धार्मिक स्थळांचे पावित्र्य अबाधित राखणे महत्त्वाचे !
स्वतःच्या मनामध्ये निर्मळ आणि श्रद्धेचे विचार असतील अन् आपले रहाणे योग्य असेल, तरच देव आपली प्रार्थना ऐकतो !
‘मंदिरे ही हिंदु समाज आणि संस्कृती यांचा महत्त्वाचा घटक आहे. सहस्रो वर्षांपूर्वी मंदिरे अस्तित्वात आली. आज सहस्रो वर्षांनंतरही मंदिरांचे पावित्र्य अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून भाविक आणि मंदिरातील पुजारी प्रयत्न करतांना दिसतात. आधुनिक जीवनशैलीत पालटणारी मानसिकता अनेक गोष्टींसाठी बाधक ठरू लागलेली आहे.
समाजाचे रक्षण आणि त्याचा विकास यांसाठी मंदिरे ही महत्त्वाचे घटक आहेत. ‘हिंदु संस्कृती संवर्धनाचे मंदिर महत्त्वाचे केंद्र आहे’, असे म्हटले जाते. देशात सहस्रो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे वेगवेगळे असे महत्त्व आणि महात्म्य आहे. प्रत्येक मंदिरात प्रवेश करतांना वेगवेगळ्या प्रकारच्या निर्बंधांना आपल्याला सामोरे जावे लागते. यावर अनेक वेळा चर्चा होते. अनेक स्तरांवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची मते व्यक्त केली; मात्र मंदिरांचे पावित्र्य राखायचे असेल, तर त्या निर्बंधांचे पालन करणे, हे समाज रक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे.
१. ‘वस्त्रसंहिते’ची आवश्यकता
आज प्रत्येक मंदिरामध्ये पालटणार्या जीवनशैलीनुसार कोणत्याही प्रकारचे कपडे घालून प्रवेश करण्याचे ‘फॅड’ रुजू होऊ लागले आहे. यातून मंदिरांचे पावित्र्य भंग होते. यामुळे काही मंदिरांमध्ये निर्बंध लागू करण्यात येत आहेत. सध्या चालू असलेल्या वर्षात अनेक मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ (ड्रेस कोड) (‘वस्त्रसंहिता’ म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) ही नवी संकल्पना रुजू होत आहे. त्या संदर्भात सध्या देशामध्ये वेगवेगळ्या स्तरावर चर्चा चालू आहे.
हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान आणि शीख यांच्या प्रार्थनास्थळी जातांना वेगवेगळ्या प्रकारची ‘वस्त्रसंहिता’ असते, ज्याचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे तेथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, याची विशेष नोंद त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये घेण्यात येत असते आणि त्याचे काटेकोरपणे पालनही प्रत्येक भाविक करत असतो. आपण अशा प्रार्थनामंदिरांमध्ये कोणत्याही अवस्थेत प्रवेश करू शकत नाही, हे स्पष्ट आहे.
२. ‘वस्त्रसंहिता’ का हवी ?
यामुळे चालू वर्षामध्ये मंदिरामध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय हा खरोखरच स्तुत्य आणि योग्य आहे. मन निर्मळ, विचार स्वच्छ आणि अंगावर असलेले कपडे यांतून देवतेचे पावित्र्य भंग होणार नाही, याची विशेष काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे असते. ‘ज्या वेळी स्वतःच्या मनामध्ये निर्मळ आणि श्रद्धेचे विचार असतात, तेव्हाच देव आपली प्रार्थना ऐकतो’, असे म्हटले जाते. हे सूत्र जर विचारात घेतले, तर तशा प्रकारचे वागणे, रहाणे या संदर्भातही गांभीर्याने विचार होणे महत्त्वाचे असते.
३. देशातील विविध मंदिरांमध्ये असलेली ‘वस्त्रसंहिता’
अ. श्री साईबाबा मंदिर, शिर्डी, महाराष्ट्र : या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चामड्याचा पट्टा (बेल्ट), पर्स इत्यादी वस्तू बाहेर ठेवाव्या लागतात. येथे महिलांनी मंदिरात प्रवेश करतांना साडी किंवा पंजाबी पोशाख, तसेच पुरुषांनी धोतर, फुल पँट (विजार) किंवा पायजमा घालणे योग्य समजले जाते.
