दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट !; अकोला येथील उर्दू शाळेच्या गच्चीवर अर्भक आणि मांसाचे गोळे !…

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट !

मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथे उत्तरप्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वरून याविषयीची माहिती दिली आहे. यामध्ये ‘श्री काशीविश्वनाथबाबा यांच्या भूमीतून आलेले उत्तरप्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ यांची पुणे येथील पावनभूमीत भेट घेतली. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली’, असे म्हटले आहे.


अकोला येथील उर्दू शाळेच्या गच्चीवर अर्भक आणि मांसाचे गोळे !

अकोला  – शहरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या गच्चीवर ११ फेब्रुवारी या दिवशी एक नवजात अर्भक आणि ३ मासांचे गोळे आढळून आले. पोलिसांनी अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवले. सकाळी १० वाजता क्रिकेट खेळणार्‍या मुलांचा चेंडू गच्चीवर गेल्याने ती मुले गच्चीवर गेली असता प्लास्टिकच्या पिशवीत हे अर्भक आढळले. ४ ते ५ मासांचे हे अर्भक आहे.


राहाता (अहिल्यानगर) पोलिसांनी पकडला ४५० किलो गांजा !

राहाता (अहिल्यानगर) – शहरातील शनी रस्त्यावर पोलिसांनी मालवाहतूक टेंपोमधून ४०० ते ४५० किलो गांजा पकडला आहे. गांजाची बाजारामध्ये किंमत ४४ लाख ९७ सहस्र आहे. टेंपोची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये २ भ्रमणभाष आढळले. गांजा आणि टेंपो मिळून एकूण ५० लाख २७ सहस्र रुपये मूल्याचा माल पोलिसांनी जप्त केला. (एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडणे, हे सुरक्षा व्यवस्थेला लज्जास्पद !  – संपादक)