‘श्रोत्यांना कीर्तनाचा आध्यात्मिक लाभ व्हावा आणि शिस्तही लागावी’, यासाठी तत्त्वनिष्ठतेने अन् प्रेमाने प्रबोधन करणार्‍या ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक (पोतदार) !

‘हिंदु धर्मामध्ये कीर्तनाला पुष्कळ महत्त्व आहे. कीर्तन सत्संगाचे एक उत्तम माध्यम आहे. कीर्तनातून समाजाला धर्माचरण, धर्मशिक्षण आणि साधना यांविषयी मार्गदर्शन होऊ शकते; परंतु सध्या काही कीर्तनातून हे ध्येय साध्य होतांना दिसत नाही. काही वेळा कीर्तनात अनावश्यक विनोद केले जातात. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या घराजवळ श्री सिद्ध दत्त मंदिर, दवर्ली येथे दत्तजयंतीच्या उत्सवानिमित्त कीर्तनाचे आयोजन केले होते. १८.१२ ते २६.१२.२०२३ या कालावधीत तिथे ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक (पोतदार) यांचे कीर्तन झाले. मी त्या कीर्तनांना जात होतो. तेव्हा मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक (पोतदार)

१. कीर्तनात श्रोत्यांना आध्यात्मिक लाभ हाेण्याच्या दृष्टीने विषय मांडणे

ह.भ.प. (सौ.) संध्या पाठक त्यांच्या कीर्तनात आवश्यक तेवढेच गायन करत होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी कीर्तनात अनावश्यक विनोद केले नाहीत. त्या कीर्तनातून ‘श्रोत्यांना आध्यात्मिक लाभ व्हावा’, या दृष्टीने विषय मांडत होत्या आणि ‘कीर्तनातून स्वतःला काय लाभ होतो ?’, याविषयी श्रोत्यांना चिंतन करायला प्रवृत्त करत होत्या.

आधुनिक वैद्य मनोज सोलंकी

२. तत्त्वनिष्ठता

‘कीर्तनामध्ये शिस्तीचे पालन व्हावे’, याची त्या काळजी घेत होत्या. त्यांनी ‘कीर्तन चालू असतांना श्रोत्यांनी आपापसांत बोलू नये, भ्रमणभाषचा वापर करू नये आणि कीर्तनासाठी वेळेवर यावे’, यांसाठी प्रबोधन केले.

३. क्षात्रवृत्ती आणि प्रेमभाव

त्यांनी कीर्तनात गंभीर आणि महत्त्वाचा विषय क्षात्रवृत्तीने मांडला. एरव्ही त्या श्रोत्यांशी प्रेमाने बोलून जवळीकही साधत होत्या. त्यामुळे कीर्तनानंतर श्रोते त्यांच्याशी बोलून शंकानिरसन करून घेत होते.

४. व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी प्रबोधन करणे

त्यांनी प्रतिदिन सर्व श्रोत्यांकडून १० मिनिटे सामूहिक नामस्मरण करून घेतले. त्यांनी कीर्तन करतांना सांगितले, ‘‘स्वतः कीर्तनाला येणे’, ही व्यष्टी साधना झाली; पण ‘इतर लोकांना कीर्तनाला बोलावणे किंवा घेऊन येणे’, ही समष्टी साधना आहे.’’

५. वाणीत चैतन्य जाणवणे आणि भावजागृती होणे

कीर्तन करतांना त्या सांगत असलेल्या विषयाशी एकरूप होत होत्या. त्यांच्या बोलण्यात चैतन्य जाणवत होते आणि वातावरण चैतन्याने भारित होत होते. कीर्तन ऐकतांना माझी भावजागृती होत होती. सर्व श्रोतेही लक्ष देऊन कीर्तन ऐकत होते. ‘कीर्तनात किती वेळ गेला ?’, हे कळलेही नाही.

‘ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक (पोतदार) आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मी या कीर्तनाचा लाभ घेऊ शकलो’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– आधुनिक वैद्य मनोज वसंतलाल सोलंकी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ५८ वर्षे), मडगाव, गोवा. (११.१.२०२४)