राज्यात ६ सहस्र किलोमीटर रस्त्याच्या कामांना मान्यता ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री
सांगली – हरिपूर ते कोथळी दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलामुळे सांगली आणि कोल्हापूर मधील अंतर ११ किलोमीटरने अल्प झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगले काम करत आहे. राज्यात जवळपास ६ सहस्र किलोमीटर रस्त्याच्या कामांना मान्यता मिळाली आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. हरिपूर ते कोथळी या गावाला जोडणार्या कृष्णा नदीवरील पुलाचे लोकार्पण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबेकर, मकरंद देशपांडे, प्रकाश ढंग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
हरिपूर ते कोथळी या गावाला जोडणार्या कृष्णा नदीवरील पुलाची लांबी २१० मीटर असून या कामावर आजपर्यंत २५ कोटी ९७ लाख ८५ सहस्र रुपये व्यय झाला आहे.