धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना मार्गदर्शन करून साधना करण्यास उद्युक्त करणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४७ वर्षे) !
‘पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी जातात. त्या वेळी ते त्यांच्या समवेत काही साधकांना घेऊन जातात. गुरुकृपेने आम्हाला त्यांच्या समवेत जाण्याची संधी मिळाली. तेव्हा पू. अण्णा यांचे साधकांना घडवणे, पू. अण्णांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अन् साधक यांच्यामध्ये झालेले पालट, यांविषयी येथे दिले आहे.
१. साधकांना घडवणे
१ अ. साधकांना वेगवेगळ्या सेवा करायला सांगून कृतीतून शिकवणे : पू. अण्णा धर्मप्रेमी, अधिवक्ता, उद्योगपती, समाजातील हिंदुत्वनिष्ठ, धर्मशिक्षण वर्गातील जिज्ञासू आणि साधक यांना त्यांच्या प्रकृतीनुसार मार्गदर्शन करतात. ते साधकांना प्रतिदिन वेगवेगळ्या सेवा करायला सांगून कृतीतून शिकवतात, उदा. वाहनव्यवस्था, सभागृहव्यवस्था, भोजनव्यवस्था, व्यासपीठव्यवस्था, निवासव्यवस्था, संतसेवा, स्वागतकक्षव्यवस्था, सूत्रसंचालन करणे, अशा सर्व सेवांमध्ये पू अण्णा प्रत्येक साधकाला सहभागी करून घेतात.
१ आ. साधकांना सर्व सेवा करण्यास उद्युक्त करणे : ते साधकांना सेवेची व्याप्ती काढणे, पूर्वी ती सेवा ज्यांनी केली होती, त्यांना आणि उत्तरदायी साधकांना विचारून घेणे, सेवेचा आढावा देणे, स्थानिक साधकांशी जवळीक साधून त्यांच्याकडून सेवा करून घेणे, अशी सूत्रे सांगून सेवा करण्यास उद्युक्त करतात. त्यामुळे साधकांना ताण येत नाही.
१ इ. साधकांना सेवेचे दायित्व देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुण वाढवणे : ‘साधकांमध्ये नेतृत्वगुण वाढावा’, यासाठी पू. अण्णा काही साधकांना प्रसार दौर्याच्या वेळी स्वतःच्या समवेत घेऊन जातात. पू. अण्णा शिकण्यासाठी आलेल्या साधकांचा रात्री सत्संग घेतात. तेव्हा ते साधकांना त्या दिवशी ‘सत्संगात काय शिकायला मिळाले ? कुठे न्यून पडलो ? इतरांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने सहसाधकांचे निरीक्षण केले का ?’, हे सांगण्यास सांगतात. त्यामुळे साधकांमध्ये अंतर्मुखता येते. पू. अण्णा साधकांना सांगतात, ‘‘प्रतिदिन एक गुण वाढवण्याचे ध्येय ठेवून भावपूर्ण सेवा करावी.’’ याविषयी ते साधकांना ध्येय देतात. साधक सेवेचे दायित्व घेऊन परिपूर्ण सेवा करतात.
१ ई. धर्मप्रेमी उद्योगपतींना परिपूर्ण अन् भावपूर्ण सेवा करण्यास शिकवणे : एका जिल्ह्यातील २ धर्मप्रेमी उद्योगपती पू. अण्णांच्या समवेत शिकण्यासाठी आले होते. एकदा पू. अण्णांनी त्यांना सभागृह सिद्धतेची सेवा दिली, तसेच त्यांना परिपूर्ण सेवा करण्याचे ध्येय दिले. त्यांनी रात्रीच्या सत्संगात सेवेचा आढावा दिला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्ही पूर्वी ही सेवा केली होती. आम्ही सेवा साधना म्हणून करत नव्हतो. आज प्रत्येक कृती करतांना आम्हाला साधनेच्या ध्येयाची आठवण होत होती. आम्ही गुरूंना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी सतत प्रार्थना करत होतो. आमची सतत भावजागृती होत होती. आम्हाला सेवेतून पुष्कळ आनंद मिळाला.’’ ‘पू. अण्णा धर्माभिमान्यांना परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करायला शिकवतात’, हे या अनुभूतीतून शिकायला मिळाले.
