ठाकरे गटाची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने !
जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सीतामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्याचे प्रकरण !
सांगली – जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाच केला. हा नाच चालू असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेले एक कलाकार व्यासपिठावर उपस्थित होते आणि त्यांनी काही काळ त्याच वेशभूषेत नाच केला. याच समवेत माता सीता यांची वेशभूषा करणार्या महिला कलाकाराने या गाण्यात नाच केला. तरी याचा निषेध करत जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली.
या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. शंभुराज काटकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि सीतामातेचा झालेला अवमान आम्ही कधीच खपवून घेणार नाही. या संदर्भात जे जे उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे.’’
याप्रसंगी ऋषिकेश पाटील, सुजाता इंगळे, मनीषा पाटील, ओंकार देशपांडे, चेतन भोसले, गणेश लोखंडे, धनाजी कोळपे यांसह अन्य उपस्थित होते.
या संदर्भात ‘नागरिक जागृती मंच’चे सतीश साखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तात्काळ पत्र लिहून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी; अन्यथा आम्हाला शिवप्रेमींना घेऊन आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी दिली आहे. |