परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न करून घेतल्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शुद्धीकरण सत्संगांत केलेल्या मार्गदर्शनातील काही महत्त्वाची सूत्रे
१. स्वभावदोष आणि अहं यांमुळे सेवा करतांना साधकांकडून चुका होतात.
२. स्वभावदोष आणि अहं यांमुळे साधक परिपूर्ण अन् भावपूर्ण सेवा करू शकत नाहीत.
३. साधकाकडून झालेली प्रत्येक चूक त्याला ईश्वरापासून दूर नेते.
४. ईश्वरामध्ये एकही स्वभावदोष नाही. त्यामुळे त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करावे लागेल, तरच आपण ईश्वराशी एकरूप होऊ शकतो.
५. स्वतःकडून झालेली चूक पुढे न सांगणारा दोषी आहेच; पण चूक दिसूनही त्याकडे दुर्लक्ष करणाराही तेवढाच दोषी असतो. त्यामुळे लक्षात आलेली चूक लगेच संबंधित साधकाला किंवा आवश्यकतेनुसार उत्तरदायी साधकांना सांगायला हवी.
६. कुठल्याही मार्गाने साधना केली, तरी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाल्याविना आध्यात्मिक प्रगती होत नाही.
७. साधकांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी प्रायश्चित्त घेणे आवश्यक आहे.
‘या मार्गदर्शनातील सूत्रे साधकांना आचरणात आणता यावीत’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी जिल्हास्तरापासून ते केंद्रापर्यंत नियमित चुकांचे सत्संग घ्यायला सांगितले. याचसमवेत ‘गुरुकृपायोगातील अष्टांग साधनेत असलेल्या ८ अंगांपैकी (१. स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन, २. अहं निर्मूलन, ३. नामजप, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६. भावजागृतीचे प्रयत्न, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती) सर्वाधिक महत्त्व स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाला आहे’, असे प.पू. डॉक्टरांनी साधकांच्या मनावर बिंबवून चुकांचे गांभीर्य निर्माण केले. – (सद्गुरु) राजेंद्र शिंदे
४ फेब्रुवारी प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या लेखात ‘परात्पर गुरुदेवांनी विविध प्रसंगातून ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘विचारून घेणे’, या गुणांचे महत्त्व मनावर कसे ठसवले’, याविषयी वाचले. आजच्या लेखात ‘नोव्हेंबर २००३ पासून प.पू. डॉक्टरांनी शुद्धीकरण सत्संग (टीप १) घेण्याची मोहीम चालू केली. या सत्संगांत शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याचा साधनेत जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी झालेला लाभ येथे दिला आहे.
टीप १ : साधकांचे स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी सत्संगात त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगून ‘योग्य काय असायला हवे ?’, ते सांगणे.
(भाग ७)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/761296.html
१. साधकांकडून होणार्या चुकांमुळे त्यांची साधना आणि गुरुकार्य यांची हानी होत असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शुद्धीकरण सत्संग घेणे
प.पू. डॉक्टरांनी शुद्धीकरण सत्संग घेण्याची मोहीम चालू केली. तेव्हा साधकांमध्ये चुकांविषयी गांभीर्य पुष्कळ अल्प होते. ज्यांना अन्य साधकांच्या चुका दिसत होत्या, ते संबंधित किंवा पुढे उत्तरदायी साधकांना त्या चुका सांगत नव्हते. त्यामुळे साधकांची साधना आणि गुरुकार्य दोन्हींचीही पुष्कळ हानी होत होती. ही गोष्ट प.पू. गुरुदेवांना कळली. नोव्हेंबर २००३ पासून त्यांनी स्वतः देवद (पनवेल) येथील आश्रमात साधकांच्या चुकांचे सत्संग घेऊन शुद्धीकरण सत्संग घेण्याची मोहीम चालू केली. मार्गदर्शक म्हणून सेवा करणार्या साधकांकडूनही पुष्कळ आणि अत्यंत गंभीर चुका झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची साधनेत पुष्कळ अधोगती झाली. या सत्संगात प.पू. गुरुदेवांनी साधकांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या आणि ‘योग्य काय असायला पाहिजे ?’, तेही त्यांना सांगितले.
२. मार्गदर्शक साधकांकडून गंभीर चुका झाल्यामुळे त्यांची साधनेत अधोगती होणे; परंतु ज्यांनी मार्गदर्शक साधकांचे आज्ञापालन केले त्यांची साधना होणे
माझ्या मनात आले, ‘मी सर्व सेवा उत्तरदायी साधक सांगतील, तशा करत गेलो. त्यांच्याकडून पुष्कळ चुका झाल्यामुळे त्यांची साधनेत हानी झाली, म्हणजे माझीही साधनेत हानी झाली असणार.’ या विचाराने मला चिंता वाटली. एकदा मी एका शुद्धीकरण सत्संगात प.पू. गुरुदेवांना प्रश्न विचारला, ‘‘आम्ही मार्गदर्शक साधक सांगतील, तशी कृती करत गेलो. त्यांच्या त्या कृती चुकीच्या होत्या, हे या सत्संगात लक्षात आले; पण त्यामुळे माझीही साधनेत घसरण झाली का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नाही. तुम्ही त्यांच्या आज्ञेचे पालन केले. त्यामुळे तुमची साधना झाली; परंतु ज्यांनी चुकीचे सांगितले, त्यांची हानी झाली.’’ हा दृष्टीकोन ऐकल्यावर माझी चिंता दूर झाली; पण यातून ‘उत्तरदायी साधकांनी कुठलीही कृती करतांना विचारपूर्वक आणि विचारून करायला हवी’, हे मला शिकता आले.