१ उ. साधकांना प्रोत्साहन देणे : पू. अण्णा सनातनचे ग्रंथ आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिके यांतील लिखाणाचा अभ्यास करतात. ते त्यांतील सूत्रे लिहून ठेवतात. ते सत्संगात असे विषय सांगून साधक आणि धर्मप्रेमी यांना प्रोत्साहन देतात.
१ ऊ. साधकांमध्ये श्रद्धा निर्माण करणे : पू. अण्णांना ‘सर्व साधक साधनेत पुढे जावेत, प्रत्येकाची साधना व्हावी’, असे वाटते. ते ‘साधकांमध्ये श्रद्धा निर्माण होण्यासाठी आणखी काय करू शकतो ?’, असा विचार सतत करत असतात.
१ ए. शिकण्यासाठी आलेल्या साधकांना प्रवासातही सत्संग देणे : पू. अण्णांच्या समवेत ८ ते १० साधक शिकण्यासाठी होते. पू. अण्णा ‘प्रत्येक साधकाला त्यांच्या समवेत चारचाकीत बसण्याची संधी मिळावी’, असे नियोजन करायला सांगून प्रत्येक साधकाला आनंद देतात. सहसाधक किंवा धर्मप्रेमी त्यांची चारचाकी घेऊन आले, तर पू. अण्णा त्यांच्या चारचाकीत बसून त्यांना आनंद देतात. साधक आणि धर्मप्रेमी यांना वाटत असे, ‘आपल्या चारचाकीत संत बसतील का ?’ त्याआधीच पू. अण्णा संबंधित साधक किंवा धर्मप्रेमी यांच्या चारचाकीत बसत असत.
२. पू. रमानंदा गौडा यांनी मार्गदर्शनात सांगितलेली सूत्रे
अ. पू. अण्णा प्रत्येक मार्गदर्शनात ‘प्रत्येक साधकाने तळमळ, श्रद्धा आणि भाव कसा वाढवायचा ?’, याविषयी सांगतात.
आ. प्रतिकूल परिस्थितीत एकही क्षण वाया जाऊ देऊ नये. परिश्रम घेऊन सेवा करावी. तीव्र तळमळीने सेवा करणार्या जिवाकडे गुरूंची दिव्य दृष्टी असते.
इ. प्रत्येक कृती करतांना गुरूंचे मन जिंकावे.
३. धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् त्यांच्यामध्ये झालेले पालट
३ अ. पू. अण्णांचा अमूल्य सत्संग मिळाल्यावर सर्व साधकांमध्ये अंतर्मुखता निर्माण होते. सत्संगातील प्रत्येक शब्द साधकांच्या अंतर्मनापर्यंत पोचून त्यांच्यामध्ये आंतरिक पालट होण्याच्या प्रक्रियेला आरंभ होतोे.
३ आ. साधकांना ‘ते साधनेत कुठे अल्प पडतात ?’, याची जाणीव होऊन त्यांच्यात स्वीकारण्याची स्थिती निर्माण होणे : एका ठिकाणच्या २ साधकांची क्षमता असूनही ते त्यांच्या क्षमतेचा वापर करत नव्हते. त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होते आणि ते समष्टी सेवेचे नियोजनही करत नव्हते. ते अडचणींवर उपाय शोधत नव्हते. त्यामुळे त्यांचे साधनेचे प्रयत्न अल्प होत होते. ‘त्यांची साधनेची तळमळ वाढावी’, यासाठी पू. अण्णा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. तेथे पू. अण्णांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्या साधकांना ‘अंतर्मुखता कशी निर्माण करायची ? चुका आणि प्रसंग यांमधून कसे शिकायचे ?’ हे शिकायला मिळाले. त्यामुळे त्या साधकांना ‘ते कुठे अल्प पडतात ?’, याची जाणीव होऊन त्यांच्यात स्वीकारण्याची स्थिती निर्माण झाली.
