तहसीलदारांसाठी लाच स्वीकारतांना महसूल विभागातील २ जणांना रंगेहात पकडले !
सातारा – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खटाव तालुक्यातील महसूल विभागातील २ जणांना तहसीलदारांसाठी लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले आहे. पहिल्या घटनेमध्ये तक्रारदाराच्या वडिलोपार्जित भूमीचे वाटपपत्र करून मिळण्यासाठी १२ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १० सहस्र रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने सापळा रचून वडूज तहसील कार्यालयातील महसूल साहाय्यक विजय बाळू काळे यांना १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.
दुसर्या घटनेमध्ये सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी तहसीलदारांसाठी २५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २० सहस्र रुपये देण्याचे ठरले. कातरखटाव येथील मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालयासमोर श्रीमंत खाडे या खासगी व्यक्तीला ही लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे खटाव तालुक्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचार समोर आला आहे. याविषयी तहसीलदार बाई माने यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
संपादकीय भूमिका :प्रशासकीय विभागात सर्वच जण एकाच माळेतील असतील तर देश भ्रष्टाचारमुक्त कधीतरी होईल का ? अशांना कठोर शिक्षा त्वरित व्हायला हवी ! |