संपादकीय : पाकिस्तानची वाटचाल गृहयुद्धाकडे !

भारतात लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतांना शेजारील देश पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागत आहे. या निवडणुकीतील पाकिस्तानच्या लोकशाहीची होती नव्हती ती लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहेत. आतापर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान सैन्याच्या हातातील बाहुले असल्याचे सर्वश्रुत होते; मात्र या निवडणुकीत सैन्याने पाठिंबा दिलेल्या नवाज शरीफ यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीन-नवाज’ या पक्षाला जनतेने खाली खेचले आणि भ्रष्टाचाराच्या आरोप कारागृहात असतांनाही माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाला बहुमत दिले आहे. पाकिस्तानी जनतेने सैन्याला दाखवलेला हा ठेंगा, म्हणजे पाकिस्तानमधील भावी गृहयुद्धाची नांदी असल्याचे स्पष्ट चित्र आहे. इम्रान खान यांना १० वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी आहे, तसेच त्यांच्या पक्षाचे चिन्हही निवडणूक आयोगाने काढून घेतले आहे. यामुळे इम्रान खान यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांना अपक्ष लढण्याची वेळ आली आणि अपक्ष लढूनही जनतेने या पक्षाच्या ९९ जणांना निवडून आणले, हे विशेष आहे. इतके असूनही सध्याच्या राजकीय घटना पहाता नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’शी सत्तेवर येण्यासाठी आघाडी करण्याची बोलणी चालू आहेत. त्यामुळे पाकिस्तानी जनतेने बहुमत दिलेला पक्ष सत्तेत येणार नाही, हे सद्यःस्थितीत चित्र दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात सैन्य आणि जनता यांच्यामध्ये भविष्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानची ही वाटचाल गृहयुद्धाकडेच आहे.

पाकिस्तानच्या संसदेतील एकूण ३३६ जागांपैकी २६५ जागांसाठी ८ फेब्रुवारी या दिवशी निवडणूक झाली. एका जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, तर ७० जागा राखीव आहेत. बहुमतासाठी १३४ जागा जिंकणे आवश्यक होते; परंतु कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. नवाज शरीफ यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ या पक्षाला ७१ जागा जिंकता आल्या, तर बिलावल भुट्टो यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चा ५३ जागांवर विजयी झाला. हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तरी १३४ हा बहुमताचा आकडा पार करणे शक्य नसल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेण्याविना कोणताही पर्याय नाही. निवडणुकीचा निकाल पुढे येताच सत्ता स्थापन करण्यासाठी ९ फेब्रुवारीच्या रात्री बिलावल भुट्टो यांनी लाहोर येथे जाऊन नवाज शरीफ यांच्या बंधूंची भेट घेतली. त्यामुळे भविष्यात भुट्टो आणि नवाज शरीफ यांचे सरकार स्थापन होईलही; परंतु यामुळे पाकिस्तानमधील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल, हे मात्र निश्चित !

पाकिस्तानने शहाणे व्हावे !

मागील काही वर्षांपासून भ्रष्टाचार, महागाई, आर्थिक डबघाई यांमुळे पाकिस्तानची जनता मेटाकुटीला आली आहे. या परिस्थितीविषयी तेथील प्रसारमाध्यमेही नेत्यांना दूषणे देत आहेत. पाकिस्तानची अशी केविलवाणी स्थिती पहाता ‘फाळणीतून नेमके काय साध्य केले ?’, हा प्रश्न पडतो. फाळणीनंतरही पाकिस्तानविषयी भारत नेहमीच उदारमतवादी राहिला आहे. वर्ष १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ चे कारगिल युद्ध अशी ४ युद्धे पाकने भारतावर लादली. त्या व्यतिरिक्त पाकने आतंकवाद्यांच्या आडून भारतावर शेकडो आक्रमणे केली. भारताने ठरवले असते, तर पाकला नेस्तनाबूत करणे अशक्य नव्हते. वर्ष १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान असतांना भारत-पाकिस्तान यांच्या सीमा निश्चिती करण्यासाठी ‘ताश्कंद करार’ करण्यात आला; मात्र काही कालावधीत पाकने या कराराला वाटाण्याच्या अक्षता दाखवून भारतात पुन्हा घुसखोरी चालू केली. पाकने भारताचा बळकावलेला पाकव्याप्त काश्मीरचा भाग आजही त्याच्या कह्यात आहे. वर्ष १९७१ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुत्सद्देगिरी दाखवून पूर्व पाकिस्तानच्या जनआंदोलनाला सैन्य पाठिंबा देऊन बांगलादेशची निर्मिती घडवून पाकिस्तानला शह दिला; मात्र त्या वेळीही भारताने ओलीस ठेवलेल्या पाकच्या सैनिकांच्या बदल्यात पाकव्याप्त काश्मीरची मागणी केली नाही. या जागी पाकिस्तान असता, तर त्याने कधीच भारताला गिळंकृत केले असते; पण भारताने पाकच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेतला नाही; परंतु भारताच्या या उदारमतवादी धोरणाचा पाकने नेहमीच अपलाभ घेतला. पाकच्या नेत्यांनी भारताचा द्वेष करण्याऐवजी देशाच्या विकासाकडे लक्ष दिले असते, तर आज त्याचे चित्र वेगळे दिसले असते; पण ‘जित्याची खोड मेल्याविना जात नाही’, ही पाकची स्थिती आहे.

