अमेरिकेत प्रतिदिन किमान एका भारतियाचा मृत्यू होतो !

अमेरिकेतील भारतियांना साहाय्य करणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापकांचा दावा !

वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही अतिशयोक्ती करत नाही; परंतु अमेरिकेत प्रतिदिन किमान एका भारतियाचा मृत्यू होतो, हे खरे आहे. मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी किंवा कामगार आहेत, जे नुकतेच भारतातून अमेरिकेत आले आहेत, असा दावा अमेरिकेतील ‘टीम एड’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक मोहन नन्नापानेनी यांनी केला. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर आक्रमण झाल्याच्या, त्यांच्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा दावा केला आहे.

नन्नापानेनी यांनी सांगितले की,

१. भारतातील अनेक विद्यार्थी अलीकडे अडचणीत सापडले आहेत आणि दुर्दैवाने काहींचे निधन झाले आहे, हे अतिशय दुःखद आहे. हे आताच घडत आहे, असे नाही. इतिहास पाहिला, तर गेल्या अनेक वर्षांपासून हेच घडत आहे. आम्ही वर्ष २००१ पासून लोकांना साहाय्य करत आहोत.

२. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात भारतीय विद्यार्थ्यांचा वाहन अपघात किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अमेरिकेत अमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत आहेत. दुर्दैवाने भारतीय विद्यार्थी अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत.

३. कुटुंबांना आणि व्यक्तींना गंभीर परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी साहाय्य करण्यासाठी संस्था आवश्यक ते करते. यामध्ये मृतदेह भारतात नेण्यास साहाय्य करणे, स्थानिक स्तरावर अंत्यविधी करणे किंवा रुग्णालयात साहाय्य करणे यांचाही समावेश आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या सातत्याने होणार्‍या मृत्यूंमुळे चिंता वाढली आहे.

४. आमची संस्था भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंच्या प्रकरणांवर काम करत आहे. विविध कारणांमुळे अनेक तरुण विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, हे पाहून मला पुष्कळ वाईट वाटते. पालक त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यासाठी पुष्कळ पैसा खर्च करतात; परंतु रोजगाराच्या संधींच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण होतो. त्यांपैकी काही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.