अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या !
प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अनेकांना प्रभु श्रीरामाच्या दर्शनाशी आस लागली आहे. सहस्रावधी भाविक नियमितपणे दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी, त्यांची यात्रा सुलभ व्हावी, यासाठी या लेखाद्वारे माहिती देत आहोत.
११ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘प्रभु श्रीरामाच्या दर्शनासाठी जातांना काय न्यावे ? दर्शनासाठी किती वेळ मिळतो ? पवित्र क्षेत्राचा आध्यात्मिक लाभ कसा घ्यावा ? निवासव्यवस्था आणि न्याहारी अन् भोजन यांची व्यवस्था’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/763515.html
९. सेवाभावामुळे भंडार्यातील अन्नाला गोडी !
अयोध्येत सर्व भंडार्यांचे आयोजन करणारे हे रामभक्तच आहेत, तसेच हे सर्व सेवा म्हणून करतात. सोलापूर येथून आलेल्या समस्त हिंदु समाजाच्या वतीने २० पुरुष आणि २० महिला १ मास भंडार्यात सेवा करण्यासाठी आल्या आहेत अन् हा भंडारा फेब्रुवारी अखेरपर्यंत असणार आहे. अशा प्रकारे सर्वच भंडार्यांमध्ये विविध ठिकाणचे भाविक सेवेसाठी आले आहेत. त्यामुळे अन्न वाढतांना त्यांच्यात सेवाभाव आणि विनम्रता असते. अन्न वाढणारे आणि ते ग्रहण करणारे दोघेही जयघोष करतात. एकूणच प्रभु श्रीरामाच्या नामाने सर्वजण जोडले जातात. कधी भंडारा मिळाला नाही किंवा भंडार्यातील महाप्रसाद संपला असल्यास अनेक उपाहारगृहांत ७० ते ८० रुपयांमध्ये गरमागरम पोटभर जेवण मिळते.
१०. चोरांपासून सावधान !
अयोध्यानगरीच्या परिसरात भुरट्या चोरांचा वावरही अधिक आहे. कनक महल (सीतेचा विवाह झाल्यानंतर राजा दशरथांनी तिच्यासाठी दिलेला महल) येथे प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत ठिकठिकाणी पाकिटमारांपासून सावध रहाण्याच्या सूचना लावण्यात आल्या आहेत. अयोध्या नगर निगमद्वारेही दिवसभरात मध्ये मध्ये ध्वनीवर्धकाद्वारे चोरांपासून सावध रहाण्याची सूचना दिली जाते. (हे पोलिसांना लज्जास्पद ! अशा वरवरच्या उपाययोजना करण्यापेक्षा पोलीस या समस्येचे मुळासह उच्चाटन का करू शकत नाहीत ? – संपादक) त्यामुळे स्वत:चे साहित्य आजूबाजूला ठेवतांना भाविकांनी सावधगिरी बाळगावी.
११. पाखंडी साधूंच्या आहारी जाऊ नका !
अयोध्यानगरीत ज्याप्रमाणे भाविक येत आहेत, तसे साधूंच्या वेशातील पाखंड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. साधूच्या वेशातील हे पाखंडी चहासाठी, खाण्यासाठी पैसे मागतात. शरयू नदीच्या किनारी अशा प्रकारचे अनेक पाखंडी आहेत.
१२. वानरांपासून सावधान !
अयोध्या परिसरात असंख्य वानर आहेत. रस्त्यावर चालणार्यांच्या हातातील साहित्य वानर पळवून नेतात. त्यामुळे दुकानात खरेदी करतांनाही स्वत:ची बॅग किंवा पिशवी बाजूला ठेवतांनाही ती वानर पळवून नेणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. आम्ही चालत जात असतांना २ युवती प्रसाद घेऊन जात होत्या, त्या वेळी मागून आलेल्या वानराने त्यांतील एका मुलीच्या हातातील प्रसादाचा खोका ओढून नेला, तर रस्त्यावरून हातात प्रसादाची परडी घेऊन चालणार्या महिलेच्या अंगावर वानराने उडी मारली. त्यामुळे घाबरून ती महिला रस्त्यावर कोसळली. यावरून वानरांचा उपद्रव किती आहे, हे लक्षात घेऊन भाविकांनी सावधगिरी बाळगावी.
१३. शरयू नदीवर स्नान !
भाविक शरयू नदीमध्ये स्नानाचा लाभ घेऊ शकतात. राम की पेढी (घाट) येथे भाविकांना स्नानासाठी शरयू नदीचे पाणी घेऊन मोठे कुंड निर्माण करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजताच्या कालावधीत नियमितपणे शरयू नदीतील पाणी त्या कुंडामध्ये सोडले जाते आणि रात्री त्या कुंडातील पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. त्यामुळे सकाळी ७.३० नंतर भाविक शरयु नदीमध्ये स्नानाचा लाभ घेऊ शकतात. सकाळी थंडी अधिक असल्याने अनेक भाविक दुपारी ऊन पडल्यानंतर स्नानासाठी येतात.
१४. अयोध्येतील अन्य धार्मिक ठिकाणे !
औरंगजेबाने अयोध्येतील श्रीराममंदिराचा विध्वंस केला, तेव्हा मंदिरातील श्रीराम पंचायतनाची मूर्ती शरयू नदीत सोडण्यात आली होती. २२० वर्षांनंतर ही मूर्ती सापडली आणि ती मूर्ती आता श्री कालेराम मंदिरात आहे, असा इतिहास सांगितला जातो. त्यामुळे या मूर्तीला श्रीरामजन्मभूमीच्या मंदिरातील मूळ मूर्ती समजले जाते. त्यामुळे अयोध्यानगरीत श्रीरामजन्मभूमीमध्ये दर्शन घेणारे बहुतांश भाविक श्री कालेराम मंदिरातही दर्शनासाठी येतात. श्री कालेराम मंदिराच्या जवळच श्री नागेश्वरनाथ मंदिर आहे. येथे शिव स्वत: प्रकट झाल्याची आख्यायिका आहे, तसेच हनुमानाचे स्वयंभू स्थान असलेले हनुमानगढी हेही जागृत देवस्थान आहे. यांसह दशरथ महल, कनक महल, शरयू नदीचा घाट आदी अनेक ठिकाणे श्रीराममंदिराच्या जवळ आहेत. भाविकांना ही पहाता येतील.
अयोध्या रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर तेथून रिक्शा करून मुख्य मंदिरापर्यंत पोचता येते. वरील सर्व माहिती प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येणार्या भाविकांसाठी उपयुक्त ठरेल.
(समाप्त)
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’. (५.२.२०२४)