‘सनातन प्रभात’मुळे धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील व्हायला हवे, याची जाणीव झाली ! – दीपक अर्जुनसिंह देवल, श्री मरुधर विष्णु समाजाचे संयोजक

दैनिक ‘सनातन प्रभात’चा द्वितपपूर्ती (२४ वा वर्धापनदिन) सोहळा उत्साहात साजरा !

डावीकडून श्री. गोविंद भारद्वाज, दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. दीपक अर्जुनसिंह देवल

रत्नागिरी, ११ फेब्रुवारी (वार्ता.) : दैनिक ‘सनातन प्रभात’ने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षांत पदार्पण केले याविषयी अभिनंदन ! दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून धर्म आणि संस्कृतीचे विचार वाचायला मिळतात. वर्तमानपत्राच्या माध्यमातून धर्म वाचायला मिळावा, अशी हिंदूंची आजही मानसिकता नाही. वर्तमानपत्रातून राजकीय, सामाजिक घडामोडी, अपघात, आंदोलने, भ्रष्टाचार आदी विषयांवर बातम्या वाचायला मिळतात; मात्र दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव असे वृत्तपत्र आहे, ज्यामधून धर्म, संस्कृती, अध्यात्म याविषयीचे लिखाण येते. छोट्या छोट्या दृष्टीकोनात्मक चौकटीतून, लेखांमधून मुलांचे संगोपन, सण, मानसिक त्रास, वास्तू, विविध कलांविषयी महत्त्वपूर्ण संदेश या दैनिकाच्या माध्यमातून मिळतात. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील व्हायला हवे, याची जाणीव झाली, असे गौरवोद्गार सोहळ्याचे प्रमुख वक्ते श्री मरुधर विष्णु समाजाचे संयोजक श्री. दीपक अर्जुनसिंह देवल यांनी काढले.

शहरातील टी.आर्.पी. जवळील अंबर सभागृहात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त म्हणजेच द्वितपपूर्ती सोहळ्यात श्री. दीपक देवल बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. गोविंद भारद्वाज उपस्थित होते.

विशेषांकाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. दीपक अर्जुनसिंह देवल, सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. गोविंद भारद्वाज

प्रारंभी व्यासपिठावर सद्गुरु सत्यवान कदम आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दैनिकाच्या ‘द्वितपपूर्ती विशेषांका’चे प्रकाशन करण्यात आले. यानंतर द्वितपपूर्तीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे साधक आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. शशिकांत घाणेकर यांनी केले.

श्री. दीपक अर्जुनसिंह देवल पुढे म्हणाले,

१. माझ्याकडे दैनिक २० वर्षे चालू होते; मात्र मी १५ वर्षे दैनिकाचा खर्‍या अर्थाने वाचक आहे. हे दैनिक वाचतांना माझा धर्माकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटला आहे.
२. प्रतिदिनच्या १-२ ओळींच्या किंवा एखाद्या बातमीच्या वाचनाने मी धर्माविषयी जागृत झालो.
३. धार्मिक कार्य करणार्‍यांपर्यंत आपण स्वत:हून पोचले पाहिजे, ते जे सांगतील ते कार्य करण्याचा प्रयत्न करायला हवा, असे वाटायला लागले.
४. प्रथम वर्तमानपत्र वाचनाची सवय निर्माण झाली आणि नंतर थोडी कृती करायला लागलो. यामुळे जीवनातही आमूलाग्र पालट झाले.
५. जीवनामध्ये नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढायला लागली.
६.  दैनिकातील गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून सुंदर आणि शांत विचार मनात येतात.

श्री. दीपक देवल यांनी वाचकांना केलेले आवाहन !

श्री. दीपक देवल

आपल्या परिवारात किंवा मित्रमंडळीत कुणाचा वाढदिवस असल्यास आपण एक प्रयोग करून बघूया. त्या व्यक्तीला भेट म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’ त्याच्या घरी चालू करूया. दैनिक चालू केल्यावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करूया. तुम्हाला सकारात्मकता वाढल्याचे लक्षात येईल.

हिंदु राष्ट्र ही आध्यात्मिक संकल्पना दैनिक ‘सनातन प्रभात’ने स्पष्ट केली ! – सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवान कदम

