‘फ्रंटिस पीस’ संरक्षित वारसास्थळावर चर्च संस्थेचा मालकी हक्क असल्याचा दावा खोटा !
आमदार विजय सरदेसाई यांच्या विधानसभेतील वक्तव्याचे प्रा. वेलिंगकर यांच्याकडून खंडण
पणजी : ‘चर्चचा छळवाद थांबवा’ या विषयावर आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ पाहिला. या भाषणात ‘सांकवाळच्या ‘फ्रंटिस पीस’ संरक्षित वारसास्थळावर चर्च संस्थेचा मालकी हक्क असल्याचा’, त्याचप्रमाणे ‘फ्रंटिस पीस’ वारसास्थळावर सध्या साजर्या करण्यात येणार्या ‘फेस्ता’च्या शेकडो वर्षांच्या पोर्तुगीजकालीन परंपरेचा..’, उल्लेख केला गेला. आमदार विजय सरदेसाई यांनी केलेले दोन्ही दावे धादांत खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असे हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकात प्रा. वेलिंगकर यांनी म्हटले आहे की,
१. ‘फ्रंटिस पीस’ संरक्षित वारसास्थळाच्या भूमीच्या मालकी हक्काचे कोणतेही पुरावे चर्च संस्थेकडे नाहीत. गेली कित्येक वर्षे चालू असलेल्या न्यायालयीन खटल्यामध्ये अशा प्रकारचा मालकी हक्काचा कोणताही पुरावा चर्च संस्थेने सादर केलेला नाही. चर्चकडे आहे, तो केवळ १/१४ चा तलाठ्याकडून मिळवलेला उतारा.
२. दुसरे असे की, आमदार सरदेसाई यांनी उल्लेख केलेले ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’ किंवा ‘सेंट जोसेफ व्हाज फेस्त’ हे फेस्त वारसास्थळापासून ५ कि.मी. अंतरावरील शिंदोळी गावातील ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’ आणि ‘सेंचुअरी ऑफ सेंट जोसेफ व्हाज’ या चर्चपाशी भरत आलेले आहे.
(सौजन्य : In Goa 24×7)
‘‘फ्रंटिस पीस येथे भरणार्या फेस्ताला (जत्रेला) शेकडो वर्षांची परंपरा असल्याचा दावाही बिनबुडाचा आहे. फेस्त भरण्याचे ठिकाण ‘फ्रंटिस पीस’ नसून शिंदोळी येथे आहे.’’- प्रा. वेलिंगकर |
धक्कादायक वस्तूस्थिती अशी आहे की, शेकडो वर्षांपासून शिंदोळीच्या चर्चपाशी भरणारे हे ‘फेस्त’ तडकाफडकी आणि संशयास्पदरित्या वर्ष २०१८ पासून ‘फ्रंटिस पीस’ संरक्षित वारसास्थळी हालवण्यात आले. पुरातत्व खात्याची कोणतीही अनुमती न घेता वर्ष २०१८ पासून यंदा वर्ष २०२४ पर्यंत हे फेस्त ‘फ्रंटिस पीस’ वारसा स्थळावर अवैधपणे भरवले जात आहे.
३. आणखी एक धक्कादायक गोष्ट अशी की, हे फेस्त बेकायदेशीररित्या आणि बळजोरीने २०१८ या वर्षापासून ‘फ्रंटिस पीस’वर हालवण्यात आले, तेव्हा स्वतः मंत्री विजय सरदेसाई हेच पुरातत्व खात्याचे मंत्री होते. विनापरवाना आणि वारसास्थळ कायद्याचा सरळसरळ भंग करून चर्च संस्थेला संरक्षित वारसास्थळात कसा हस्तक्षेप करू दिला ? हे गौडबंगालच आहे !
४. शिंदोळी गावातील हे परंपरागत फेस्त ‘फ्रंटिस पीस’ वारसास्थळी स्थलांतरित करण्यास आजही तेथील स्थानिक ख्रिस्ती बांधवांचा कडवा विरोध आहे आणि आजपर्यंत स्थलांतरित फेस्तावर त्यांचा बहिष्कार कायम आहे. या विरोधाच्या आंदोलनाचे व्हिडिओही प्रसारित झाले आहेत.
राजकारणासाठी आणि मतांसाठी खोट्या, बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन करून जनतेची दिशाभूल करण्यासाठी विधानसभेच्या व्यासपिठाचा वापर करण्याचे लोकप्रतिनिधींनी टाळावे.