नागपूर येथील श्री. मु.वा. घुगल यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या चांगल्या अनुभूती !
‘२३.३.२०२३ या दिवशी मला माझ्या कुटुंबासमवेत सनातनचे साधक यांच्या साहाय्याने आणि ईश्वर कृपेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याचा योग प्राप्त झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या चांगल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. रामनाथी आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे
१ अ. आश्रमातील साधकांच्या चेहर्यांवर प्रसन्नता आणि आपलेपणाचा भाव दिसणे : आश्रमाच्या प्रांगणात सर्व साधकांच्या चेहर्यांवर प्रसन्नता आणि आपलेपणाचा भाव दिसत होता. ‘आम्ही नवीन आहोत किंवा बाहेरून आलो आहोत’, असे त्यांच्या चेहर्यांकडे पाहून आम्हाला वाटत नव्महते.
१ आ. आश्रमातील सर्व साधकांचे आचरण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे असणे : सर्व साधक स्वकुटुंबियांप्रमाणे आचरण करत होते. सेवा करणारे आणि सेवा देणारे साधक या सर्वांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे प्रेमभाव आणि आपलेपणाची भावना असल्यामुळे ‘आम्ही पहिल्यांदाच आश्रमात आलो आहोत’, असे आम्हाला जाणवलेच नाही.
१ इ. आश्रमातील सात्त्विक प्रसाद ग्रहण केल्यावर ‘आश्रमातच रहावे’, असे मला वाटले.
२. रामनाथी आश्रम पहातांना आलेल्या चांगल्या अनुभूती
अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वापरलेल्या आरशात दोन्ही डोळ्यांनी पहाता येणे, एरव्ही केवळ एकाच डोळ्याने दिसणे : माझे ‘ब्रेन ट्यूमर’चे शस्त्रकर्म झाले आहे. त्या शस्त्रकर्माच्या ‘साईड इफेक्ट’ मुळे मला केवळ एकाच डोळ्याने दिसते; मात्र आश्रमातील एका विशिष्ट आरशात पहातांना मला एकाच वेळी माझ्या दोन्ही डोळ्यांनी पहाता आले. (हा आरसा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वापरलेला आहे. – संकलक)
आ. आश्रमातील भिंतीला स्पर्श केल्यावर मला ‘सोहम्’ या नादाच्या तरंगांची अनुभूती आली.
इ. आश्रमातील श्रीकृष्णाचे चित्र जिवंत असल्याप्रमाणे जाणवले, तसेच श्रींची (स्वागतकक्षात असलेल्या तैलचित्रातील प.पू. भक्तराज महाराज यांची) दृष्टी सतत आमच्याकडे असल्याचे जाणवले.
ई. मला आश्रमातील वातावरण, वस्तू, साधक आणि इमारत या सगळ्यांमध्ये ‘एक विशिष्ट शक्ती’ असल्याचा अनुभव आला.’
– श्री. मुकेश वा. घुगल, नागपूर (३०.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |