डॉ. दीपक जोशी यांनी गोवा येथे घेतलेल्या बिंदूदाबन शिबिराच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

‘ढवळी, फोंडा येथे २८, २९ आणि ३०.४.२०२३ या कालावधीत गोवा राज्यातील साधकांसाठी ‘बिंदूदाबन शिबिर’ घेण्यात आले. तेव्हा साधकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

डॉ. दीपक जोशी

१. सौ. अश्विनी अर्जुन खरात, फोंडा

१ अ. घरात अडचणी असूनही गुरुकृपेने शिबिराला जाता येणे : ‘मला शिबिराला जायचे होते; परंतु माझ्या मुलाला ताप येत होता. माझे यजमान श्री. खरात यांनाही कामावर जायचे होते. त्यामुळे ‘मला शिबिराला जायला मिळेल कि नाही’, असे मला वाटत होते. मी देवाला प्रार्थना केल्यानंतर ५ मिनिटांनी मुलाने मला सांगितले, ‘‘आई, तू शिबिराला जा. माझी काळजी करू नकोस.’’ त्या दिवशी यजमानांनाही दुपारी कामावरून घरी लवकर यायला मिळाले. त्यामुळे मला मुलाची काळजी वाटली नाही. ‘प्रार्थना केल्यावर गुरुदेव हाकेला धावून येतात’, याची अनुभूती दिल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.

१ आ. शिबिराच्या आरंभी वाटत असलेली भीती उणावून उत्साह वाढणे : पहिल्या बिंदूदाबन शिबिराच्या वेळी मनात थोडी भीती होती. ‘मला बिंदूदाबनाविषयी काही ठाऊक नसल्याने मला ते जमेल का ?’, असे मला वाटले; परंतु शिबिरात तशी भीती वाटली नाही. डॉ. दीपक जोशी प्रत्येक साधकाला समजावून आणि सोप्या भाषेत सांगत असल्यामुळे मनातील भीती गेली. मला बिंदूदाबन जमू लागले आणि मनाचा उत्साह वाढला.

१ इ. हाताचा अंगठा आणि तर्जनी यांना होणारा त्रास उणावणे : एक वर्षापासून प्रतिदिन पहाटे ५ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत माझ्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांना मुंग्या यायच्या. त्यामुळे मला घरातील कामे करायला अडचण यायची. सर्व कामे सावकाश करावी लागायची; परंतु शिबिराला आल्यापासून माझा हा त्रास उणावला.’

२. श्री. प्रकाश नाईक, बोरी, फोंडा

२ अ. शिबिराला न जाण्याविषयी मनात नकारात्मक विचार येत असतांना गुरुदेवांच्या कृपेने शिबिराला जाता येणे आणि नंतर बिंदूदाबन करता येण्याविषयी आत्मविश्वास निर्माण होणे : ‘मागील शिबिरात ‘आम्हाला मागील बिंदूदाबन शिबिरामध्ये प्रतिदिन सराव करण्यासाठी सांगितले होते; परंतु ‘माझ्याकडून सराव न झाल्यामुळे या वेळी शिबिराला जायला नको’, असे मला वाटत होते; परंतु साधकांनी ‘‘तुम्ही शिबिराला जाऊ शकता आणि आतापासून सराव चालू करा’’, असे सांगितल्यावर गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता वाटली. मी शिबिराला आल्यामुळे मला बरेच शिकता आले आणि माझ्यात ‘मलाही बिंदूदाबन करता येते’, हा आत्मविश्वास निर्माण झाला.

२ आ. शिबिरात सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : शिबिरात एका सत्राला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना करतांना गार वार्‍याची झुळूक आली आणि ती माझ्या पूर्ण शरिरात पसरली. मला शरिराभोवती चांगली स्पंदने जाणवू लागली. काही क्षणांनी मी डोळे उघडल्यावर मला सूक्ष्मातून गुरुदेवांचे दर्शन झाले. ‘गुरुदेव सर्व साधकांकडे पहात आहेत’, असे मला जाणवले. ‘ते साधकांसाठी किती करत आहेत !’, हे पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

३. सौ. शुभांगी च्यारी, मडगाव, गोवा.

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सर्व साधकांकडे लक्ष असल्याची अनुभूती घेता येणे : ‘शिबिराला बसल्यावर माझे गुडघे दुखत होते आणि सराव करतांना मला पाय दुमडता येत नव्हता. त्या वेळी मी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली. त्या वेळी डॉ. दीपक जोशी यांनी मला सांगितले, ‘‘तुम्हाला रुग्ण बनायचे आहे आणि तुमच्यावर इतर साधक बिंदूदाबनाचा सराव करतील.’’ हे ऐकल्यावर माझी भावजागृती झाली आणि ‘मी केलेली प्रार्थना गुरुदेवांपर्यंत पोचली’, असे मला जाणवले आणि ‘प.पू. गुरुदेवांचे सर्व साधकांकडे किती लक्ष आहे !’, हे मला जाणवून त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.’

