चित्रदुर्ग (कर्नाटक) येथील सरकारी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये ‘प्री-वेडिंग शूटिंग’ करणारा डॉक्टर बडतर्फ

(‘प्री-वेडिंग शूटिंग’ म्हणजे विवाहपूर्वी वधु-वरांनी केलेले चित्रीकरण)

ऑपरेशन थिएटरमध्ये (ओटीमध्ये) ‘प्री-वेडिंग शूटिंग’

चित्रदुर्ग (कर्नाटक) – येथील भरमसागर सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरला ऑपरेशन थिएटरमध्ये (ओटीमध्ये) ‘प्री-वेडिंग शूटिंग’ केल्याच्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आले. या डॉक्टरने होणार्‍या पत्नीसमवेत येथे शस्त्रकर्म करत असल्याचे चित्रीकरण केले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. या वेळी कॅमेरामन आणि तंत्रज्ञ हसत होते.

डॉक्टरांचा असा बेशीस्तपणा खपवून घेतला जाणार नाही ! – आरोग्यमंत्री

कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी या घटनेवर डॉक्टरांना फटकारले. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले की, सरकारी रुग्णालये लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असून ती वैयक्तिक कामासाठी नाहीत. डॉक्टरांचा असा बेशीस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट करणार्‍या डॉक्टरला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांसह आरोग्य विभागात कार्यरत सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांनी शासकीय सेवेतील नियमांचे पालन करावे.

ऑपरेशन थिएटर काही मासांपासून बंद

चित्रदुर्गाचे जिल्हा आरोग्य अधिकारी रेणू प्रसाद यांनी सांगितले की, अभिषेक नावाच्या या डॉक्टरची एक महिन्यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंगचे शूटिंग झाले होते ते सप्टेंबरपासून वापरात नाही. सध्या तेथे दुरुस्तीचे काम चालू होते.

संपादकीय भूमिका

  • ‘कुठे काय करावे ?’, याचेही भान नसणारे डॉक्टर !