धर्मलढ्यामध्ये अधिवक्ता जैन पिता-पुत्रांचे योगदान !
‘हा देश संपूर्ण ‘हिंदु राष्ट्र’व्हावा, हेच ध्येय आणि तोच ध्यास घेऊन निष्कामपणे कार्यरत रहाणे, हीच खरी समर्पणवृत्ती !
‘अयोध्येत श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी नुकताच प्रभु श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. त्याविषयी देशभरात अतिशय आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या श्रीराममंदिरासाठी झालेल्या संघर्षात अनेकांनी योगदान दिले आहे; परंतु त्यासाठी सर्वाधिक प्रामुख्याने जर कुणी लढले असेल, तर ते धर्माभिमानी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे पिता-पुत्र आहेत. केवळ श्रीराममंदिरच नाही, तर काशी, मथुरा आदींसाठीही त्यांचा लढा चालूच आहे. त्यामुळे देशात त्यांची ‘टेंपल वॉरियर्स’ (मंदिराचे लढवय्ये) अशी ओळख बनली आहे. धर्मासाठी लढत असतांना त्यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत आपण पाहूया.
सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी अविरत लढणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) !
१. सनातन धर्मासाठी लढणार्या वडिलांचा आदर्श घेणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन !
‘एक तरुण जेव्हा अधिवक्ता बनतो, तेव्हा त्याला वाटते की, आपणही एक यशस्वी व्यावसायिक अधिवक्ता बनावे आणि पुष्कळ पैसा कमवावा. आपण सर्व सुखसुविधा मिळवाव्यात, महाधिवक्ता बनावे, उच्च किंवा सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनावे, तसेच राजकारणात यावे. माझ्यासंदर्भात वेगळे आहे. मी माझ्या वडिलांची कारकीर्द पाहिली आहे. त्यांनी त्यांचे सर्व जीवन सनातन धर्मासाठी पणाला लावले आहे. केवळ श्रीराममंदिरच नाही, तर एखादी मुलगी ‘लव्ह जिहाद’मध्ये फसली, तर तिच्यासाठी विनामूल्य खटला लढणे, कुठे पिंपळाचे झाड कापले आहे, कुठेतरी लहानशी हनुमानाची मूर्ती तोडली आहे, अशा प्रकरणांसाठीही सातत्याने लक्ष्मणपुरीच्या न्यायालयात लढत असतांना मी त्यांना लहानपणापासून पहात आलो आहे. मला त्यांनी कधीच या व्यवसायात उतरण्यास सांगितले नाही. ‘तुला अधिवक्ता व्हायचे आहे आणि मी करतो, तेच तूही करायचे आहे’, असे त्यांनी मला कधीच म्हटले नाही. त्यांनी हिंदु धर्म आणि समाज यांच्यासाठी जे केले, त्यासाठी ते माझ्यासाठी आदर्श आहेत.
एक अधिवक्ता कशा प्रकारे त्याच्या आकांक्षांना तिलांजली देऊन हिंदु धर्म आणि समाज यांसाठी काम करू शकतो, याचे ते जिवंत उदाहरण आहे.
२. अपमानापासून ते सन्मानापर्यंतचा खडतर प्रवास
आज आम्हाला न्यायालयीन खटल्यांविषयी मत विचारले जाते. यापूर्वी तर आम्ही अपमान आणि तिरस्कारच सहन केला आहे. माझ्या वडिलांना लोक म्हणायचे, ‘तुम्ही जीवनात प्रगती करू शकले नाहीत’, ‘ते ज्या फांदीवर बसतात, ती फांदीच तोडून टाकतात’, ‘तिलकधारी आहेत’, ‘जातीयवादी आहेत’, ‘पागल (वेडे) आहेत, तुम्ही कुठे त्या मार्गावर जाता ?’ मोठ्या हुद्यावरील लोक म्हणायचे, ‘बेटा, तू वडिलांसारखा बनू नकोस !’ तेव्हा मी हाच विचार करत होतो की, सनातनची लढाई लढतांना जर अशा प्रकारचे अनुभव मिळत असेल, तर ठिक आहे. एका पिढीने अपमान सहन केला, तर मीही देश आणि धर्म यांसाठी अपमान सहन करायला सिद्ध आहे. हिंदु धर्म, संस्कृती, सभ्यता आणि पूर्वज यांच्यावर अन्याय झाला आहे अन् त्या पूर्ण सभ्यतेला न्याय देण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे.
लोक वडिलांवर टीका करायचे. त्याविषयी मला वाटायचे की, त्यांनी आपल्या समाजासाठी जे केले आहे आणि ज्या निष्काम भावनेने केले आहे, त्यािवषयी योग्य माहिती लोकांपर्यंत पोचली नाही. ते जितेंद्रिय आहेत, म्हणजेच त्यांनी सर्व इंद्रियांवर विजय मिळवला आहे. हे मी साक्षात् पाहिले आहे. त्यांनी सनातन धर्मासाठी तपस्या केली आहे. त्यांनी मथुरा किंवा काशी यांच्यासाठी जो पाया सिद्ध केला आहे, तो अनमोल आहे. आमचे सर्व खटले संपूर्ण अभ्यासावर आधारित असतात. अयोध्या, मथुरा, काशी, ताजमहल, भोजशाळा, कुतूबमिनार ही सर्व प्रकरणे सखोल संशोधन केलेले आहेत. या सर्व प्रकरणी आम्ही पाया सिद्ध केला आहे. असे होऊ शकते की, वडिलांच्या किंवा माझ्या आयुष्यात यात यश मिळाले नाही, तर त्यांचे पुढील पिढीमध्ये हस्तांतर होईल. तरीही हा लढा लढणे, हे एक दायित्व आहे.
३. धर्मासाठी लढत असतांना जैन कुटुंबियांचा दृष्टीकोन
हे सर्व कार्य पाहून माझी आई मला म्हणायची, ‘असे धोकादायक काम करून काय मिळणार आहे ?’ प्रत्येक आईला हेच वाटत असते. वास्तविक हा एक सभ्यतेचा लढा आहे. त्यामुळे यात उतरल्यावर लोक आपल्याला ‘नायक’ समजतील. असेही होऊ शकते की, या लढाईत पुढे आपण असणारही नाही. त्यामुळे एका आईचे हेच मत असते की, अशा प्रकारच्या गोष्टी करू नये आणि एक साधारण जीवन जगावे. मी माझ्या अंतरात्म्याला वाटेल, तसे केले. तसेच मी या कामात उतरावे, यासाठी अनेक घटना घडल्या आहेत.’
–अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय.
अखंड ‘हिंदु राष्ट्र’ बनावे आणि हिंदुत्वाची ओळख संपूर्ण जगाला व्हावी !‘जेव्हा मी सर्वाेच्च न्यायालयाच्या ‘लॉबी’मध्ये (व्हरांड्यामध्ये) असतो, तेव्हा लोक मला विचारतात, ‘जून-जुलै मासामध्ये फिरण्यासाठी कोणत्या देशात जाणार आहे ?’ मी फिरण्यासाठी विदेशात जात नाही, तर वाराणसी, काशी यांचे स्थानिक खटले मी पहातो. आम्ही या व्यवसायातून जे काही कमावतो, ते सर्व धर्मकार्यात लावतो. आमचा कोणताही न्यास किंवा संघटना नाही, ज्याच्या माध्यमातून वेगळे आर्थिक साहाय्य घ्यावे. आपल्याकडून न्यूनाधिक कार्य होणे, ही ईश्वराची इच्छा आहे. समाजातील एकही व्यक्ती असे म्हणू शकत नाही की, एखादे काम करण्यासाठी विष्णु शंकर जैन याने पैसे मागितले. आम्ही सर्व यथाशक्ती प्रयत्न करतो. मलाही वाटते, ‘हा देश ‘अखंड हिंदु राष्ट्र’ बनावा.’ रामराज्याची आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना एकच आहे. आम्ही जो भाग गमावला, तो परत मिळावा आणि संपूर्ण जगाला हिंदुत्वाची ओळख व्हावी. प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांचे दर्शन सर्व जगाला मिळावे !’ |
१. लहानपणापासून ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी लढण्याचा ध्यास !
‘मोगलांच्या काळात ज्या हिंदु मंदिरांशी गडबड झाली आहे (मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या), ती सर्व परत घ्यायची आहेत आणि पुढे जाऊन हिंदु राष्ट्राची संकल्पना साकार करायची आहे’, अशी शिकवण माझ्या आईने मला १० वर्षांचा असतांनाच दिली होती. माझे वडील गांधीवादी किंवा धर्मनिरपेक्षतावादी विचारसरणीचे होते. त्यामुळे त्यांचा या गोष्टींना विरोध होता. माझे शिक्षण, लग्न आदींमध्ये काही काळ गेला. वर्ष १९८६ मध्ये श्रीरामजन्मभूमीचे कुलूप उघडले गेल्यानंतर देशात हिंदुत्वाची एक लाट आली. तेव्हा मला जाणीव झाली, ‘मला आईने जी शिकवण दिली, त्याची वेळ आली आहे आणि आपल्याला काहीतरी केले पाहिजे.’ तेव्हापासून मी या कार्यात सक्रीय होण्यासाठी प्रयत्न चालू केले. १० जुलै १९८९ या दिवशी ‘श्रीरामजन्मभूमीच्या संदर्भातील सर्व खटले आता उच्च न्यायालयात चालतील’, असा आदेश उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने दिला. हा खटला उच्च न्यायालयात आला. तेव्हा सुदैवाने हिंदु महासभेने मला त्यांचा अधिवक्ता म्हणून नेमले. मी वर्ष १९९१ मध्ये श्रीरामजन्मभूमी प्रकरणातील लिखित कथन न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केले आणि मी हिंदु महासभेच्या माध्यमातून श्रीराममंदिराच्या लढ्यात सक्रीयपणे सहभागी झालो.
मी अयोध्या प्रकरणात उडी घेतली, तेव्हा त्याला माझ्या वडिलांचा विरोध होता. ते म्हणाले, ‘‘याने अतिशय वाईट केले.’’ आई मला म्हणाली, ‘‘तू योग्य करत आहेस. मी त्यांना समजावीन,’’ माझ्या मागे एक प्रेरणा होती, ज्याला आपण ईश्वरी शक्ती म्हणू शकतो. मी १०-१२ वर्षांचा असल्यापासून ‘आपल्याला हिंदुत्वासाठीच करायचे आहे’, अशी जिद्द होती. ‘मुलांचे पालनपोषण होवो न होवो, घर नष्ट झाले, तरी चालेल; पण मी एक प्रण घेतला होता आणि तो मी पूर्ण केल्याविना रहाणार नाही’, असा ध्यास माझ्या डोक्यात भिनला होता.
२. अपमान ते सन्मान असा खडतर प्रवास
एक काळ होता, तेव्हा हिंदुत्वाचे कार्य करत असतांना नातेवाइक आणि समाज यांची प्रतिक्रिया अतिशय नकारात्मक असायची. त्या वेळी अनेक जण माझ्याकडे तुच्छ दृष्टीने पहायचे. सर्वांनी मला सनकी आणि वेडा ठरवले होते. लोक माझ्यासमक्षच माझ्या मुलाला (अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना) बोलायचे की, ‘यांच्या मार्गाने गेलास, तर तू नष्ट होशील.’ मोठ्या हुद्यावरील लोक त्याला म्हणायचे, ‘बेटा, तू वडिलांसारखा होऊ नकोस !’ अनेक जण त्यांच्या कार्यक्रमामध्ये मला बोलावण्यास टाळत होते. ‘यांना बोलावले, तर आपल्यावर जातीयवादी किंवा हिंदुत्वनिष्ठ असा शिक्का बसेल. हे आले, तर आपल्या घरी पोलीस येतील’, असे त्यांना वाटत होते. लोकांना वाटायचे, ‘अधिवक्ता जैन ‘हिटलिस्ट’मध्ये (गुन्हेगारी किंवा राजकीय कारणांसाठी मारल्या जाणार्यांची सूची) आहेत. त्यामुळे यात त्यांचेही नाव येऊ नये.’
मी ‘विश्व हिंदु अधिवक्ता संघ’ स्थापन केला होता आणि मी त्याचा महासचिव होतो. त्यामुळे न्यायालयीन क्षेत्रात मला ‘अधिवक्ता कधी हिंदु किंवा मुसलमान असतो का ?’, असे म्हणायचे. अधिवक्ते आणि न्यायाधीशही ‘कमेंट’ (टोमणे मारायचे) करायचे. सर्वांत वाईट, म्हणजे नातेवाईक आणि परिचितही आम्हाला अस्पृश्य समजत होते. त्यांच्यावर आमची सावली पडली, तरी चुकून त्यांची हानी होऊ नये, असे त्यांना वाटत होते. काही आक्रमण किंवा गडबड होऊ नये; म्हणून सर्व लोक माझ्यापासून दूर रहात होते. मी तो तिरस्कार सहन केला आहे. माझ्या पत्नीला वाटायचे, ‘आई-वडिलांनी तिला विहिरीत ढकलले आहे. तिचे दुर्दैव की, तिला या घरी दिले आहे.’ असे असूनही ती म्हणायची, ‘‘मी भारतीय महिला आहे आणि आता कुंकू लावले आहे, तर संसार पूर्ण करीन.’’
३. धर्म-अधर्माच्या लढ्यात ईश्वराच्या कृपेने रक्षण होणे !
समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यांनी सुरक्षा दल बनवले होते. त्यात हिंदु-मुसलमान यांचे ५०-५० टक्के प्रमाण रहाणार होते. तेही मी थांबवले. उर्दू भाषांतरकार आणि उर्दू शिक्षक यांची भरती थांबवली. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी १९ धर्मांध आतंकवाद्यांची सुटका केली होती. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात खटला प्रविष्ट केला होता. त्यानंतर अखिलेश यादव यांनी मला शिक्षण मंडळाच्या ‘स्टँडिंग कौन्सिल’वरून (संचालक मंडळावरून) काढले. देवाच्या कृपेने माझ्यावर कोणते आक्रमण झाले नाही.
(६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरी ढाचा पाडण्यात आला होता, त्याच दिवशी माझी आजी (पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांची आई) स्वर्गवासी झाली. तिचा १३ वा दिवस झाल्याच्या दुसर्या दिवशी २० डिसेंबर १९९२ या दिवशी वडिलांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. त्या वेळी कडाक्याच्या थंडीत ते सर्व कागदपत्रांसह रिक्शात एकटे बसून लखनौ उच्च न्यायालयात जायचे. श्रीरामजन्मभूमीविषयी विशेष सुनावणी चालायची, तेव्हा न्यायालय धर्मांधांनी भरलेले असायचे. त्याही स्थितीत माझे वडील हिंदूंच्या बाजूने आवेशपूर्ण प्रतिवाद करायचे. ती सुनावणी लागोपाठ १० दिवस चालली. १ जानेवारी १९९३ या दिवशी न्यायमूर्ती हरिनाथ तिलारी यांनी ऐतिहासिक निवाडा दिला, ‘श्रीरामाचे दर्शन त्वरित चालू करण्यात यावे. प्रभु श्रीराम घटनात्मक पुरुष आहेत आणि त्यांचे दर्शन थांबवता येऊ शकत नाही.’ त्यानंतर न्यायमूर्ती तिलारी म्हणाले, ‘‘आज जैनसाहेब न्यायालयाच्या बाहेर जातील, तेव्हा त्यांना धोका आहे.’’ – अधिवक्ता विष्णु शंकर जैन)
(त्यामुळे न्यायमूर्ती तिलारी यांनी वडिलांना (पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन त्यांच्या कक्षात बोलावून घेतले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही बाहेर कुठे चालला ? तुम्हाला हे लोक सोडणार नाहीत.’’ त्यांनी वडिलांना स्वत:च्या गाडीत हबीबगंज चौकातील हनुमान मंदिरापर्यंत पोचवले आणि तेथून जवळच असलेल्या आमच्या घरी सुरक्षितपणे जाण्यास सांगितले. तो काळही आम्ही पाहिला आहे. त्यामुळे आजचा संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही. – अधिवक्ता विष्णु शंकर जैन)
४. पित्याचा धर्मलढा पुढेही चालू ठेवण्याचा मुलाचा निर्धार
आमच्याकडे प्रतिदिन रात्री १० ते १२ या वेळेत अनौपचारिक चर्चा चालते. त्यात संसदेप्रमाणे वाद-विवाद, तीव्र वक्तव्य, बहिष्कार (बायकॉट) इत्यादी सर्व होते. वाद-प्रतिवाद होतात; पण कुणाला वाईट वाटत नाही. विजयी होणार्याचे मत स्वीकारले जाते. यात अधिक वेळा विष्णु (अधिवक्ता विष्णु शंकर जैन) हेच जिंकतात. अधिवक्ता बनल्यानंतर त्याने पहिलाच खटला अयोध्या प्रकरणाविषयी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केला. तेव्हा मी त्याला म्हटले, ‘‘हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे. तू अशाच प्रकारे संघर्ष करू शकशील का ? कारण आपल्याकडे संघर्षाची पहिली अट ही आहे की, कुणाकडूनही पैसा घ्यायचा नाही, कुणाची शिफारस ऐकायची नाही, दबावाचे राजकारण करायचे नाही आणि पदाचा अपवापर करायचा नाही. या गोष्टींचे पालन करता आले पाहिजे.’’ तो म्हणाला, ‘‘पिताजी, तुम्ही काळजी करू नका, याविषयी मी तुमच्याहून अधिक कट्टर राहीन.’’
