समर्थ रामदासस्वामींच्या विचारांकडे पाठ फिरवल्याचा दुष्परिणाम !
समर्थ रामदासस्वामींसारख्या राष्ट्रपुरुषांच्या समर्पित जीवनाकडे अन् त्यांनी दाखवलेल्या मार्गदर्शनाकडे आम्ही पाठ फिरवली; म्हणून आमच्या कुकर्माची फळे आजही आम्ही भोगत आहोत. याचे आकलन आमच्या कोणत्याही नेतृत्वाला, विशेषतः परकीय तत्त्वज्ञानाला घट्ट आवळून असणार्यांना अजूनही होत नाही, ही आजच्या व्यवस्थेची दुर्दैवी शोकांतिकाच म्हणावी लागेल. विकृत, विसंगत, अनावश्यक अशा ‘सेक्युलॅरिझम’ (निधर्मी) आणि साम्यवादांच्या विचारांना आम्ही तत्त्वज्ञानाचा मुलामा देऊन पितळेच्या भांड्याला सोन्याचा मुलामा देऊन नाचत आहोत. शंभर नंबरी सोन्यासारखे धार्मिक आणि आध्यात्मिक विश्वकल्याण करू शकणारे तत्त्वज्ञान आमच्याजवळ असतांना आम्ही परकीय विचारांची उसनवारी करून देशाला सर्व प्रकारच्या संकटांत लोटत आहोत. सत्तेचे सिंहासन आम्हास मिळाले; पण त्या सिंहासनाखालची भूमी मात्र सरकत आहे, हे ध्यानी येत नाही. धर्म, संस्कृती अन् हिंदुत्व यांच्या आधारावर सर्व समाज संघटित प्रयत्न करण्याऐवजी तो जातीयवादी, फुटीरवादी कसा होईल, याचाच काळजीपूर्वक प्रयत्न ‘फोडा आणि झोडा’च्या नीतीद्वारे सत्तास्थाने बळकावण्यासाठीच होतांना दिसतो. या देशातील आक्रमक अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणातून स्वार्थी राजकारणाला खतपाणी घातले जात आहे आणि धर्मांतराचे कार्य विशेषतः ईशान्य भारतात गतीने वाढतांना दिसत आहे. प्रचलित सत्तारूढ नेत्यांच्या सत्तेच्या धुंदीमुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होऊन त्यांना समाजात नित्य घडणार्या घटनांचे दुष्परिणाम ध्यानी येत नाहीत. त्यांचा अंध धृतराष्ट्र झाला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासून समर्थ रामदासस्वामी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या काळापर्यंत वेदांत तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळे निवृत्तीपर मार्गावर चालणार्या समाजाला पालटत्या काळाची चाहूल ओळखून समर्थांनी प्रखर यत्नवाद शिकवून प्रवृत्ती मार्गावर आणले. परकीय आक्रमकांनी मांडलेल्या उच्छादाला प्रत्युत्तर म्हणून ‘घटाशी घट, उद्धटाशी उद्धट’, अशी शिकवणूक दिली. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी समाजाला वारकरी पंथाची वाट दाखवली, तर समर्थांनी त्यांना धारकरी बनवून स्वदेश अन् स्वधर्माचे रक्षण करण्याची दीक्षा दिली. कालानुरूप त्या काळी समर्थांनी फार मोठे हिंदूसंघटन निर्माण केले. आजही समर्थांच्या तत्त्वज्ञानानुसार परकीय विचारधारेच्या लाटेला थोपवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात.
– एक धर्मप्रेमी