‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

वर्ष २०१९ मध्ये श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन या प्रक्रियेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना पुढील दृष्टीकोन दिले.  

१० फेब्रुवारी या दिवशी या सूत्रांचा काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहूया. 

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/763286.html

(भाग ४)

सौ. सुप्रिया माथूर

९. प्रसंग – क्षमायाचना आणि प्रायश्चित्त

९ अ. दृष्टीकोन

१. ‘स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया म्हणजे साधनेचा वेग वाढवण्यासाठी ईश्वराने दिलेली अमूल्य संधी आहे; परंतु या प्रक्रियेत शिकण्यापेक्षा अधिकारवाणी आणि इतरांना शिकवणे या स्वभावदोषांमुळे काहीच साध्य होत नाही.

२. क्षमायाचनेतही परिस्थिती सांगून क्षमायाचना करणे, म्हणजे स्पष्टीकरणच झाले, उदा. ‘माझ्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटले असल्यास क्षमा करा’, अशी वरवरची क्षमायाचना अंतःकरणातून होत नाही. क्षमायाचना ही दोषविरहित आणि त्यामध्ये याचनाच असावी.

३. प्रत्येक चुकीसाठी कठोर प्रायश्चित्त घेतले, तरच प्रयत्नांमध्ये वेग येऊ शकतो. स्थिती लक्षात आणून दिल्यानंतरही जाणीव होत नाही. म्हणजे ‘साधनेची स्थिती गंभीर आहे’, हे जाणून प्रयत्न केले पाहिजेत.

१०. प्रसंग – साधनेचे संस्कार करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत !

श्रीमती अश्विनी प्रभु

१० अ. दृष्टीकोन

१. काहीही साध्य करायचे असल्यास त्याला प्रयत्नांची जोड हवी. केवळ विचाराने ध्येय साध्य होत नाही, उदा. ‘मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे’, असा विचार त्यांच्यापुढे मांडून आपण त्यांच्यासमोर दूरचित्रवाहिनी (टी.व्ही) पहात बसलो, तर साध्य होईल का ? अशा वेळी दूरचित्रवाहिनी (टी.व्ही.) बंद करून त्यांच्यात अभ्यासाचा संस्कार आपणच निर्माण करायचा असतो.

२. प्रयत्न करण्याचा माझा विचार आहे; परंतु प्रत्यक्षात प्रयत्न नाहीत. ‘प्रयत्न का होत नाहीत ?’, याकडे गांभीर्याने लक्ष हवे.

३. प्रत्येक क्षण माझ्यासाठी गुरुपौर्णिमाच आहे. ‘गुरुपौर्णिमेला अखंड नामजप झाला पाहिजे’, असे वाटत असल्यास संपूर्ण वर्ष नामजपाचा संस्कार होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे साध्य होते.

४. ‘संपूर्ण वर्ष ईश्वराच्या समष्टीला कसे समर्पित होऊ ?’, असा विचार सतत असला, तरच कृतीच्या स्तरावरील प्रयत्नांना वेग मिळतो. नकारात्मक विचार केल्यास ईश्वर जे देत आहे, तेसुद्धा स्वीकारता येत नाही. सर्वांनी साधनेचे संस्कार करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.

११. प्रसंग – एका साधकाने माझी चूक सांगितली; म्हणून जाणीवपूर्वक आणि द्वेषबुद्धीने त्याची चूक सांगणे

११ अ. दृष्टीकोन : पूर्वग्रहामुळे अधोगती होते. ‘धडा शिकवणे किंवा सूडबुद्धीचा विचार किती आहे ?’, याचा अभ्यास केला पाहिजे. सर्व विचार सांगून इतरांचे साहाय्य घ्यावे.

१२. प्रसंग – अनेक वर्षे एकच सेवा केल्याने सेवेत अतीआत्मविश्वास आणि तोचतोचपणा यांमुळे सहभाग अन् उत्साह नसणे

१२ अ. दृष्टीकोन

१. अनुभवाच्या अहंमुळे परिपूर्णता अल्प होते. १० वर्षांनंतरही तीच चूक होते. हे अक्षम्य आहे.

२. प्राथमिक टप्प्यात अशी चूक होऊ शकते; परंतु आपण चुकांमधून शिकत नाही, हे यातून लक्षात येते. ‘आपल्यानंतर पडताळणी करणारे कुणी नाही’, असे असल्यास त्याविषयी ‘आपल्यात सतर्कता आणि उत्तरदायित्वाची जाणीव किती आहे ?’, याचे चिंतन झाले पाहिजे.

३. गांभीर्यही पुष्कळ वाढवले पाहिजे. सेवेविषयी अज्ञान असल्यास ते सांगितले पाहिजे; परंतु ठाऊक असूनही आपल्याकडून त्याच चुका झाल्यास आपल्यात कोणत्याच प्रकारे प्रक्रिया (चिंतन, मंथन) होणार नाही; म्हणजे साधनेतील हानी थांबवता येणार नाही आणि अधोगतीचा वेग वाढेल.’  (क्रमशः)

– श्रीमती अश्विनी प्रभु, मंगळुरू