अनेक दाने दिली. ब्राह्मणभोजनाचा अपूर्व थाट केला. सर्व देवांनी मुलाला आशीर्वाद दिले. तेवढ्यात शनिदेव तेथे आला. तो मुखाने ‘कृष्ण कृष्ण’ असा जप करत होता. त्याने तेथे येऊनही त्या मुलाकडे पाहिले नाही. पार्वतीने ‘तू गणेशाकडे पहात का नाहीस ?’ असे विचारता तो उत्तरला, ‘मी जिकडे पाहीन, तिकडे अनर्थ होईल, असा मला शाप आहे.’ तरीही पार्वतीने त्याला आग्रह केला. शनिदेवाने त्या मुलाकडे क्षणभर पाहिले. तोच त्या बालकाचे शिर तुटले. तेव्हा विष्णूने एका हत्तीचे शिर लावून त्याला पुन्हा जिवंत केले. त्या वेळेपासून पार्वतीच्या या पुत्राचे नाव ‘गजानन’ किंवा ‘गजमुख’ असे पडले. पुढे तेच नाव रूढ झाले. (साभार : मासिक ‘धार्मिक’, सप्टेंबर २०१७) |
वनौषधी दूर्वा !अनलासूर या महाभयंकर राक्षसाच्या आवाजाने पृथ्वी हादरून जायची. त्याच्या डोळ्यांतून आगीच्या ज्वाळा निघत. त्या ज्वाळांमुळे त्याच्यापुढे कुणीही उभे रहात नसे. त्याने देवतांना त्रास देण्यास प्रारंभ केला. देवतांचेही त्याच्यापुढे काहीही चालेना. देवतांनी गणपतीला शरण जायचे ठरवले. त्यांनी त्याचे नामस्मरण करताच गणपति बालरूपात त्यांच्या समोर प्रकट झाला. गणपति हा अनलासुरासमवेत लढाईसाठी गेला. अनलासुराच्या आगीमुळे गणपतीच्या आजूबाजूचे सर्व जळून भस्म झाले. गणपतीशी त्याची घनघोर लढाई झाली. तो बालरूपी गणपतीला गिळण्यासाठी जवळ गेला असता गणपतीनेच अनलासुराला गिळून टाकले. राक्षसाचा नाश झाला खरा; पण त्याला गिळल्याने गणपतीच्या अंगाची आग होऊ लागली. तो गडबडा लोळू लागला. त्याने पाण्यात अंघोळ केली, चंदनाचा लेप लावला; पण तरीही अंगाचा दाह होतच होता. तो काही केल्या थांबेना ! तेव्हा देवांनी गणपतीच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. म्हणून गणपतीला ‘भालचंद्र’ नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमळ गणपतीला दिले; म्हणून गणपतीला ‘पद्मपाणी’ असे म्हणतात. शंकराने स्वतःकडील नाग श्री गणेशाच्या कमरेला बांधला. वरूणाने पाण्याचा अभिषेक केला; पण काही केल्याने दाह थांबेना. शेवटी ऋषिमुनी आले. प्रत्येकाने २१ दूर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली. काय गंमत बघा ! लगेचच गणपतीला बरे वाटले आणि त्याच्या अंगाची लाही शांत झाली. गणपति म्हणाला, ‘माझ्या अंगाची लाही शांत करण्यासाठी देवांनी अनेक उपाय योजिले; परंतु दूर्वांनी अंगाचा दाह न्यून झाला. जो मला दूर्वा अर्पण करील, त्याला सहस्रो यज्ञयाग, व्रते, दाने, तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. या दूर्वा पुष्कळ औषधी आहेत. यांचा रस प्यायल्याने पोटातील दुखणे थांबते.’ (साभार : मासिक ‘सोहम्’, गणेशोत्सव विशेषांक,सप्टेंबर २०१०) |
डोळे, कान आणि नाक या आपल्या इंद्रियांनाही ‘गण’ म्हटले जाते. या गणांचा जो पती (स्वामी) आहे, त्याला प्रसन्न केल्यास जीवनात विघ्ने येणार नाहीत. भौतिक आसक्तीपासून वाचण्यासाठीही श्री गणेशाचे पूजन करा ! (साभार : मासिक ‘ऋषीप्रसाद’) |
अथर्व म्हणजे शांती, स्थिरता, स्थैर्य अन् अचंचलता असा होतो. ‘शीर्ष’चा शब्दश: अर्थ विचारात घेतल्यास ‘अंत’ असा होतो. हे अथर्ववेदाच्या अंती आहे. इतर वेदांना शीर्ष साहित्य आढळत नसल्याने शीर्ष साहित्याला ‘अथर्वशीर्ष’ उपाधी दिली गेली. |