भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !
मंदिर प्रशासन या अनुषंगाने विचार करतांना यामध्ये मुख्यत्वे मध्यम आणि मोठ्या मंदिरांचा विचार केला आहे. लहान मंदिरांमध्ये यांपैकी काही सूत्रे लागू पडू शकतात. मंदिर व्यवस्थापन हा एक मोठा विषय आहे. त्यात मंदिरात भक्त आणि अन्य माध्यमांतून येणारा अर्पण निधी, सोने-चांदी यांच्या मौल्यवान वस्तू, दागिने, दान दिलेल्या भूमी यांचा योग्य विनियोग करणे, त्यांचा हिशोब ठेवणे इत्यादी अनेक सूत्रांचा समावेश होऊ शकतो. तो या लेखाचा भाग नसून केवळ भाविकांच्या दृष्टीने मंदिरांकडून कोणत्या सोयी-सुविधा देता येऊ शकतात ? यांचा विचार केला आहे. भाविकही त्यांच्या ज्ञात मंदिरांमध्ये काही सुविधा नसतील, तर मंदिर न्यास अथवा व्यवस्थापन यांच्याकडे त्यांची मागणी करू शकतात.
४ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मंदिरात दर्शन घेणे, मंदिरांच्या प्रवेशद्वारावर भाविकांना हात-पाय धुण्यासाठी सुविधा, दर्शनार्थींना सुविधा, दर्शनानंतर भाविकांना उपासनेसाठी जागा हवी आणि सुसज्ज ग्रंथालय हवे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/761238.html
६. मंदिरातील धार्मिक विधींची माहिती देणे
मंदिरात केले जाणारे पूजेचे विधी, आरती, अभिषेक, धार्मिक विधी, देवतेच्या उत्सवाच्या वेळी वा अन्य महत्त्वाच्या दिवशी केले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण विधी यांची माहिती मंदिराच्या परिसरात असावी. नियमित केल्या जाणार्या विधींच्या वेळा दिसतील अशा प्रकारे फलकांद्वारे भाविकांना कळण्याची व्यवस्था असावी. ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी अथवा शिवमंदिरात विविध प्रकारचे अभिषेक, लघुरुद्र केले जातात, तसेच पिंडदानादी श्राद्धविधीही केले जातात. देवीच्या मंदिरांमध्ये नवचंडी, शतचंडी यांचे पाठ, होमहवन केले जातात. मंदिरात केल्या जाणार्या विधींचे दरपत्रक आणि ते करू शकणार्या पुजार्यांचे संपर्क क्रमांक तेथे असावेत, जेणेकरून कुणाकडूनही भाविकांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना धार्मिक विधी केल्याचा लाभ होऊ शकेल.
जे धार्मिक विधी मंदिरात केले जातात, त्यांचे शास्त्र, लाभ, ते कसे करतात ? किती वेळ लागतो ? त्याची पूर्वसिद्धता म्हणून भाविकाने
उपवासादी अनुष्ठान असे काय केले पाहिजे ? ही सविस्तर माहिती फलकांद्वारे अथवा मंदिराची पुस्तिका सिद्ध करून त्याद्वारे उपलब्ध केली पाहिजे. डिजिटल फलकांद्वारे माहिती उपलब्ध केल्यास भाविकांना एकाच ठिकाणी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध होते. काही मंदिरे विशिष्ट धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध असतात. त्या स्थानीच ते विधी केल्याचा लाभ अन्य ठिकाणी करण्याच्या तुलनेत अनेक पटींनी मिळतो; मात्र भाविकांना त्यांची माहिती नसल्यामुळे ते या लाभापासून वंचित रहातात. काही मंदिरांमध्ये देवतेला विशिष्ट दान देणे अपेक्षित असते. ती माहिती मंदिराने फलकाद्वारे लावणे अपेक्षित आहे. उदा. देवीला फुल, फळांसह साडी अथवा खण अर्पण करणे.