४. सौ. नूतन पेडणेकर, शिवोली, म्हापसा

४ अ. गेली २५ वर्षे असणारा मांडी घालून भूमीवर बसता न येण्याचा त्रास शिबिरातील उपचारांनी काही प्रमाणात उणावणे : ‘मी तपासणीसाठी शिबिराला आले होते. मला मागील २५ वर्षे एक मिनिटही मांडी घालून खाली भूमीवर बसता येत नव्हते. प.पू. गुरुमाऊली केवळ आपल्या कृपेमुळे डॉ. दीपक जोशी यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासाठी बिंदूदाबनाचे उपाय केले. मी ५ मिनिटे मांडी घालून बसू शकले. ‘गुरुदेवा, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

५. सौ. ज्योती पैंगीणकर, काणकोण

५ अ. मधुमेह आणि गुडघेदुखी यांचा त्रास बिंदूदाबन उपचार आणि पथ्य यांनी उणावून वजनही उणावणे : ‘मला मधुमेह आणि गुडघेदुखी यांचा त्रास होत होता. मार्च २०२३ मध्ये झालेल्या बिंदूदाबन शिबिरामध्ये डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. मी त्यांनी सांगितलेले पथ्य पाळले. डॉक्टरांनी मला ‘२० दिवस जोंधळ्याची भाकरी खाणे आणि भात मुळीच खायचा नाही’, असे सांगितले. तसेच मी आयुर्वेदिक औषध म्हणून कारल्याचे चूर्ण, जांभूळ चूर्ण आणि त्रिफळा चूर्ण हे नियमित घेतले. एक मासानंतर मी शरिरातील साखर (शुगर) तपासल्यावर ती न्यून झाली होती. माझी गुडघेदुखीही ९० टक्के न्यून झाली. माझे वजनही ३ किलो उणावले. यापूर्वी उपचार करूनही गुण येत नव्हता; परंतु या उपचारांनी एक मासात मला गुण आला. याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

६. सौ. सुरेखा देसाई, काणकोण

६ अ. चालतांना होणारा त्रास बिंदूदाबन उपचारांनी ९५ टक्के उणावणे : ‘एक आठवड्यापासून माझ्या उजव्या पायाच्या वरच्या भागात वेदना होत होत्या. मला चालायला त्रास होत होता. त्यामुळे मला २ दिवस कामावरही जाता आले नाही. शिबिराच्या पहिल्या दिवशी माझा त्रास वाढला. मी डॉ. दीपक जोशी यांना मला होणारा त्रास सांगितला. त्यावर त्यांनी बिंदूदाबन आणि इतर उपाय केल्यावर माझा त्रास ८० टक्के उणावला. दुसर्‍या दिवशी ९५ टक्के त्रास उणावला. मला शिबिरामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होता आले. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

७. श्री. विजय गावकर, काणकोण, गोवा.

७ अ. मर्दन केल्यामुळे शरिरावर आलेले अनिष्ट शक्तींचे आवरण नष्ट होऊन शरिरातील चैतन्य वाढल्यामुळे अल्प कालावधीत झोप पूर्ण होऊन उत्साह वाढणे : ‘शिबिरामध्ये ‘अंगाला तेल लावून मर्दन (मॉलीश) कसे करायचे ?’, हे शिकवण्यासाठी मला रुग्ण व्हायला सांगितले. माझ्या शरिरावर मर्दन करण्याचे प्रकार दाखवले. शिबिरार्थींनी सरावही केला. त्या दिवशी माझ्या पूर्ण शरिराला मर्दन केले. आधीच्या २ रात्रींपेक्षा अल्प वेळ झोप लागूनही मला सकाळी लवकर जाग आली अन् उत्साह जाणवत होता. यासंदर्भात डॉ. जोशी यांच्याशी बोलल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मर्दन केल्यामुळे त्रासदायक आवरण नष्ट होऊन तुमच्या शरिरातील चैतन्य वाढले. त्यामुळे अल्प कालावधीत तुमची झोप पूर्ण झाली आणि उत्साह वाढला.’’

८. कु. कल्पिता गडेकर, म्हापसा, गोवा.

८ अ. ‘माझे पाय बर्‍याच दिवसांपासून सुजले होते. बिंदूदाबन केल्यामुळे ती सूज एकदम नाहीशी झाली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २.५.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक