UPI Sri Lanka Mauritius : श्रीलंका आणि मॉरिशस येथील ‘युपीआय’ सेवेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन  

(‘युपीआय’ (‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’) म्हणजे ऑनलाईन व्यवहार करण्याची सेवा)

पंतप्रधान मोदी

नवी देहली – फ्रान्सनंतर आता श्रीलंका आणि मॉरिशस या देशांमध्येही भारताची ‘युपीआय’ (‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’) सेवा प्रारंभ करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सेवेचे उद्घाटन केले. या वेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासह तिन्ही देशांचे सेंट्रल बँकेचे गव्हर्नरही उपस्थित होते. दोन्ही देशांतील लोक आता या सेवेचा वापर करू शकतील. तसेच या देशांतील नागरिक भारतातील नागरिकांसमवेत, तसेच भारतातील नागरिक या दोन्ही देशांतील नागरिकांसमवेत याद्वारे ऑनलाईन व्यवहार करू शकणार आहेत.

मॉरिशसमध्ये ‘रूपे कार्ड’ सेवाही प्रारंभ

‘युपीआय’सहित ‘रूपे कार्ड’सेवेचेही या वेळी उद्घाटन करण्यात आले. ही सेवा मॉरिशसमध्ये चालू करण्यात आली आहे. आता मॉरिशस बँका ‘रूपे’ यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करू शकतील. याद्वारे दोन्ही देशांतील लोक या कार्डद्वारे उपलब्ध सेवांचा वापर त्यांच्या स्वतःच्या देशात, तसेच एकमेकांच्या ठिकाणी करू शकतील.