‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात !
हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
रत्नागिरी, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आज १२ फेब्रुवारी या दिवशी येथील निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुवर्णा सावंत, तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखळकर यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, मनसेचे जिल्हा संघटक श्री. अजिंक्य केसरकर, श्री. प्रवीण बोरकर, श्री. भाई राऊत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विष्णु बगाडे आणि संजय जोशी उपस्थित होते.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, तसेच या दिवशी होणार्या पार्ट्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते, हे या दिवशी होणार्या अनैतिक संबंधांतील वृद्धी दर्शवते; तसेच याच दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात. काही धर्माध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवतात.
निवेदनातील मागण्या
१. १४ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष पथके गस्ती पथके नियुक्त करून महाविद्यालय परिसरात अपप्रकार – करणार्या समाजकंटकांना कह्यात घेणे, वेगाने वाहने चालवणार्यांवर कारवाई करणे आदी उपाययोजना कराव्यात.
२. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने महिलांवर होणार्या अत्याचारांचे प्रमाण पहाता शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी ‘मार्गदर्शक सूचना’ निर्देशित करण्यात याव्यात.
३. संकटकाळात साहाय्य व्हावे; म्हणून युवतींसाठी ‘हेल्पलाईन क्रमांक’ घोषित करावा.