गणपतीपुळे येथे १० ते १६ फेब्रुवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव होणार साजरा
रत्नागिरी – प्रतिवर्षाप्रमाणे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथे माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी (शनिवार, १० ते १६ फेब्रुवारी) या कालावधीत गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिर आणि मंदिर परिसरात श्रींच्या उत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत.
१० फेब्रुवारीच्या सकाळी ९.३० ते ११.३० श्रींची महापूजा आणि प्रसाद, दुपारी ४ ते सायंकाळी ७ गणेशयाग देवता स्थापना त्यानंतर सायंकाळी ७ ते ७.३० सामुदायिक आरती आणि मंत्रपुष्प होणार आहे. ११ फेब्रुवारीच्या सकाळी ७ ते १२ कलशारोहण वर्धापनदिनानिमित्त गणेशयाग पूर्णाहूती करण्यात येणार आहे. १२ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ या वेळेत सहस्र मोदक समर्पण होणार आहे. १३ फेब्रुवारीला दुपारी ४ ते सायंकाळी ६ माघी यात्रा होणार आहे. १४ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते ७.३० वा. सामुदायिक आरती आणि मंत्रपुष्प, तसेच १६ फेब्रुवारीला रथसप्तमीला दुपारी ११.३० ते २ वा. या कालावधीत मंदिरात महाप्रसाद ठेवण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे १४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिदिन सायंकाळी ७.३० ते ९.३० कीर्तनमालेमध्ये कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके, पुणे यांचे कीर्तन होणार आहे. १५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७.३० वा. भक्तीगीते, नाट्यगीते, भावगीते आणि देशभक्तीपर गीतांची मैफील होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.