धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना यापुढे खाटांचे ऑनलाईन आरक्षण करता येणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या रुग्णांना यापुढे खाटांचे ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे. ऑनलाईन आरक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी राज्यशासनाने ४ कोटी ३८ लाख ८९ सहस्र ३३७ रुपये इतका निधी संमत केला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यशासनाने ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी ऑनलाईन पद्धतीने खाटांचे आरक्षण करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. नुकतीच या समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये खाटांचे ऑनलाईन आरक्षण करण्याची प्रणाली विकसित करण्यासाठी ‘सिल्व्हर टच टेक्नॉलॉजिज लिमिटेड’ या आस्थापनाची नियुक्ती केली आहे. धर्मादाय रुग्णालयात गरिबांसाठी आरक्षित असलेल्या खाटांचा लाभ प्रत्यक्षात गरिबांना होत नसल्याचे अनेक प्रकार राज्यात समोर आले आहेत. लोकप्रतिनिधींनी अनेकदा विधीमंडळातही याविषयीचे प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक केल्यानंतर तरी यामध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.