हिंदु हा शब्द उच्चारणेही ज्या काळात अवघड होते, तेव्हा दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदु राष्ट्राचा, ईश्वरी राज्याचा उद्घोष केला. निर्भीडपणे हिंदु धर्माची बाजू उचलून धरली. कोणतीही चळवळ मोठी करण्यासाठी केवळ ‘फिल्ड’वर उतरून काम करणे एवढेच नसते, तर वैचारिक पातळीवर काम करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. ‘सनातन प्रभात’चे प्रारंभीपासूनच वैचारिक दिशा सुस्पष्ट केली आहे. ‘सनातन प्रभात’ हिंदुत्वनिष्ठांचे हक्काचे व्यासपीठ आहे. आपण करत असलेल्या कार्याला ईश्वराचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधनेविषयी लिखाणही दिले जाते. हिंदु धर्माच्या महानतेची प्रचीती घेता यावी, यासाठी साधना करणे महत्त्वाचे आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचकांना धर्मबोध करून देण्याचे अतुलनीय कार्य करत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ सत्यनिष्ठ आणि निर्भीड वार्तांकन करत आहे. हिंदु धर्म, राष्ट्र, हिंदु बांधव यांवर होणारे आघात यांचे वस्तूनिष्ठ वार्तांकन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून होत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वार्तांकन करून थांबत नाही, तर त्याविषयी जागृती करून उपाययोजना, सुधारणा करण्याकडेही लक्ष देते. हिंदु राष्ट्र ही आध्यात्मिक संकल्पना दैनिक ‘सनातन प्रभात’ने स्पष्ट केली.

या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि अन्य वृत्तपत्र यांमधील फरक सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितला.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समाजमन घडवणारा ‘सनातन प्रभात’ ! – श्री. गोविंद भारद्वाज, ‘सनातन प्रभात’

श्री. गोविंद भारद्वाज

सध्याच्या काळात राष्ट्रीय स्तरावरील वातावरण अत्यंत गढूळ असतांना ‘सनातन प्रभात’ने प्रखर राष्ट्रप्रेमी भूमिका घेतलेली आहे. जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद या समवेत आता धर्मांधांनी अनेक ठिकाणी ‘सर तन से जुदा’ही घोषणा प्रत्यक्षात कृतीत आणली. याविषयीचे वृत्त प्रसारित करतांना ‘सनातन प्रभात’ने कुठलीही भीडभाड न बाळगता जिहादी प्रवृत्तीवर घणाघात केला. धर्मांध ‘पी.एफ्.आय’वर बंदीची मागणी आणि वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘गजवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण करणे) करण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात जागृती करणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे.

लव्ह जिहादच्या विरोधात प्रबोधन आणि विशेषांक काढण्याच्या माध्यमातून जागृती केल्यामुळे अनेक राज्यांत लव्ह जिहादच्या विरोधात कायदा बनवण्यात येत आहे.

केवळ ‘वाचक संख्या जमवणे’ हा ‘सनातन प्रभात’चा उद्देश कधीच नव्हता. ‘कृतीशीलता’ हा ‘सनातन प्रभात’चा मापदंड आहे. आपल्या सर्वांना राष्ट्र आणि धर्महितैषी विचारांचा प्रसार करायचा आहे. ‘ज्योतसे ज्योत जगाते चलो’, याप्रमाणे आपल्याला हिंदु राष्ट्राच्या या ज्योतीचे मशालीत रूपांतर करायचे आहे !

सत्कार आणि सन्मान

१. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये गावचे उद्योजक आणि ‘सनातन प्रभात’चे कृतीशील वाचक श्री. सुनील सहस्रबुद्धे यांनी केला.

२. प्रमुख वक्ते श्री. दीपक अर्जुनसिंह देवल यांचा सत्कार सनातनचे साधक श्री. नामदेव गुळेकर यांनी केला.

३. ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. गोविंद भारद्वाज यांचा सत्कार ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. प्रशांत साठले यांनी केला.

४. दैनिक वितरणाची अनेक वर्षे सेवा करणारे ‘सनातन प्रभात’चे वितरक श्री. अशोक रामचंद्र देसाई आणि श्री. गणेश गोपाळ घडशी यांचा सत्कार प्रमुख वक्ते श्री. दीपक देवल यांनी केला.

वाचकांची मनोगते

♦ श्री. विजयकुमार शिंदे, पावस : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने ज्ञानात आमूलाग्र पालट झाला. धर्मकार्याची जाण दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने होते. देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केलेली आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ परखडपणे बातम्या देणे, त्याचा शेवट करणे. सद्य:स्थितीत आपण एकत्र रहाणे आवश्यक आहे. धर्म आपल्याला एकत्र बांधून ठेवतो. हिंदूंना धर्म सांगण्याचे काम दैनिक ‘सनातन प्रभात’ करते. धर्म जोपासण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ अधिकाधिक जणांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

♦ श्री. प्रशांत साठले, रत्नागिरी : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी कृतीशील होण्याची प्रेरणा मिळते.

क्षणचित्रे

१. वर्धापनदिन सोहळ्याचा प्रारंभ सनातनचे साधक श्री. संतोष धनावडे यांनी केलेल्या शंखनादाने  झाली.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’चे पूजन सनातनचे साधक, तसेच ‘सनातन प्रभात’चे वितरक श्री. दीपक बंडबे यांनी केले, तर पौरोहित्य वेदमूर्ति केतन शहाणेगुरुजी यांनी केले.

३.  दैनिक ‘सनातन प्रभात’चा द्वितपपूर्ती  सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर यांनी केले.

४. या सोहळ्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १५० वाचक आणि हिचिंतक यांची उपस्थिती होती.