कोल्हापूरचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांवर कायदेशीर कारवाई करा ! – सकल हिंदू समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना
|
कोल्हापूर – करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या मार्गदर्शनातील एका निवडक विधानाचा सोयीस्कर अर्थ काढून शहरातील काही पुरोगामी अकारण वाद निर्माण करत आहेत. शंकराचार्य स्वामी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कुठेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. पुरोगामी लोकांनी हिंदु धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर पीठावर मोर्चाची भाषा करू नये. पुरोगाम्यांनी विनाकारण समाजात वाद निर्माण केल्यास त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, तसेच जे लोक कोल्हापूरचे सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. अनिल दिंडे, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. जयराज भाईराणे, पतीत पावनचे जिल्हाध्यक्ष श्री. आप्पासाहेब बनन्नेवार, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ह.भ.प. यादव महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
शंकराचार्य स्वामी यांनी पुण्यात धार्मिक प्रवचनात गीतेचा एक सिद्धांत दिला होता. यात त्यांनी म्हटले होते की,
१. हिंदु समाज संघटित व्हावा आणि हिंदु धर्मातील लोकांनी मांदियाळीसारखे एकसंघ रहावे. जर लोणच्यामधील एखादा पदार्थ प्रमाणाबाहेर गेला, तर ते लोणचे होत नाही, तसेच त्याची चव रहात नाही. त्या पद्धतीचा हा सिद्धांत आहे.
२. हिंदु धर्माचा पवित्र ग्रंथ गीतेमध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेख आहे. ही व्यवस्था मनुष्यनिर्मित नसून ईश्वरनिर्मित आहे, असाही उल्लेख आहे. सनातन हिंदु धर्म हा पूर्वापारपासूनच वर्णव्यवस्थेवर आधारित आहे. वर्णव्यवस्थेच्या परंपरेमुळे पारतंत्र्याच्या काळात ब्रिटीश भारतात सनातन हिंदु धर्म नष्ट करू शकले नाहीत. वर्णव्यवस्थेचे रूपांतर पुढे जातीव्यवस्थेत झाले. हिंदु धर्मात आता ज्याप्रकारे जातीव्यवस्था आहे, त्याप्रकारे अन्य धर्मांतही जातीव्यवस्था आहे. त्यात नवीन असे काही नाही. असे असूनही आचार्यांनी त्यांच्या व्याख्यानात कोणत्याही अमुक एका जातीचा किंवा जातीयवादाचा उल्लेख केला नाही.
कोल्हापुरात शालेय सहलीच्या बसवर दगडफेक झाल्यावर पुरोगामी कोणत्या बिळात लपून बसले होते ? – हिंदुत्वनिष्ठ संघटना
जेव्हा जेव्हा कोल्हापूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला, तसेच त्यांचा आणि प्रभु श्रीराम यांचा जयघोष करणार्या शालेय सहलीच्या बसवर दगडफेक झाली, तसेच अनेक धार्मिक पेचाचे प्रसंग उद्भवले, तेव्हा हे पुरोगामी कुठे होते ? त्या प्रसंगी एकाही पुरोगाम्याने याचा साधा निषेधही का केला नाही ? त्या वेळी ते कोणत्या बिळात लपून बसले होते ? त्या वेळेस शाहू महाराज यांच्या नगरीची अस्मिता कुठे गेली होती ? केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी शंकराचार्य स्वामीजींच्या विधानाचा जाणीवपूर्वक विपर्यास केला गेलेला आहे, असेही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या निमित्ताने म्हटले आहे.