दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

निर्भीडपणे आणि परखड विचार मांडणारे दैनिक ‘सनातन प्रभात’!

श्री. सुहास सप्रे

हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चा मी अनेक वर्षांपासून वाचक आहे, अध्यात्म,शास्त्रशुद्ध धर्माचरण, साधनेद्वारे ईश्वरप्राप्ती अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगणारे वृत्तपत्र, राजकीय घडामोडींवरही निर्भीडपणे परखड विचार मांडणारे संपादकीय ! आरोग्य, शेती, उद्योग, व्यवसाय, कला क्षेत्रांतील उपयुक्त माहिती, जगभरातील पुरातन दुर्लक्षित हिंदु मंदिरे त्यांचा सचित्र इतिहास ! खासकरून मुसलमान कट्टर पंथियांकडून हिंदूंची होणारी अवहेलना, गळचेपीविरुद्ध आवाज उठवणारे एकमेव दैनिक, आताच्या गतीमान, जीवघेण्या स्पर्धेच्या युगात कुप्रथा आणि अनिष्ट समजुतीविषयी योग्य धर्माचरण, सदाचरणासमवेतच मन:शांतीचा वस्तूपाठ या दैनिकाच्या माध्यमातून अनुभवायला निश्चितपणे मिळेल, असेच संस्कारक्षम विचार चिरंतन अनुभवायला मिळोत, दैनिकाच्या वर्धापनदिनानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा ! – श्री. सुहास सप्रे, तळवडे, तालुका राजापूर. (२५.१.२०२४)


प्रत्येक शब्दांत चैतन्य असणारा आणि भावावस्था अनुभवायला देणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा श्री रामलला विशेषांक ! – सौ. साक्षी राजेश जागुष्टे, देवरुख

‘सनातन प्रभात’चा श्री रामलला विशेषांक सकाळीच मिळाला आणि तो पाहूनच मी तो अती उत्साहाने वाचला. प्रचंड चैतन्य प्रत्येक शब्दातून जाणवत होते. एक वेगळीच अनुभूती मी घेत होते.

याआधी मला वाटायचे की, केवळ मंदिर उभारून काय होणार ? अज्ञानात आपण असे विचार करत असतो; पण गुरुमाऊलीच्या संदेशातून जेव्हा राममंदिर स्थुलातून उभे रहाण्याचा कार्यकारणभाव समजला, तेव्हा त्याचे महत्त्व अधोरेखित झाले. माझा भाव अधिकच जागृत झाला. सूक्ष्मपरीक्षणातून रामतत्त्व कसे प्रक्षेपित होत आहे ? हे समजले, तेव्हा भावजागृती होत होती. अंक वाचतांना आतून वेगळाच आनंद होत होता. भव्य असे श्रीराममंदिर, ती मूर्ती, भव्य दिव्य सोहळा राममय अयोध्याच नव्हे, तर संपूर्ण भारत या दिव्य अशा क्षणांची अनुभूती घेत होता. पृथ्वीवर त्रेतायुगच अवतरले होते. प्रचंड सात्त्विकता जाणवत होती. एक दिवस रामराज्याचा अनुभव आपण सर्वांती घेतला. मला तर माझ्याच घरी राम येत आहेत. असा आनंद क्षणोक्षणी मिळत होता.

सनातनच्या या विशेषांकात सोमपुरा घराण्याची माहिती वाचली. १३४ वर्षे न्यायालयीन लढा, तसेच ५०० वर्षे एखादे मंदिर उभे रहाण्यासाठी लढा देणारी आपली संस्कृती ही एक विश्वातील एकमेव घटना. मंदिर उभारणीसाठीच्या असंख्य लढाया याविषयी अतिशय चांगली माहिती अंकातून मिळाली. खरे तर या विशेषांकामुळेच या घटनेचे महत्त्व मला समजले आणि अंक वाचतांना मला गलबलून येत होते. प्रत्येक शब्दांत चैतन्य इतके जाणवत होते की, काही वाचायचे राहू नये; म्हणून मी पुन्हा एकदा वाचला. संग्रही ठेवावा असा हा विशेषांक आहे. अतिशय मौलिक माहिती थोड्या शब्दांत छान मांडली आहे. हे मनोगत लिहितांना पुन:पुन्हा ही भावावस्था अनुभवायला दिल्याविषयी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त करते. कारण ईश्वराप्रती भाव कसा असावा ? आणि त्यातून मिळणारे चैतन्य हे मी ‘सनातन प्रभात’च्या अंकातून आणि गुरुमाऊलींकडून शिकले आहे. तसेच हे रामराज्य यावे; म्हणून जे जे साधक अहोरात्र सेवा करत आहेत त्यांनाही माझा कोटी कोटी प्रणाम । (२५.१.२०२४)

।। जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम ।।


‘सनातन प्रभात’ : हिंदु राष्ट्रासाठी मांडलेला धगधगता यज्ञ !