५. श्रीरामजन्मभूमी प्रकरणी न्यायालयीन लढाईचा संघर्ष
अ. न्यायाधीश सय्यद रफत आलम यांच्याविषयीचा आक्षेप मांडण्याचे धाडस होणे : वर्ष १९८९ मध्ये श्रीराममंदिराचा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये आला आणि सुदैवाने मी त्याच्याशी जोडला गेलो. त्यानंतर या खटल्यातील सर्व स्तरावरील संघर्ष मला पहाण्याचे भाग्य लाभले. या संघर्षामध्ये माझ्यासह अन्य ५-६ अधिवक्ते होते. ते सर्व एकाहून एक धुरंधर होते. ते त्यांचे अन् मी माझे काम करायचो; पण आमच्यात एक सुरेख समन्वय होता.
अयोध्या विषयावर न्यायाधीश सय्यद रफत आलम यांच्यासमोर सुनावणी होणार होती. ‘बाबरी ॲक्शन कमिटी’चे सय्यद शहाबुद्दीन हे त्यांच्या सख्ख्या भावाचे मेहुणे होते. त्या वेळी ‘त्यांनी अयोध्या प्रकरणाची सुनावणी करू नये’, असे मी अर्ज करून सांगितले. ही गोष्ट खरी असल्याने ते माझा आक्षेप टाळू शकले नाहीत; पण त्यांना माझा अतिशय राग आला होता. त्या वेळी न्या. आलम यांनी सुनावणी घेऊ नये, असे सांगण्याचे धाडस एकाचेही झाले नाही. जोपर्यंत आलम तेथे न्यायाधीश राहिले आणि माझा खटला त्यांच्यासमोर आला, तेव्हा काय झाले असेल, याची कल्पना करता येईल.
आ. मुलायमसिंह यांनी न्यायाधीश पांडे यांची बढती रोखणे : वर्ष १९८६ मध्ये न्यायाधीश के.एम्. पांडे यांनी श्रीराममंदिर उघडण्याचा ऐतिहासिक आदेश दिला होता. त्या वेळी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदावर बढती होणार होती. त्या वेळी न्यायाधिशांची बढती व्हायची असेल, तर त्यांची धारिका मुख्यमंत्री आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे जायची. राज्य सरकारने आक्षेप घेतला, तर बढती थांबत होती. वरील निर्णय दिल्याने उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव हे न्या. पांडे यांच्यावर प्रचंड संतापलेले होते. त्यामुळे मुलायमसिंह यांनी त्यांचे मत लिखितपणे नोंदवले, ‘न्यायाधीश के.एम्. पांडे अतिशय निर्भिड आणि प्रामाणिक आहेत; पण त्यांनी श्रीराममंदिराचे कुलूप उघडण्याचा आदेश दिला. त्यामुळे मी त्यांच्या नावाची स्वीकृती करणार नाही.’ हे गुप्त लिखित (सिक्रेट नोट) मला मिळाले होते. याविषयी मी माझ्या स्वाक्षरीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र प्रविष्ट केले. तेव्हा ‘हे ‘सिक्रेट’ यांना कसे मिळाले ?’, याचे न्यायालयाला आश्चर्य वाटले. न्यायालयाने सांगितले, ‘‘जैनसाहेब, तुम्ही आज कारागृहात जाणार आहात; कारण ‘अधिकृत ‘सिक्रेट’चे तुम्ही उल्लंघन केले आहे.’’ मी म्हटले, ‘‘मला कारागृहात जाण्यास कोणतीही अडचण नाही आहे. मी तर त्यासाठी सिद्ध होऊनच आलो आहे; पण तुम्ही मला कारागृहात कोणत्या कारणाने पाठवणार आहात ? जर मी अधिकृत ‘सिक्रेट’चे उल्लंघन केले असेल, तर तुम्हाला लिहावे लागेल, ‘मुलायमसिंह यादव यांनी संबंधित लिखाण केले आहे.’ त्यानंतर तुम्ही निश्चितपणे मला कारागृहात पाठवा.’ त्यामुळे तुम्ही मला खोटे प्रतिज्ञापत्र दिले; म्हणून कारागृहात पाठवणार कि प्रतिज्ञापत्र सत्य आहे म्हणून पाठवणार ?’’ त्यानंतर काही झाले नाही. ३ मासांनी न्या. पांडे यांना बढती मिळाली; पण त्यांच्या न्यायालयात मी कधीच उभा राहिलो नाही.
६. ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हाच ध्यास !
एकदा सर्वाेच्च न्यायालयात अधिवक्ता राजीव धवन यांनी ‘हिंदू तालिबानी आहेत’, असे वक्तव्य केले होते. तेव्हा ‘जर हिंदू तालिबानी असेल, तर मीही तालिबानी आहे. जी शिक्षा द्यायची असेल ती द्या’, असे मी भर न्यायालयात निक्षून सांगितले होते. ‘हा देश संपूर्ण ‘हिंदु राष्ट्र’व्हावा, हेच माझे एकमेव स्वप्न आहे आणि त्यावरच मी काम करत रहाणार आहे.’
– पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय
(श्री. सुशांत सिन्हा यांच्या ‘यू ट्यूब’ वाहिनीवरून साभार)
उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यांचा ‘प्रस्ताव’ स्वीकारण्यास नकार !‘समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंह यांच्या सरकारने अयोध्या येथे केवळ १६ कारसेवक मारले गेल्याचे म्हटले होते; पण मी घटनास्थळी जाऊन १६ नाही, तर ३६५ कारसेवक मारले गेल्याचा दावा केला होता. वर्ष १९९३-९४ मध्ये मुलायमसिंह यांच्या सत्ताकाळात उत्तरप्रदेश सरकारचे तत्कालीन मुख्य सचिव ए.पी. सिंह अतिशय शक्तीशाली समजले जात होते. एके रात्री ते माझ्या घरी आले आणि त्यांनी मला अशा गोष्टी सोडून देण्याची चेतावणी दिली. (वर्ष १९८९ ते १९९४ या काळात पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मुलायमसिंह सरकारच्या विरोधात अनेक खटले प्रविष्ट केले होते.) त्या वेळी सिंह यांनी मला थेट दोन ‘प्रस्ताव’ दिले होते. ‘एक तर मुलायमसिंह यांच्या समवेत या, मंत्री बना आणि पाहिजे ते घ्या. अन्यथा पुढे काय होऊ शकते, ते समजून घ्या.’ याचा अर्थ माझ्यासमवेत काहीही होऊ शकत होते. रात्रीची वेळ होती आणि माझी मुले झोपलेली होती. मी सिंह यांना २ मिनिटे थांबायला सांगितले. मी देवघरात गेलो. भगवान शिवाला हात जोडले आणि प्रार्थना केली, ‘मला योग्य निर्णय घेण्यासाठी शक्ती द्या.’ भगवंताने निर्णय दिला, ‘तुम्ही लढा !’ मी ए.पी. सिंह यांना सांगितले, ‘‘ही वस्तू (मी स्वतः) विकाऊ नाही.’’ त्यानंतर ते चरफडत; पण खाली मान घालून निघून गेले. ते जातांना माझ्या दृष्टीला दृष्टी मिळवू शकले नाहीत. एक साधा मनुष्य सत्तेला टक्कर देईल, याची त्यांना अपेक्षा नव्हती. मला कळले की, सरकारकडून सर्व सिद्धता करण्यात येत आहे. त्यामुळे मी उच्च न्यायालयात अर्ज दिला. उच्च न्यायालयाने ‘हरि शंकर जैन यांना अटक होणार नाही’, असा आदेश दिला.’ (श्री. सुशांत सिन्हा यांच्या ‘यू ट्यूब’ वाहिनीवरून साभार) |