७. मंदिरातील मूर्तीविषयीची माहिती अवगत करून देणे
काही मंदिरांमध्ये गाभार्यात जाता येते, तर काही मंदिरांमध्ये गाभार्याच्या बाहेरून दर्शन घ्यावे लागते. गाभार्यात देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते. अनेक मूर्ती स्वयंभू असतात. त्या मूर्तींच्या हातात विविध शस्त्रे आणि आजूबाजूला काही देवतांच्या आकृत्या कोरलेल्या आढळतात. प्राचीन मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणात असल्यामुळे मूर्तीवर कोणती धार्मिक चिन्हे आहेत ? त्यांचा अर्थ काय ? कोणत्या आकृत्या मूर्तीवर आहेत ? याची माहिती मंदिरातील पुजार्यांनी खरे तर देणे आवश्यक आहे; पण ती माहिती दिली जात नाही. उदा. तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या शिळेवर माकर्डेंयऋषि उपासना करत असल्याची आकृती आहे. श्री अनुभूतीदेवीने श्री भवानीदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी उलटे टांगून तपश्चर्या केली होती ते चित्र कोरले आहे; चंद्र, सूर्य यांची चिन्हे आहेत, देवीच्या मस्तकी शिवपिंडीचे चिन्ह आहे. ही झाली देवीच्या मूर्तीविषयी माहिती ! महत्त्वाचे म्हणजे तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जाणार्यांपैकी किती जणांना याविषयी माहिती आहे ? हा प्रश्न आहे.
प्राचीन मंदिरांमध्ये विशेष करून मूर्तीचे मूर्तीविज्ञान असल्यास तेही सांगितले पाहिजे. या सर्वांचा लाभ भाविकांची देवतेप्रती भक्तीभावासह जिज्ञासा जागृत करण्यासाठी होतो. नवीन माहिती कानावर पडल्याने ऋषि, देवता यांविषयी भाविकाच्या मनात त्यांनी कशी उपासना केली असेल ? वगैरे प्रश्नही निर्माण होतात आणि तो केवळ दर्शन घेऊन जाण्यापेक्षा आपण स्वतःही कशा प्रकारे देवतेची उपासना केली की, देवता प्रसन्न होईल, याचे चिंतन त्याच्याकडून आपसूकच घडते.
८. भाविकांना प्रसाद
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांना तीर्थ-प्रसाद मिळावा, अशी अपेक्षा असते. हा तीर्थ-प्रसाद भाविकांना देण्याची व्यवस्था असतेच असे नाही. जे भाविक स्वत:समवेत पेढे, साखर फुटाणे नेतात, त्यांनाच त्यातील काही भाग प्रसाद म्हणून दिला जातो. इतरांनी न नेल्यास दिले जात नाही. याऐवजी मंदिराने खराब न होणारा प्रसाद देण्याची व्यवस्था करायला हवी.
उत्तर भारतातील मंदिरांमध्ये रवा, बेसन यांचे लाडू देण्याची पद्धत आहे, तसेच भाविकाला घरी घेऊन जाण्यासाठी अनेक दिवस टिकू शकणारा लाल पेढा विकत घेण्याची सोय मंदिराच्या आवारातच मंदिराकडून केलेली असते. सर्व प्रसाद शुद्ध तुपातील असतो. गुजरात आणि महाराष्ट्र येथील मंदिरांपैकी काही मंदिरांमध्ये अशी व्यवस्था आहे. दक्षिणेतील जवळपास प्रत्येक मंदिरामध्ये दुपारी आणि रात्री विनामूल्य महाप्रसादाची सोय असते. लांबून आलेल्या भाविकांसाठी ही सुविधा चांगली असते. आर्थिक परिस्थितीमुळे ज्या मध्यम आणि मोठ्या मंदिरांना विनामूल्य प्रसाद देणे शक्य नाही, त्यांनी भाविकांना अल्प मूल्यात ती देण्याची व्यवस्थाही केल्याचे अनेक ठिकाणी आढळते.
९. देवतेचे निर्माल्य आणि प्रसादातील साहित्य मिळणे
देवतेला वाहिलेली फुले, फळे अथवा वस्त्र भाविकांना स्वत:कडे देवतेचा स्पर्श झाला असल्यामुळे प्रसाद म्हणून हवी असतात; मात्र मंदिरात ते देण्याची काही व्यवस्था नसते. मंदिरातील फुले, फळे आणि पेढे यांचे काय केले जाते ? हा प्रश्नच आहे. तेच भाविकांना वाटल्यास भाविकांना देवतेचे चैतन्य मिळू शकते. अष्टविनायकांपैकी ओझर येथे मंदिरात निर्माल्यापासून उदबत्ती सिद्ध करण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. जेणेकरून भाविकांना निर्माल्यातील चैतन्याचा लाभ होईल. अन्य ठिकाणी दिवसभरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणार्या निर्माल्याचे विसर्जन तेवढ्या चांगल्या प्रकारे होतेच असे नाही. देवीच्या मंदिरांमध्ये देवीला वाहिलेल्या साड्या, खण मिळण्याची व्यवस्था असते.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (३०.१.२०२४)