संत आणि भक्त यांचा मोठा मेळावा हा भारताची मूल्ये अन् तत्त्व यांचे मोठे संवर्धन आहे ! – आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, विहिंप
आळंदी येथील ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’
आळंदी (जिल्हा पुणे), १० फेब्रुवारी (वार्ता.) – भक्त आणि संत यांचा हा मोठा मेळावा हे आपल्या देशाची मूल्ये आणि तत्त्वे यांचे मोठे संवर्धन आहे. हा महोत्सव म्हणजे आपली धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्ये अजूनही टिकून आहेत अन् पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत रहातील याची साक्ष आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांतील पवित्र शिकवण पुढे नेण्यासाठी अशा भव्य संमेलनाचे आयोजन केल्याविषयी मी स्वामीजी आणि संपूर्ण ‘गीता परिवार’ यांचा आभारी आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री. आलोक कुमार यांनी येथे केले. येथे चालू असलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवात’ ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर महंत श्री देवप्रसाददास स्वामी महाराज आणि गोवत्स श्री राधाकृष्ण महाराज उपस्थित होते.
श्री. आलोक कुमार म्हणाले की, आपली संस्कृती जपण्यासाठी एकत्र जमलेल्या सर्व स्तरांतील लोकांच्या या भव्य सभेचे साक्षीदार होणे, हा खरोखरच माझा बहुमान आहे. मी अशा आध्यात्मिक संमेलनांना उपस्थित रहाण्यास उत्सुक असतो; कारण आपल्या आत्मशुद्धीसाठी आणि समाजात सकारात्मक पालट घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या नेतृत्वाखाली भक्तांनी ज्ञानेश्वर माऊलींची मानसपूजा पार पाडली. यानंतर पवित्र आरती करण्यात आली. महोत्सवाच्या सोहळ्यांमध्ये श्रीमद्भागवत कथा, वेदशास्त्र संवाद, गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांचे भक्तीरस गायन, कृतज्ञता ग्यापन पर्व आणि गीता परिवार लिखित अन् डॉ. डी.वाय. पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्टस्, पुणे यांनी सादर केलेले महानाट्य ‘यह पुण्य प्रवाह हमारा’ यांसारखे अनेकविध कार्यक्रम पार पडले. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज, म.म. स्वामी श्री प्रणवानंदजी महाराज आणि डॉ. कल्याण गंगवाल यांच्या शुभ उपस्थितीत श्रीमद्भागवत कथा पाठ पार पडला. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी या वेळी उपस्थित नेते आणि १५ सहस्र भक्त यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.