‘व्हॅलेंटाईन वीक ?’
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !’, असे कवी मंगेश पाडगावकर यांनी कवितेतून सांगितले असले, तरी सध्याच्या प्रेमातसुद्धा बरेच प्रकार निर्माण झाले आहेत. सकाम आणि निष्काम प्रेम हा त्यातील मुख्य भेद. ‘आपल्यावर प्रेम आहे’, असे म्हणणारी व्यक्ती ‘आपल्यावर निष्काम प्रेम करते कि त्यामागे तिचा काही हेतू दडला आहे ?’, हे ओळखणे आजच्या काळात अत्यावश्यक बनले आहे. प्रेमातील फसवणुकीची प्रकरणेही सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’ची सिद्धता
काही जण म्हणतील, ‘प्रेम केले जात नाही, तर ते आपसूकच होते.’ असे असेल, तर प्रतिवर्षी ७ ते १४ फेब्रुवारी या ७ दिवसांत तरुणवर्गामध्ये उत्साहाने साजरा केला जाणारा ‘व्हॅलेंटाईन वीक’चा प्रसार कशासाठी ? हा सप्ताह नेमका प्रेमाचा असतो कि स्वैराचाराचा ? ‘व्हॅलेंटाईन वीक’च्या (कथित प्रेम सप्ताह) स्वागतासाठी भेटवस्तूंची दुकाने या आठवड्यापासून सजली आहेत, वृत्तवाहिन्यांतून सौंदर्यतज्ञांना निमंत्रित करून ‘व्हॅलेंटाईन वीक’साठी मुलींनी कशा प्रकारे सिद्धता करावी ? याविषयीच्या ‘टिप्स’ (सूचना) दिल्या जात आहेत. एका माध्यमाने या काळात ‘जोडप्यांसाठी चांगली उपाहारगृहे कुठली ?’, अशा आशयाची बातमी लावली. अशा गोष्टी ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रोत्साहन देणार्याच ठरतात. ‘महाविद्यालयाच्या आवारा’मध्ये सुद्धा सध्या याच विषयाची चर्चा रंगलेली दिसून येते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे उलटली; मात्र इंग्रजांच्या वैचारिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीच्या जोखडातून आपण अद्याप मुक्त झालो नाही, याचा प्रत्यय प्रतिवर्षी ‘व्हॅलेंटाईन वीक’ चालू झाला की येतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ची ‘क्रेझ’ (वेड) जेवढी भारतात पहायला मिळते तेवढी अन्य पाश्चिमात्य देशांमध्येही क्वचितच असावी. ७ ते १४ फेब्रुवारीपर्यंत विविध ‘डेज’ भारतासारख्या संस्कृतीप्रिय राष्ट्रात तरुण-तरुणींकडून उत्साहाने साजरे केले जातात. शहरातील ही ‘क्रेझ’ हळूहळू ग्रामीण भागातही पसरू लागली आहे.
या दिवसांत अनेक शाळा आणि महाविद्यालय यांच्या आवारात शैक्षणिक वातावरण बिघडवणार्या घडामोडी घडत असतात. परीक्षेच्या सिद्धतेच्या दिवसांत काही चंगळवादी युवक-युवतींची भलतीच सिद्धता चालू असते. ज्याचा परिणाम शाळा-महाविद्यालयांतील अन्य विद्यार्थ्यांवर होत असतो. अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालय प्रशासनही या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, याचे खरेतर नवल वाटते.
मुलींसाठी हानीकारक !
यामध्ये बर्याचदा मुली फसल्या जातात. प्रेमात फसवणूक झाल्याने प्रतिवर्षी कितीतरी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते, तर कितीतरी जणी निराश होऊन मृत्यूला कवटाळतात. मुलींचे मनच मुळात भावनाशील असल्याने प्रेमात योग्य किंवा अयोग्य अशी वर्गवारी करणे प्रत्येकीला जमतेच असे नाही. मुलींच्या या वयातील भावनांचा लाभ घेणारी, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करणारी राक्षसी प्रवृत्तीची माणसे आज चहूबाजूंनी पसरलेली आहेत. त्यामुळे आता मुलींना ‘प्रेमात आंधळे होणे’ परवडणारे नाही. लव्ह जिहादची प्रकरणे देशाच्या कानाकोपर्यातून प्रतिदिन उघडकीस येतात.
या दिवसांमध्ये गर्भनिरोधक साधनांचा खपही वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. असल्या विदेशी भोगवादी दिवसांच्या मौजमजेमध्ये काडीमात्र रुची नसणार्या अनेक मुलींना या ‘डे’चा कमालीचा मनस्ताप होतो. ‘रोज डे’ (प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाब देण्याचा दिवस), ‘प्रपोझ डे’ (प्रेमासाठीची मागणी घालण्याचा दिवस), ‘प्रॉमिस डे’ (वचन घेण्याचा दिवस), ‘चॉकलेट डे’ (प्रेम म्हणून चॉकलेट देण्याचा दिवस), ‘व्हॅलेंटाईन डे’ (प्रेमाचा दिवस) आणि कहर म्हणजे ‘किस डे’ (चुंबन घेण्याचा दिवस) यांसारख्या ‘डे’च्या निमित्ताने किशोरवयीन मुलींवर घातला जाणारा दबाव त्यांच्या मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करतो. कितीतरी मुली या दिवसांत वासनांधांच्या खोट्या प्रेमाला भुलतात आणि नंतर त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते.
प्रेमाला भारतीय संस्कृतीने नेहमीच पवित्र आणि उच्च स्थान दिले आहे; मात्र प्रेमाच्या नावाखाली चाललेला जाणारा बाजार अन् स्वैराचार आपल्या संस्कृतीला नक्कीच शोभणारा नाही. असे असतांना ‘व्हॅलेंटाईन वीक’ आपल्या देशात हवा तरी कशाला ?
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.