अग्नीशमनदल कार्यालय परिसरात ठेवलेल्या श्री गणेशमूर्तींची होत आहे विटंबना !

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष !

अग्नीशमनदल कार्यालय परिसरात ठेवण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्ती (वर्तुळात)

सातारा, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – शहरातील हुतात्मा चौक परिसरात सातारा नगरपालिकेच्या अग्नीशमनदलाचे कार्यालय आहे. याच ठिकाणी काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्ती उघड्या ठेवण्यात आल्या असून त्यावर धुळ बसत आहे. श्री गणेशमूर्तींच्या समोर दुचाकी वाहने लावण्यात येत आहेत, तसेच मूर्तीसमोरच धुम्रपान करण्यात येत आहे. श्री गणेशमूर्तींसमोर आणि आजूबाजूला कचर्‍याच्या घंटागाड्या उभ्या केल्या जातात. ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या मूर्ती येथे ठेवल्या आहेत, त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या श्री गणेशमूर्तींची विटंबना होत आहे.

याविषयी काही जागृत धर्माभिमानी नागरिकांनी अग्नीशमन विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी गणेशोत्सव मंडळांकडे बोट दाखवले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो; मात्र नंतर ‘श्री गणेशमूर्तींची होणारी विटंबना पहायला नको वाटते’, असे स्थानिक नागरिक म्हणतात. याविषयी सातारा नगरपालिका प्रशासनाने संबंधित सार्वजनिक गणेशात्सव मंडळांना समज द्यावी, अशी मागणी धर्मप्रेमी नागरिक करत आहेत.