आ. सुवर्ण मंदिर, अमृतसर, पंजाब : येथे कोणतीही वस्त्रसंहिता नसली, तरी मंदिरात प्रवेश करतांना भाविकांना रुमाल, स्कार्फ किंवा कोणत्याही कपड्याने स्वतःचे डोके झाकून घ्यावे लागते. येथे गुडघ्याच्या वर येणार्या शॉर्ट्स (छोटे कपडे) घालून मंदिरात प्रवेश करता येत नाही.
इ. काशीविश्वनाथ मंदिर, वाराणसी, उत्तरप्रदेश : येथे महिलांनी साडी नेसणे बंधनकारक आहे. यासमवेतच देशभरातील भाविकांनासुद्धा दर्शनासाठी हाच नियम लागू करण्यात आला आहे. जीन्स, पँट, शर्ट आणि सूट घालून जे भाविक मंदिरात प्रवेश करतात, त्यांना दूरून काशीविश्वनाथचे दर्शन घेता येते. अशा भाविकांना स्पर्श दर्शन घेता येत नाही.
ई. तिरुपति बालाजी मंदिर, आंध्रप्रदेश : येथे शर्ट आणि पँट घातलेल्या पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जातो. येथे महिला भाविकांसाठी साडी किंवा पंजाबी पोशाख अशी वस्त्रसंहिता आहे. मंदिरातील विशेष विधींमध्ये सहभागी होण्यासाठी पुरुषांना धोतर किंवा पायजमा आणि महिलांना साडी परिधान करणे आवश्यक आहे.
उ. कन्याकुमारी माता मंदिर, कन्याकुमारी : येथील कन्याकुमारी अम्मान मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांना अंगावरील वरचे कपडे जसे की, शर्ट, बनियन काढावे लागते. वरील अंग उघडे ठेवून पँट किंवा इतर कोणताही कपडा घालून पुरुष गर्भगृहात प्रवेश करू शकतात.
ऊ. महाकाल ज्योतिर्लिंग, उज्जैन, मध्यप्रदेश : हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिरात भस्म आरतीच्या दर्शनासाठी किंवा अभिषेक, पूजा इत्यादींसाठी पुरुषांनी धोतर आणि महिलांनी नवी कोरी साडी नेसणे बंधनकारक आहे. मंदिरात भस्म आरतीच्या वेळी ज्योतिर्लिंगाला अस्थीकलश अर्पण केला जातो; मात्र हे दृश्य पहाण्यास महिलांना मनाई असल्याने त्यांना काही क्षणांसाठी डोक्यावर पदर घेऊन स्वतःचा चेहरा झाकावा लागतो.
ए. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी विविध नियम आहेत. येथे प्रवेश करण्यापूर्वी चामड्याचा पट्टा, वस्तू इत्यादी बाहेर ठेवाव्या लागतात. पुरुष भाविकांना अंगावरील वरचे कपडे जसे की, शर्ट आणि बनियन काढून उघड्या अंगाने मंदिरात प्रवेश करावा लागतो. येथे महिलांसाठी वेगळी वस्त्रसंहिता नाही.
४. वस्त्रसंहिता ही भारतीय संस्कृतीची एक ओळख !
वस्त्रसंहिता ही जरी पालटत्या जीवनशैलीच्या आधारावर असली, तरीसुद्धा प्रत्येकाने ती स्वतःच्या अंगवळणी बांधून घेणे आवश्यक आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या ठिकाणी वस्त्रसंहितेची कार्यवाही होत आहे, त्यामध्ये काही महत्त्वाची देवस्थानेही आहेत.
‘धर्मिक स्थळांचे पावित्र्य जपले जावे’, यासाठी तेथील वस्त्रसंहितेचे पालन करावे कि नाही ? याविषयी विविध मतमतांतरे आहेत; परंतु अशा मतमतांतरांना फार महत्त्व न देता स्वतःचे श्रद्धास्थान असणार्या भारतातील विविध मंदिरांमध्ये भाविक वस्त्रसंहितेचे पालन करून दर्शन घेतांना दिसतात. वस्त्रसंहिता ही भारतीय संस्कृतीची एक ओळख बनली आहे.’
– श्री. उदय सावंत, वाळपई, गोवा.
(साभार : दैनिक ‘गोवन वार्ता’, ३१.१२.२०२३)