साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. साधिकेला स्वप्नात चार पांढरे घोडे, काही मोर आणि एक नाग दिसणे अन् त्यांच्याकडे पाहून साधिकेचा भाव जागृत होणे
‘१५.१२.२०२२ या दिवशी मला स्वप्नात पांढर्या रंगाचे चमकदार त्वचा असलेले चार घोडे दिसले. ‘ते दैवी घोडे आहेत’, असे वाटत होते. एरव्ही काही वेळा मला ते घोडे उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसतात. त्यानंतर काही दिवसांनी मला स्वप्नात पांढरे मोर दिसले. त्यांच्याकडे पाहूनही मला पुष्कळ चांगले वाटत होते. १३.७.२०२३ या दिवशी मला स्वप्नात मोठा पांढरा नाग दिसला. मला स्वप्नात दिसलेले पांढरे घोडे, मोर आणि नाग यांच्याकडे पाहून माझी भावजागृती होत होती.
२. नामजप करतांना शरिराच्या डाव्या बाजूला हलकेपणा जाणवणे आणि शरिराच्या डाव्या बाजूकडील कुठल्याही अवयवाचे अस्तित्व न जाणवणे
२.९.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. काही वेळाने मला माझ्या शरिराच्या डाव्या बाजूला हलकेपणा जाणवला. मला शरिराच्या डाव्या बाजूला कुठल्याही अवयवाचे अस्तित्व जाणवत नव्हते. माझा नामजप पुष्कळ एकाग्रतेने होत होता. नामजपानंतर दीड घंटा माझ्या शरिराला हलकेपणा जाणवत होता. मी याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले. तेव्हा त्यांनी ‘ही चांगली अनुभूती आहे’, असे सांगितले.
३. श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरात गेल्यावर देवीची मानसपूजा करतांना एक क्षण देवीच्या मुखाचे दर्शन होऊन ‘पुष्कळ चैतन्य मिळाले’, असे जाणवणे
१६.९.२०२३ या दिवशी मी आणि एक साधिका श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरात गेलो होतो. तो नवरात्रीचा दुसरा दिवस होता. आम्ही सकाळी लवकर मंदिरात गेलो होतो. त्या वेळी देवीवर अभिषेक होत होता. तेव्हा मी डोळे मिटून सूक्ष्मातून देवीच्या मूर्तीजवळ गेले आणि तिची मानसपूजा करू लागले. मी देवीच्या जवळ गोड पदार्थ तिला भरवण्यासाठी नेला. त्या वेळी एकच क्षण देवीच्या मूर्तीच्या ठिकाणी मला देवीच्या मुखाचे दर्शन झाले. मला अकस्मात् देवीचे मुख स्पष्ट दिसल्याने मी काही क्षण घाबरून गेले. ‘काय घडले !’, ते मला काही क्षणांनंतर समजले. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच आले. मला त्या एका क्षणात ‘पुष्कळ चैतन्य मिळाले’, असे जाणवत होते.’
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१०.२०२३)
|