आजारात उपचारांसह उपासना (नामस्मरण) करण्याचे महत्त्व !
कोणत्याही आजारात उपचारांसह उपासना करण्याविषयी मी आग्रही असतो. माझ्या जवळपास प्रत्येकच सश्रद्ध रुग्णाला मी याविषयी आवर्जून सांगत असतो किंवा सामाजिक माध्यमांवर लिहित असतो. काही विद्यार्थ्यांनी ‘याला काही ग्रंथाधार आहे का ?’, असा प्रश्न विचारला होता. खरे तर विविध ठिकाणी याचे संदर्भ मिळतात. ते मुळातूनच अभ्यासावे, तरीही सोपे आणि नेमके असे आचार्य भावमिश्रांनी दिलेले थेट संदर्भ देत आहे.
१. व्याधी ३ प्रकारच्या असतात
अ. पूर्वजन्मातील कर्मांमुळे निर्माण होणार्या
आ. त्रिदोषांनी निर्माण होणार्या (वात, कफ आणि पित्त)
इ. पूर्वजन्मातील कर्म + त्रिदोष यांमुळे निर्माण होणार्या
२. कर्मज व्याधी (पूर्वजन्मातील कर्मांमुळे निर्माण होणार्या) कशा ओळखाव्यात ?
ग्रंथांत वर्णन आल्यानुसार लक्षणे असल्यास त्यानुसार उपचार देऊनही जेव्हा म्हणावा तसा फरक पडत नाही किंवा अगदीच दोष कमी सहभागी असूनही व्याधी प्रचंड मोठे रूप धारण करते अथवा पुष्कळच अधिक वेदना होते, तेव्हा बहुतेक वेळा तो पूर्वजन्मातील कर्मांमुळे निर्माण झाला आहे, असे ओळखावे.
३. याचे उपचारांत काय महत्त्व आहे ?
पूर्वजन्मातील कर्मांमुळे निर्माण होणारे रोग हे त्या कर्माचा क्षय झाल्यावर बरे होतात. दोष बिघडल्याने निर्माण होणारे रोग औषधे घेऊन, तर दोन्हींचा सहभाग असलेले रोग औषधे घेऊन आणि कर्मक्षय झाल्यावर मगच बरे होतात.
नामस्मरण हा कर्मक्षयाचा अगदी सोपा उपाय आहे. त्यामुळे औषधांसह नामस्मरण करायला विसरू नये ! संत कबीर म्हणतात, ‘सभी रसायन हम करी नहीं नाम सम कोय । रंचक घट में संचरै सब तन कंचन होय ॥’ नामस्मरणासारखे दुसरे औषध नाही, ज्याचा अल्प संचार शरिरात होताच शरीर जणू सोन्यासारखे तेजस्वी होते !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (८.२.२०२४)