Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम्.एस्. स्वामीनाथन् यांना भारतरत्न घोषित !

(डावीकडून) पी.व्ही. नरसिंह राव, एम्.एस्. स्वामीनाथन् आणि चौधरी चरण सिंह

नवी देहली – काँग्रेसचे नेते तथा देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. एम्.एस्. स्वामीनाथन् यांनाही भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. काही दिवसांपूर्वी देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला होता.

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करतांना मला आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद आणि विधानसभा यांचे सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आर्थिक आघाडीवर पुढे आला.’ पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, पंतप्रधान या नात्याने नरसिंह राव यांचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी जागतिक बाजारपेठेसाठी भारताचे दरवाजे उघडले. ज्यामुळे आर्थिक विकासाचे एक नवे युग चालू झाले. यासह परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण या क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे भारताचा विकास झालाच, त्यासह त्यांनी देशाला सांस्कृतिक आणि बौद्धिक पातळीवरही समृद्ध केले.

आणीबाणीच्या विरोधात चौधरी चरण सिंह लढले !

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याविषयी माहिती देतांना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. चौधरी चरण सिंह यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला हा पुरस्कार समर्पित करत आहोत. त्यांनी शेतकर्‍यांचे अधिकार आणि शेतकर्‍यांचे कल्याण यासाठी त्यांचे पूर्ण आयुष्य वेचले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री, त्यांनी या पदांवर कार्य करतांना केवळ राष्ट्राच्या उत्कर्षाला महत्त्व दिले. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांची समर्पण वृत्ती आणि आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी दाखवलेली तत्परता आम्हाला कायम प्रेरणा देत राहील.’’