भारताच्या इस्लामीकरणाला रोखा !

भारतातील काही धर्मांध मुसलमान देशाच्या इस्लामीकरणाचे स्वप्न बघत आहेत. पाकच्या निर्मितीपासून भारताच्या इस्लामीकरणासाठी सैनिकी बळाचा उपयोग करण्यात आला; मात्र त्यात यश न आल्याने धर्मांतर, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हलाल प्रमाणपत्र आदी माध्यमातून भारताच्या इस्लामीकरणाचा नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहे. काँग्रेस सरकारच्या काळात भारतामध्ये या इस्लामी शक्तींना अदृश्य पाठबळ मिळाले आणि ते वेगाने फोफावत गेले. वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या शक्तींना रोखण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न झाले आहेत; मात्र सद्यःस्थितीत लोकसंख्या वेगाने वाढवून भारताच्या इस्लामीकरणाचे प्रयत्न अधिक जोमाने चालू आहेत. आज मुंबईची स्थिती बघितल्यास येथील  बहुतांश उद्योग मुसलमानांनी कह्यात घेतले आहेत.

मानवतावाद, सर्वधर्मसमभाव, निधर्मीवाद हे बोलायला ठीक आहे; पण या गोंडस नावांखाली काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांवरील दगडफेक खपवण्यात आली. याच नावाखाली महाराष्ट्रात औरंगजेब, टिपू सुलतान आदी आक्रमकांच्या उदात्तीकरणाकडे, तसेच आतंकवादी कारवायांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सद्यःस्थितीत भारतातील अनेक मतदारसंघ मुसलमानबहुल झाले असून तेथे मुसलमान उमेदवारच निवडून येतात. महाराष्ट्रात अबू आझमींसारखे मुसलमान उमेदवार उघडपणे औरंगजेबाचे समर्थन करतात आणि त्यांच्या या उदात्तीकरणाला अन्य मुसलमान लोकप्रतिनिधी आक्षेपही घेत नाहीत. भविष्यात अशा लोकप्रतिनिधींची संख्या वाढणे, हे भारतालाही अराजकतेच्या दिशेने घेऊन जाणारे ठरेल. येथे मुसलमान म्हणून त्यांचा द्वेष करण्याचा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की, भारतभूमीच्या रक्षणासाठी बलीदान देणार्‍या राष्ट्रपुरुषांना नव्हे, तर भारताला लुटण्यासाठी आलेल्यांना मुसलमान स्वत:चा आदर्श मानतात. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानप्रमाणे भारतात अराजकता निर्माण होऊ नये, असे वाटत असेल, तर हिंदूंचे पर्यायाने राष्ट्राचे हित जोपासणार्‍या उमेदवारांना निवडून आणणे आणि त्यांना हिंदूहिताची भूमिका घेण्यासाठी हिंदु समाजाने बाध्य करणे आवश्यक आहे !

पाकिस्तानप्रमाणे अराजकता टाळण्यासाठी भारतातील मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला वेळीच पायबंद घालणे आवश्यक !