३ इ. पू. अण्णांचे मार्गदर्शन झाल्यावर जिज्ञासूंनी पू. अण्णांना स्वतःच्या अडचणी मनमोकळेपणाने सांगणे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे : पू. अण्णा जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ, साधकांचे कुटुंबीय आणि धर्मप्रेमी यांना स्वतंत्ररित्या मार्गदर्शन करतात. त्या वेळी पू. अण्णा त्यांना साधनेचे महत्त्व सांगतात. अनेक वेळा जिज्ञासू पू. अण्णांना बुद्धीच्या स्तरावरील प्रश्न विचारतात. तेव्हा पू. अण्णा त्यांना आध्यात्मिक स्तरावरील उदाहरणे देऊन योग्य दिशा देतात. एके ठिकाणी मार्गदर्शन ऐकणारे एक जिज्ञासू स्वतःच्या कुटुंबियांना सत्संगाचा लाभ मिळावा; म्हणून मधेच उठून घरी गेले आणि कुटुंबियांना घेऊन आले. एक धर्मप्रेमी म्हणाले, ‘‘सत्संग थोडा वेळ आहे; म्हणून मी एकटाच आलो होतो. ‘हा सत्संग इतका परिणामकारक आहे’, हे मला आधी समजले असते, तर मी पुष्कळ लोकांना घेऊन आलो असतो.’’ पू. अण्णांचे मार्गदर्शन झाल्यावर जिज्ञासू पू. अण्णांना स्वतःच्या अडचणी मनमोकळेपणाने सांगून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात.
३ ई. साधकांना तत्त्वनिष्ठतेने चुका सांगितल्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर्मुखता येऊन पालट होणे : पू. अण्णांच्या समवेत शिकण्यासाठी आलेले साधक किंवा अन्य साधक यांच्या चुका लक्षात आल्यावर पू. अण्णा साधकांना त्याविषयी गांभीर्याने जाणीव करून देतात आणि त्यांना स्वतःमध्ये पालट करण्यासाठी प्रयत्न करण्याची दिशा देतात. एका साधिकेने मागील १० वर्षांपासून साधनेच्या दृष्टीने स्वतःमध्ये पालट केला नाही. तिला ‘प्रत्येक प्रसंगात तीच योग्य आहे’, असे वाटायचे. त्यामुळे तिच्याकडून काहीच स्वीकारले जात नसे.
पू. अण्णांनी ‘त्या कुठे अल्प पडतात ? त्यांचा दृष्टीकोन कसा अयोग्य आहे ?’, याची जाणीव त्या साधिकेला वेळोवेळी करून दिली. त्यामुळे त्यांना अंतर्मुख होण्यास साहाय्य झाले. नंतर त्या साधिकेने ‘मी इतकी वर्षे साधना केली नाही आणि वेळ वाया घालवला’, असे सांगितले.
३ उ. साधकांच्या साधनेला गती येऊन प्रसारकार्य वाढणे : पू. अण्णा प्रत्येक वेळी सत्संगात वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून लिखित संहिता सिद्ध करतात. ते साधक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, व्यावसायिक, अधिवक्ता, वैद्य, युवा साधक अशा व्यक्तींना प्रकृतीनुसार मार्गदर्शन करतात. त्यामुळे विषय ऐकणार्याच्या अंतर्मनात पोचतो. त्यांच्यात साधनेविषयी विश्वास आणि नंतर श्रद्धा निर्माण होते. ते साधना गतीने करण्यास प्रारंभ करतात. ते धर्मकार्यात सहभागी होतात आणि प्रचारकार्य वाढवण्यास साहाय्य करतात. त्यामुळे सध्या कर्नाटक येथील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे अध्यात्मप्रचाराच्या कार्याला आरंभ झाला आहे. साधक पुढाकार घेऊन सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
४. साधकांना नामजपादी उपायांचे महत्त्व सांगून त्यांच्यात गांभीर्य निर्माण करणे
पू. अण्णा धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करतांना नामजपादी उपायांचे महत्त्व सांगतात. पू. अण्णांचे मार्गदर्शन ऐकल्यावर सर्व जण त्यांच्याशी पुन्हा वैयक्तिकरित्या बोलून लगेच कृती करायला आरंभ करतात. धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी नामजप चालू केल्यावर त्यांच्यामध्ये पुष्कळ पालट होतात आणि त्यांना होणारे त्रास न्यून होतात.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही आम्हाला पू. अण्णा यांच्यासारखे समष्टी संत दिले, त्यांचा सत्संग दिला आणि ‘त्यांच्याकडून कसे शिकायचे ?’, हेसुद्धा तुम्हीच शिकवत आहात. ‘गुरुदेव, ‘आम्हाला संतांच्या सत्संगात शिकायला मिळालेले प्रत्येक सूत्र आचरणात आणता येऊ दे’, अशी मी प्रार्थना करते.’
– सौ. मंजुळा गौडा (पू. रमानंद गौडा यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४२ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. ८.११.२०२३)