Pakistan Election Results : पाक संसदेत त्रिशंकू अवस्था !
पक्षांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी सैन्याने घेतला पुढाकार
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच तीनही मोठे पक्ष एकमेकांच्या संपर्कात नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्या विरोधात इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तना तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाने देशभर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (‘पी.एम्.एल्.एन्.’) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (‘पीपीपी’) पक्ष आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात कुणाही नेत्याने याला दुजोरा दिलेला नाही.
काही मतदान केंद्रांवर अपप्रकार झाल्यामुळे तिथे पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय पाकच्या निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. पाकच्या संसदेत एकूण २५६ जागा असून त्यात इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ आणि मित्रपक्ष यांना ९२ जागा, नवाझ शरीफ यांच्या ‘पी.एम्.एल्.एन्.’ आणि मित्रपक्ष यांना ७१ जागा, तर बिलावल भुट्टो यांच्या ‘पीपीपी’ आणि मित्रपक्ष यांना ५४ जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे तीनही पक्षांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे.