५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील कु. हर्षदा नरेंद्र खडसे (वय १० वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. हर्षदा नरेंद्र खडसे ही या पिढीतील एक आहे !
अमरावती येथील कु. हर्षदा नरेंद्र खडसे हिची आई आणि सेवाकेंद्रातील साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
‘गर्भारपणात मी सतत ‘श्री गुरुदेव दत्त’, असा नामजप करत असे. तेव्हा ‘बाळ प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवायचे.
२. वय जन्म ते ३ वर्षे
२ अ. प्रेमभाव : कु. हर्षदा बालपणापासूनच स्वतःचे खेळणे इतरांना देते. घरी कुणी आल्यावर त्यांना स्वतःचा खाऊ देते, तसेच ती शाळेत गेल्यावर स्वतःच्या डब्यातला खाऊ बाजूच्या मुलांना देते. यासाठी शाळेतील शिक्षक तिचे कौतुक करतात. एकदा गावातील एक गरीब मुलगी आमच्याकडे आली होती. तेव्हा हर्षदाने तिच्याकडील खाऊचे पैसे त्या मुलीला दिले आणि मला म्हणाली, ‘‘तिची परिस्थिती नाही; म्हणून मी तिला खाऊसाठी पैसे दिले.’’
२ आ. सात्त्विकतेची ओढ : आम्ही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असलेल्या ठिकाणी गेलो, तर ती चिडचिड करते; परंतु धार्मिक ठिकाणी किंवा अमरावती येथील सनातनच्या सेवाकेंद्रात गेल्यावर ती शांत रहाते.
३. वय – ४ ते ९ वर्षे
३ अ. घरकामात साहाय्य करणे : एक वर्षापूर्वी मी पुष्कळ रुग्णाईत होते. तेव्हा ती घरातील केर काढणे, लादी पुसणे, स्वतःचे आवरणे इत्यादी सगळे मनापासून करत होती.
३ आ. हट्ट न करणे : हर्षदा कधीच कुठलीही वस्तू स्वतःहून मागत नाही. तिला बालपणापासूनच घरातील परिस्थितीची जाणीव आहे. ती इतरांच्या वस्तू बघून त्यासाठी कधी हट्ट करत नाही.
३ इ. सेवाकेंद्रात जाण्याची ओढ : हर्षदाला नातेवाइकांकडे जाण्याची ओढ नाही; परंतु मी ‘सेवाकेंद्रात सेवेला जाऊया’, असे म्हणाले की, ती उत्साहाने येण्यास सिद्ध होते. आम्ही दुचाकीने उन्हात, तर कधी पावसात ३० किलोमीटर प्रवास करून सेवाकेंद्रात जातो, तरीही ती कधी त्रास देत नाही.
३ ई. ती मला आणि तिच्या बाबांना नामजप करण्याची आठवण करून देते.
३ उ. आईला चुकीची जाणीव करून देणे : मी सासूबाईंविषयी कधी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर ती मला ‘असे बोलू नको. तूसुद्धा एक दिवस म्हातारी होशील. मग तुला तेव्हा असे बोललेले आवडेल का ?’, असे समजावून सांगते.
३ ऊ. धर्माचरणाची आवड : तिला धर्माचरणाची आवड आहे. ती नेहमी सात्त्विक कपडे घालते, कपाळावर कुंकू लावते आणि हातात बांगड्या घालते. ती प्रतिदिन घरातील देवपूजा आनंदाने करते.
३ ए. स्वभावदोष : भित्रेपणा आणि मनमोकळेपणाने न बोलणे’
– सौ. नंदा नरेंद्र खडसे (हर्षदाची आई), अमरावती (२२.९.२०२३)
४. इतरांना साहाय्य करणे
‘कु. हर्षदा अनेकदा तिच्या आईसह अमरावती सेवाकेंद्रात येते. मला आध्यात्मिक त्रास होत असल्यामुळे मी अनेकदा खोलीत झोपलेली असते. तेव्हा ती मध्ये-मध्ये माझ्या खोलीत येऊन मला काही हवे असेल, तर लगेच उत्साहाने आणून देते.’
– सौ. रेणुका नीलेश टवलारे (अमरावती येथील साधिका), अमरावती (२२.९.२०२३)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |