Congress Released BlackPaper : बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात मोदी सरकार कुचकामी ! – काँग्रेस

मोदी सरकारच्या कार्यकाळातील कथित नाकर्तेपणा दाखवण्यासाठी काँग्रेसची काळी पत्रिका !

नवी देहली – मोदी सरकारची १० वर्षे हा अन्याय करण्याचा काळ होता. हे सरकार लोकशाहीसाठी धोका असून बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात ते कुचकामी ठरले. गेल्या दशकभरात केरळ, कर्नाटक आणि तेलंगाणा यांसारख्या भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांशी केंद्र सरकारने भेदभाव केला, असे आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी या दिवशी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असतांना काँग्रेसच्या काळातील अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील श्‍वेतपत्रिका काढली जाईल, असे सुतोवाच केले होते. यामुळे ८ फेब्रुवारी या दिवशी काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात ‘काळी पत्रिका’ काढली. खर्गे यांनी येथे या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन ही काळी पत्रिका प्रसिद्ध केली.

भाजपकडून १० वर्षांत ४११ आमदार आयात !

खर्गे पुढे म्हणाले की, भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या १० वर्षांत भाजपने अन्य पक्षांतून ४११ आमदार आयात केले आहेत. अनेक राज्यांतील काँग्रेस सरकार उलथवून भाजपने स्वतःचे सरकार स्थापन केले.

“भारताच्या प्रगतीला कुणाची दृष्ट लागू नये, यासाठी ही काळी पत्रिका ! – पंतप्रधान मोदी”

८ फेब्रुवारीच्या संसदेचे अधिवेशन चालू होण्यापूर्वी खर्गे यांनी काळी पत्रिका घोषित केली. त्यानंतर राज्यसभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याकडे लहान मुलाला दृष्ट लागू नये, म्हणून मुलाला एक छोटासा काळा टिका लावला जातो. गेल्या १० वर्षांत भारत प्रगतीच्या शिखरावर आहे. या प्रगतीला कुणाची दृष्ट लागू नये, म्हणून काँग्रेसकडून काळा टिका लावण्याचा प्रयत्न झाला. मी त्यासाठी खर्गे यांचे आभार व्यक्त करतो. एका ज्येष्ठ व्यक्तीने हे काम केले, त्याचा अधिक आनंद होत आहे.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसने असे करून तिला निवडणुकीत काहीएक लाभ होणार नाही ! यापेक्षा वर्ष २००४-२०१४ या दशकभरात केलेल्या भ्रष्टाचारावरून तिने जनतेची कान पकडून क्षमा मागितली पाहिजे. यासह ‘शिक्षण घेण्याचा अधिकार २००९’ हा  हिंदुविरोधी कायदा, तसेच आधीच्या दशकात केलेले ‘प्रार्थनास्थळ कायदा १९९१’, ‘वक्फ कायदा १९९५’ यांसारख्या काळ्या कायद्यांना रहित करण्याचे आश्‍वासन काँग्रेसने दिले, तर त्याचा थोडातरी लाभ ती मिळवू शकेल !