श्रीराममंदिराची स्थापना म्हणजेच रामराज्याची स्थापना ! – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग
आळंदी (जिल्हा पुणे), ७ फेब्रुवारी (वार्ता.) – सध्या अमृतकाळ चालू आहे. अयोध्येमध्ये श्रीराममंदिर स्थापन झाले आहे. रामराज्याची स्थापना झाली आहे. भक्तीची लाट निर्माण होत आहे. या कार्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची निवड ही भगवान प्रभु श्रीराम यांनी केलेली आहे. त्यांच्या हातून भरत कार्य होत आहे. हा गीताभक्ती महोत्सव अमृतकाळाशी जोडला गेला आहे, असे भावपूर्ण उद्गार ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर महाराज यांनी काढले. ते ७ फेब्रुवारी या दिवशी प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मातृशक्ती ज्ञापन पर्व तथा कृतज्ञता ज्ञापन पर्वा’मध्ये बोलत होते. यानिमित्ताने १३ मातांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार करण्यात आला.
श्री श्री रविशंकर महाराज म्हणाले, ‘‘स्वामी यांनी भारतातील सर्व समाजातील संत यांना एकात्मतेच्या सुत्रामध्ये बांधले आहे. त्यांची सहजता, नि:स्वार्थी, करुणा आणि वात्सल्यभाव या महोत्सवामध्ये दिसून येत आहे. महान संतांच्या उपस्थितीमध्ये यज्ञ संपन्न झाल्यास त्याचा संकल्प त्वरित पूर्ण होतो. तिथे ईश्वराची दिव्यशक्ती कार्यरत असते, असा अनुभव याठिकाणी येतो.’’
प.पू. सुधांशू महाराज म्हणाले, ‘‘प्राचीन काळापासून मातेला देवीची उपमा दिली आहे. नवरात्रीमध्ये नवदेवींचा जागर केला जातो. अनेक रूपांमध्ये माता आपल्याला दर्शन देते. काशी विश्वनाथ मंदिर १११ वर्षे भग्नावस्थेमध्ये होते. तेव्हा इंदूरची महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोद्धार केला. बंगालमधील महाराणी भवानी यांनी काशीमध्ये प्रतिदिन १ धर्माचे शिकवण देणारे विद्यालय अशी ३६५ विद्यालये निर्माण केली. काशी विश्वनाथ मंदिराला पंजाबमधील राजा रणविजय यांच्या राणीने १ सहस्र किलो सोने दान केले.’’