३. ज्यांनी साधकांच्या चुका लक्षात आल्यावरही त्या पुढे कळवल्या नाहीत, त्यांचीही साधनेत पुष्कळ हानी होणे
काही साधकांना अन्य साधकांच्या चुका लक्षात आल्या होत्या; परंतु त्यांनी त्या पुढे कळवल्या नाहीत. त्यांच्या या धृतराष्ट्र-गांधारी वृत्तीमुळे त्यांची साधनेत पुष्कळ हानी झालीच; पण गुरुकार्याचीही पुष्कळ हानी झाली. त्या चुका त्यांनी त्या त्या वेळी पुढे कळवल्या असत्या, तर त्या साधकाला चुका टाळण्यासाठी साहाय्य झाले असते. चुका सांगणार्या साधकाची समष्टी साधना होऊन त्याची साधनेत प्रगती झाली असती आणि गुरुकार्याची हानीही टळली असती.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनचे सर्व ठिकाणचे आश्रम, सेवाकेंद्रे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये शुद्धीकरण सत्संग घेणे
प.पू. गुरुदेवांनी शुद्धीकरण सत्संग देवद आश्रमात आणि आश्रमापासून जवळ असलेल्या ठाणे, मुंबई अन् रायगड या जिल्ह्यांसाठी घेतले. त्यानंतर त्यांनी सर्वत्रचे सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे जाऊन शुद्धीकरण सत्संग घेतले.
५. चुकांच्या सत्संगांमुळे साधकांमध्ये झालेले पालट !
अ. साधक स्वतःमधील स्वभावदोष अन् अहं लवकर जाण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या संदर्भातील चुकांची सारणी (टीप २) भरायला लागले.
(टीप २ : दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका आणि त्या मागील स्वभावदोष वहीत लिहून त्यापुढे योग्य कृती लिहिणे.)
आ. साधक स्वतःच्या चुका स्वतःहून सत्संगात सांगायला लागले.
इ. अन्य साधकांकडून झालेल्या चुकाही साधक सांगायला लागले.
ई. कुठलाही उपक्रम राबवल्यानंतर किंवा एखादी सेवा झाल्यानंतर त्यात झालेल्या चुकांचा अभ्यास चालू झाला. साधकांना त्या चुकांमधून शिकता येऊ लागले.
उ. त्या चुकांच्या मागे असलेले स्वभावदोष दूर करण्याचे प्रयत्न चालू झाले.
ऊ. आश्रमातील साधक आश्रमात लावलेल्या फलकावर चुका लिहायला लागले. अनेक साधकांनी स्वतःच्या घरी छोटे फलक ठेवले आणि त्यावर त्यांनी स्वतःच्या चुका लिहायला आरंभ केला.
ए. साधक स्वत:च्या चुकांसाठी प्रायश्चित्त घ्यायला लागले आणि देवाची अन् संबंधित साधकांची क्षमायाचना करायला लागले.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायला शिकवल्यामुळे आध्यात्मिक प्रगती वेगाने होणे
अ. प.पू. गुरुदेवांनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायला शिकवल्यामुळे संस्था स्तरावर सर्वच साधकांना पुष्कळ लाभ झाला.
आ. साधकांमध्ये ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रिये’चे गांभीर्य पुष्कळ वाढले.
इ. साधकांचे स्वभावदोष आणि अहं न्यून झाल्याने साधकांची साधना चांगली होऊ लागली.
परिणामस्वरूप साधकांची आध्यात्मिक प्रगती वेगाने व्हायला लागली. त्याचा दृश्य परिणाम, म्हणजे आतापर्यंत (१.२.२०२४ पर्यंत) १२७ साधक संतपदापर्यंत पोचले असून १ सहस्र ५१ साधक ६० टक्क््यांहून अधिक पातळीचे झाल्यामुळे त्यांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे.
कलियुगामध्ये मानवामध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं आहे. त्यामुळे साधना करून ईश्वरप्राप्ती करून घेणे अत्यंत कठीण आहे; परंतु प.पू. डॉक्टरांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून साधकांना जणू ईश्वरप्राप्तीचा महामंत्रच दिला आहे. यासाठी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने त्यांच्याच चरणी कृतज्ञताभावाने अर्पण !
(क्रमशः पुढच्या रविवारी)
इदम् न मम !’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, देवद आश्रम,पनवेल. (१.८.२०२३)