डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांचा ‘कला सारथी पुरस्कारा’ने सन्मान !
बेंगळुरू – ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या येथील आश्रमात २५ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘भाव’ हा समारंभ पार पडला. गायन, वादन, नृत्य यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमात भारतातील वेगवेगळ्या प्रांतांतून संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी झाले होते.२६ जानेवारी या दिवशी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांचा त्यांच्या संगीतातील प्रदीर्घ सेवेबद्दल श्री श्री रविशंकर यांनी ‘कला सारथी पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. या वेळी अन्य १७ कलाकारांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी झालेल्या परिसंवादात पू. किरण फाटक यांनी ‘अध्यात्म आणि संगीत यांचा परस्पर संबंध’ यावर विचार मांडले. त्यांनी एक बंदीश सादर केली. शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’, असेही म्हणतात. या वेळी श्रोत्यांनी पू. किरण फाटक यांना भरभरून प्रतिसाद दिला.