रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा आणि कार्यशाळा यांसाठी आल्यावर चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील कु. मृण्मयी महेश कात्रे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

कु. मृण्मयी कात्रे

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना त्यांनी ‘तुझ्यामध्ये स्वभावदोष असल्याने तुला इतरांचे स्वभावदोष दिसतात. तुझ्यामध्ये गुण आल्यावर तुला इतरांचे गुण दिसतील !’, अशी जाणीव करून देणे

‘काही मासांपूर्वी माझ्या मनाची अशी स्थिती होती की, माझ्याकडून साधकांच्या चुका अधिक प्रमाणात पाहिल्या जायच्या. एकदा मी आत्मनिवेदन करत असतांना गुरुदेवांनी मला ‘तुझ्यामध्ये स्वभावदोष असल्याने तुला इतरांचे स्वभावदोष दिसतात. तुझ्यामध्ये जेव्हा गुण येतील, तेव्हा तुला इतरांचे गुण दिसतील !’, अशी जाणीव करून दिली.

२. त्यानंतर प्रत्येकामधील गुण बघण्याचा मनाशी निश्चय होणे

त्या दिवसापासून मनाशी निश्चय केला की, मला प्रत्येकामधील गुण बघायचे आहेत. अगदी निर्जीव वस्तूंमध्येही गुण बघायचे, उदा. पंखा स्वतः फिरत रहातो आणि इतरांना थंड वारा देतो. गॅसची शेगडी स्वतः तापते, अग्नीच्या ज्वाळा सहन करते आणि आपल्याला प्रसाद बनवून देते.

३. इतरांचे गुण पाहिल्यावर आनंद मिळणे आणि त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न गुरुदेवांनी करून घेणे

त्यानंतर मी वस्तू आणि साधक यांच्यातील केवळ गुण बघायचे प्रयत्न वाढवले. तेव्हा मला आनंद मिळाला आणि पुष्कळ शिकायला मिळाले. तेव्हापासून गुरुदेवच माझ्याकडून साधकांची तळमळ, त्यांचा त्याग आणि त्यांचे नियोजन यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करून घेतात.

४. ‘गुरुदेवच सेवा देत आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे सेवा सहजतेने आणि त्वरित स्वीकारली जाणे

मी सेवा करत असतांना उत्तरदायी साधक मला नवनवीन सेवा देत असतात. त्या वेळी माझ्याकडून त्या सेवा ‘गुरुदेवच देत आहेत’, असा भाव ठेवून अगदी सहजतेने स्वीकारल्या जातात. तेव्हा त्या सेवा स्वीकारण्याची माझी क्षमता नसते; पण ‘गुरुदेवांनी सांगितले आहे आणि तेच सेवा करून घेणार आहेत’, असा विचार मनात येऊन माझ्याकडून ती लगेच स्वीकारली जाते.’

– कु. मृण्मयी कात्रे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (३१.७.२०२२) ०