कु. अन्नदा विनायक मराठे

दैनिक ‘सनातन प्रभात’ रत्नागिरी आवृत्तीचा २४ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. आज उपलब्ध असलेल्या वृत्तपत्रांपैकी हे सर्वोत्तम दैनिक म्हणावे लागेल. एका विशिष्ठ हेतूने चालू झालेले हे दैनिक त्याच्या हेतूपासून तसूभरही ढळलेले नाही. बातमीमागील सत्यता, संयमित भाषा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला देश आणि धर्म यांविषयी असलेला समर्पणभाव ही ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये आहेत.

हिंदु धर्मावर होत असलेली आक्रमणे आणि धर्माच्या मूळ संकल्पनांपासून दूर होत चाललेला हिंदु समाज या पार्श्वभूमीवर ‘सनातन प्रभात’चे कार्य सगळ्यात महत्त्वाचे आहे; कारण धर्मात काय सांगितलेले आहे आणि धर्माला काय अपेक्षित आहे, याविषयी अतिशय योग्य अशी माहिती यातून सातत्याने सांगितली जात असते. त्यासमवेतच अनेक मोठ्या विचारवंतांचे विचार, त्यांचे लिखाण यातून वाचायला मिळते. विविध महापुरुषांची माहिती, त्यांचे कार्य याविषयीची माहितीही यातून सातत्याने दिली जाते.

अशा या हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध असलेल्या या दैनिकाच्या ‘रत्नागिरी आवृत्ती’ला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि हिंदु राष्ट्रासाठी मांडलेल्या या धगधगत्या यज्ञाच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !

– कु. अन्नदा विनायक मराठे, दापोली, जिल्हा रत्नागिरी. (३१.१.२०२४)


राष्ट्रप्रेम वृद्धींगत करणारे ‘सनातन प्रभात’ – श्री. नीलेश राजाध्यक्ष, पाचल, तालुका राजापूर

लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे प्रसारमाध्यम ! ‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे की, जे धर्मजागृतीचे कार्य सदोदित निर्भीडपणे करत आहे. लोकशाहीचा कणा म्हणजे वृत्तपत्र असते. विचारांची स्वतंत्र अभिव्यक्ती त्यातून होत असते हे कार्य केवळ ‘सनातन प्रभात’ या दैनिकातून होत असते. या दैनिकामधून हिंदूंचे संघटन आणि राष्ट्ररक्षण यासाठी अखंडित प्रयत्न चालू आहेत; त्याचा आम्हा सर्व हिंदु धर्मियांना सार्थ अभिमान आणि आदरही आहे. यामधून प्रसारित होणारी वृत्ते वाचून मनात असलेले राष्ट्रप्रेम अधिकच वृद्धींगत होत आहे. संपादकीय सदरातील परखड भाष्य वाचून आम्हा वाचकांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे चिंतन व्हावयास साहाय्य होते. निर्भीड पत्रकारिता कशी असावी ? याचे आदर्श उदाहरण म्हणजे हे दैनिक आहे, असे मला वाटते. रविवारी प्रसिद्ध होणार्‍या पुरवणीतून धर्माविषयीची विशेष माहिती वाचून आम्हा वाचकांच्या ज्ञानात भर पडत आहे, याबद्दल ‘सनातन प्रभात’चे कौतुक करावे तितके कमीच आहे.

अशा धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी वाहून घेतलेल्या या दैनिकाच्या वर्धापनदिनाला पुनश्च मनस्वी शुभेच्छा ! (२५.१.२०२४)


हिंदु समाजाला संजीवनी देणारी सनातनची पत्रकारिता ! – उदय श्रीराम मुळ्ये, केशवसृष्टी, देवरुख

‘सनातन प्रभात’ वृत्तपत्राची निर्मिती ही गोष्ट आधुनिक भारताच्या विकास कार्यामध्ये मोलाचा वाटा ठरणारी दिसत आहे. कारण समाज धार्मिकदृष्ट्या जिवंत ठेवून त्याला संजीवनी देणारी ही सनातनची पत्रकारिता म्हणता येईल. ‘धर्माे रक्षति रक्षित:’ ही उक्ती सार्थ करून व्यक्ती आणि समाज यांच्या उत्थानाकरता हे वृत्तपत्र खर्‍या अर्थाने कार्य करत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांनी स्वत:ची भूमिका सार्थपणे बजावली. वृत्तपत्र हे केवळ बातमी देणारे नसते; कारण बातमीमध्ये ‘बात’ आणि ‘मी’च्या पलीकडे जाऊन विचारांची प्रगल्भता, भविष्याचा वेध, राष्ट्राचे शत्रू, मित्र, वैरी यांची बात करणारे आणि त्यांचा समाचार घेणारे असे हे वृत्तपत्र आहे.

साधनेच्या मुशीतून सत्याचा वेध घेणारे आणि सत्य, सुंदर, सात्त्विकतेचा वेध घेणारे साधकांच्या हातून काम करवून घेणारे हे अनोखे आणि पारदर्शक वृत्तपत्र आहे. धर्मजागृती आणि हिंदूसंघटन, सकल हिंदु समाजाचे हित जोपासणारे आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उद्घोष करणारे सात्त्विक आणि प्रभावी वृत्तपत्र आहे.(२५.१.२०२४)