(म्हणे) ‘जाणकार व्यक्तीवर आक्रमण करण्याची झुंडशाही लोकांना न पटणारी !’ – शरद पवार
पुणे – पुण्यात एका जाणकार व्यक्तीवर आणि त्याच्या गाडीवर आक्रमण केले. याचा अर्थ स्पष्ट आहे; मात्र ही झुंडशाही लोकांना पटणारी नाही. व्यक्तीगत आक्रमणे करून काय साध्य होणार ? ज्यांनी देशाला दिशा दिली, देशासाठी कष्ट केले, त्यांच्यावर व्यक्तीगत आक्रमण करणे, हे शहाणपणाचे लक्षण नाही. सत्ता आणि पोलीसदल हातात आहे, त्याचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांची धोरणे सामाजिक ऐक्याला धक्का पोचवणारी आहेत. भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. पूर्वी ‘ईडी’ काय ते ठाऊकही नव्हते. भाजप सत्तेत आल्यानंतर ८ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. यामध्ये एकाही भाजपच्या नेत्याचे नाव नाही. भाजपच्या नेत्यांविरोधातील चौकशी थांबवण्यात आली. याचा अर्थ काय काढायचा ?, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केले. पुणे येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकार निखिल वागळे यांच्यावर आक्रमण केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्ट, कर्तृत्व आणि राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनामुळे इतिहास घडल्याचे संपूर्ण जगाला ठाऊक आहे’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रमुख शरद पावर यांनी या वेळी केले. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आळंदी येथे आले होते. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव करतांना समर्थ रामदासस्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवल्याचा उल्लेख केला. या पार्श्वभूमीवर पवार यांनी वरील वक्तव्य केले. (राजमाता जिजाऊ यांचा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यातील सहभाग कुणी नाकारतच नाही; परंतु ‘समर्थ रामदासस्वामी यांनी छत्रपती शिवरायांना ‘गुरु’ म्हणून मार्गदर्शन करून घडवले’, या सत्य इतिहासाला नाकारून शरद पवार परत परत जातीयवादी विधाने करण्याची एकही संधी सोडत नाहीत ! – संपादक) |
संपादकीय भूमिकापुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांना ‘देशाला दिशा देणारे आणि देशासाठी कष्ट करणारे’ म्हणून शरद पवार यांनी क्रांतीकारक अन् देशभक्त यांचा अवमानच केला आहे ! |